অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तारगांव अमुचं कर्तृत्ववान

तारगांव अमुचं कर्तृत्ववान

कृष्णाकाठी वसलेल्या आणि हिरवाईने नटलेल्या एका देखण्या गावाची ही गोष्ट. सातारा जिल्ह्याच्या कोरेगांव तालुक्यातील तारगावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. गाव अतिशय सुंदर असून समर्पित वृत्तीनं गावासाठी काम केलं तर गावाचं रुपडं कसं बदलू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तारगांव. म्हणून आमचं गाव म्हणजे स्वकर्तृत्वाने विकसित झालेलं गाव, असं सांगतांना गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो.

गावात बोरबन नावाचं क वर्ग तीर्थक्षेत्र. त्याचबरोबर संत तुका विप्र यांच्या अस्तित्त्वानं पुनित झालेल्या या गावात तारकेश्वर, कृष्णाई, ज्योर्तिलिंग आणि हनुमान अशी पुरातन मंदिरही आहेत. मानसिकता बदलली की कामाला कशी गती मिळते याचा अनुभव स्वत: गावकऱ्यांनी घेतला. शौचालय वापर, स्वच्छता याबाबतीत एकेकाळी उदासीन असलेलं गाव एकत्र आलं ते निर्मल ग्राम अभियान राबविण्यासाठी. निर्णय झाला आणि गावं कामाला लागलं. गावातील 98 टक्के कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली तर 2 टक्के कुटुंबांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. गावाला 2009 साली निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. पुरस्काराने गावाचा ग्रामविकासाचा संकल्प अधिक दृढ केला. निर्मलग्राम पाठोपाठ गावानं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात भाग घेतला आणि गाव तंटामुक्त केले. या अभियानात गावाला 4 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला.

चांगलं काम करायचं, स्पर्धेत भाग घ्यायचा आणि सुधारणांना गती द्यायची याची सवयच जणू गावाला लागली. गाव निर्मल झालं तसंच ते आरोग्यसंपन्नही. राष्ट्रीय आरोग्य अभियानात गावाला तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट आरोग्य गाव अभियानाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर लोकसहभाग, श्रमदानातून ग्रामविकासाची काम आणि पुरस्कारांची मालिका सुरुच झाली. गावानं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात 2009-10 मध्ये तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळवला. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा, कै.वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन स्पर्धा यातही जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवले.

गावानं लोकवर्गणीतून शाळांच्या तीन वर्गखोल्या बांधल्या. गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 67 हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा केली आणि त्यातून 2 वस्त्यांवर जिजामाता लघु नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आल्या. 10 टक्के लोकवर्गणी आणि 19 लाख रुपये भरून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यात आला. या कामाची दखल घेऊन गावाला प्रेमलाकाकी चव्हाण स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. गावानं 2009-10 मध्ये दलित वस्ती सुधार अभियानांतर्गत भाग घेतला, त्याचा जिल्हास्तरीय पुरस्कार देखील गावाला मिळाला.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत गावानं गावात एक व्यक्ती एक झाड, कर वसुली, प्लास्टिक बंदी, यासारख्या सर्व निकषांवर भरीव कामगिरी केली आणि योजनेत तीन वर्षात पूर्ण करावयाचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केले. त्यामुळे गावाला 2010-11 मध्ये “पर्यावरण विकासरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2011-12 मध्ये गावानं यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देखील मिळवला आहे.

गेल्या चार वर्षांपासून गावाची सर्व प्रकारची करवसुली 100 टक्के आहे. गावात बचतगगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत असून त्याद्वारे गावाच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळाली आहे. गावातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका बिनविरोध करण्याची एक अनोखी परंपराही गावानं जपली आहे. गावात घनकचरा आणि सांडपाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 1 लाख रोपांची रोपवाटिका गावाने तयार केली असून स्वर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत गावात दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच यासबंधाने गावकऱ्यांचे अनेक प्रश्न ही सोडविण्यात आले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावात करून घेण्यासाठी गाव आग्रही आहे. मग ती दलित वस्ती पाणी पुरवठा योजना असो, गोबरगॅस प्रकल्प असो किंवा कुपोषणमुक्त ग्राम अभियान. गावाच्या भल्यासाठी प्रत्येक काम निष्ठेनं करायचं, प्रत्येक अभियानात, स्पर्धेत भाग घ्यायचा त्यातील निकषांना पात्र ठरायचं हे अगदी ठरलेलच. त्यामुळे विकास कामात ही सातत्य राहीलं. पोषण आहाराचं वितरण, सोयाबीन दान कार्यक्रम, भूजलाची पातळी वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजना, पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले वनराई बंधारे, मूर्ती-निर्माल्य दान, राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पांतर्गत गोबर गॅस चा वापर यासारखे अभिनव प्रयोग गावानं राबवले. गावात आरोग्य शिबिरे, पशु चिकित्सा शिबिरे, कापडी पिशव्यांचे वाटप असे अनेक उपक्रम हाती घेत गावकऱ्यांनी गाव विकासाचा हा आलेख चढता ठेवला.

गाव विकासाचे निर्णय घेतांना पुरषांबरोबर महिलांच्या मताचा सन्मान करणारं हे गाव आपली ग्रामसभा सर्वोत्तम कशी होईल यासाठी देखील प्रयत्न करतांना दिसते. सौ. संध्या सुनील मलवडकर या गावच्या सरपंच आहेत. त्या आणि आदर्श ग्रामसेवकाचा पुरस्कार मिळालेले ग्रामसेवक मोहन आढाव हे दोघे मिळून सर्वांच्या सहकार्याने तारगावाच्या विकासाची धूरा आपल्या खांद्यावरून पुढे नेत आहेत. अशा या देखण्या गावाच्या वाटचालीकडे पाहिलं की “गावं आमचं कर्तृत्ववान, विकासात वेगवान” ही गावकऱ्यांच्या मनातील धारणा आपल्याकडूनही नक्कीच पक्की होते.

 

लेखिका : डॉ. सुरेखा मुळे

स्त्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 3/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate