অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिव्यांगांसाठी दृष्टी ठरलेली ‘दि जळगाव पीपल्स को- ऑप. बँक लि.’

दिव्यांगांसाठी दृष्टी ठरलेली ‘दि जळगाव पीपल्स को- ऑप. बँक लि.’

दुसऱ्‍यांसाठी जगला तो जगला आणि स्वत: साठी जगला तो मेला, या उक्तीप्रमाणे कार्य करत दिव्यांगांसाठी सुलभ संकेतस्थळ निर्माण करणारी ‘दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक लि.’ ने महाराष्ट्रासह देशासमोर मोठा आदर्श निर्माण केला. बँकेच्या या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्‍या राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले. अंधांची काठी बनणाऱ्‍या या बॅंकेचा राष्ट्रीय गौरव हा महाराष्ट्राचाही गौरव ठरला आहे.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या दिव्यांगजन पुरस्कार वितरण समारंभ, २०१७ मध्ये महाराष्ट्राला तीन व्यक्तीगत व दोन संस्थांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्याची गौरी गाडगीळ, मुंबईचा प्रणय बुरडे यांनी स्वत:ला यशस्वीरित्या सांभाळून स्वावलंबी बनून सर्वसामान्यांना इर्षा होईल अशी देदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

मानसिक दुर्बलता व स्थूलता असूनही त्यावर मात करत स्वावलंबी आयुष्य जगत असल्याने पुण्याची गौरी गाडगीळ व मुंबईच्या प्रणय बुरडे यांनी दिव्यांगजन पुरस्कार पटकवला. या पुरस्कारानंतर या दोघांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून अपंग या शब्दालाही अपंग करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसून आला.

तिसरा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील ‘ईटीसी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणाऱ्‍या केंद्रास प्रदान करण्यात आला. चौथा पुरस्कार दिव्यांगांसाठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्‍या मुंबई, वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड या संस्थेच्या ब्रेल प्रेसला प्रदान करण्यात आला. पाचवा पुरस्कार जळगाव येथील दि जळगाव पीपल्स कॉ.ऑप. बँक यांना मिळाला. दिव्यांगजनांना बॅंकेचे दैनंदिन व्यवहार सुलभरित्या हाताळता यावेत या संवेदनेतून विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी आपल्या बॅंकेची संकेतस्थळे दिव्यांगजनांना देखील वापरता यावीत, यादृष्टीने संकेतस्थळात आवश्यक तांत्रिक बदल घडवून आणले.

पुरस्कार वितरणाच्या आदल्या दिवशी बॅंकेची काही निवडक संचालक मंडळी, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी पुरस्काराबाबतची पार्श्वभूमी जाणून घेताना त्यांनी बॅंकेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. दि जळगाव पीपल्स कॉ. ऑप. बँक, १९३३ पासून कार्यरत असून बँकेने दिव्यांगांना हाताळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. बँकेच्या संकेतस्थळावर दिव्यांगाकरिता मायक्रोफोनद्वारे सुलभ भाषेमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाँटस, आशय, रंगाचा प्रभावी वापर करून हे संकेतस्थळ दिव्यांगांना हाताळण्याची सोय करून देण्यात आली आहे. टॉकींग मॉड्युलचा वापर करून संकेतस्थळाच्या पुढील पेजवर जाण्याची सोय, वेबपेजची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक पेजच्या खालच्या भागास एक कोड देण्यात आला आहे. हे संकेतस्थळ सर्वच ब्राऊजर आणि मोबाईलवर उघडण्याची सोय आहे, वेब कंटेंट ॲक्सेस गाईडलाईनप्रमाणे या संकेतस्थळावर दिव्यांगासाठी एकूण ६१ बाबींची सोय उपलब्ध देण्यात आली आहे.

बँकेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील हे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी प्रज्ञाचक्षुंच्या जीवनातील दैनंदिन अडचणी समजून घेऊन, या संवदेनेतूनच आपल्या बँकेची वेबसाईट दिव्यांगजनांना वापरता यावी, म्हणून सर्व आवश्यक ते तांत्रिक बदल घडविले. यासाठी बँकेची वेबसाईट World Wide Web Consortium (W3C) च्या Web Content Accessibility guidelines (WCAG) 2.0AA नुसार Web Accessibility Compliance म्हणजेच प्रज्ञाचक्षु/ दिव्यांगजनांना बँकेचे मोबाईल ॲप्लीकेशन हाताळणे आणि एटीएम व्यवहार करणे सुलभ व्हावे, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. दिव्यांगजनांना इतरही व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठीही बँकेचे कार्य सुरु असून भविष्यात दिव्यांगांना अधिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचा मानस अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

- अमरज्योत कौर अरोरा

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate