অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुर्गम रंगुबेलीला विकासाची चाहूल

दुर्गम रंगुबेलीला विकासाची चाहूल

मेळघाटातल्या घनदाट जंगलात वसलेलं रंगुबेली हे दुर्गम गाव. धारणी तालुक्यातील हा आदिवासीबहुल परिसर काहीसा दुर्लक्षितच. गावाला रस्ता नाही. वीज नाही. गावाशेजारून नदी असूनही सिंचनाची सोय नाही. बँकिंग सुविधा नसल्यानं गावकऱ्यांच्या नशिबी डोंगरवाटांतून पायपीट.

हे दुर्लक्षित गाव जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी हेरलं आणि तिथं मुक्काम ठोकून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायचा निर्णय घेतला.

दि. 29 मे रोजी श्री. बांगर यांनी डिजिटल ग्राम हरिसालला भेट दिली. तिथल्या सगळ्या सुविधांची पाहणी करून झाल्यानंतर सायंकाळी श्री.बांगर यांनी धारणीमार्गे थेट दुर्गम गाव रंगुबेलीला पोहोचले. थेट जिल्हाधिकारीच आपल्या गावात येऊन आपल्याशी बोलतो व मुक्कामही करतो, ही घटना गावकऱ्यांसाठी नवलाची आणि सुखावह होती. त्यामुळे त्यांनी अत्यंत मोकळेपणे आपल्या समस्या मांडल्या.

रंगुबेलीपासून कुटंगा हे गाव अवघ्या पाच किलोमीटरवर; पण तिथे जायला रस्ता नाही. हे कळल्यावर श्री. बांगर यांनी तात्काळ रस्ता तयार करण्याचे निर्देश दिले. गावात वीज नाही; पण सौर ऊर्जेवरचा दिवा आहे. तिथे अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून वन विभागाची जागा ‘महावितरण’ला हस्तांतरित करण्याचा निर्णय त्याचवेळी घेण्यात आला. गावाजवळून वाहणाऱ्या नदीचे पाणी सिंचनासाठी वापरण्याची मुभा गावकऱ्यांना नव्हती. ती परवानगी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले.

रोजगार हमी योजनेच्या कामांतून गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो; पण बँकेची सोय नसल्याने मजुरी मिळवण्यासाठी दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी कुटंगा किंवा बैरागड येथे बँकिंग करस्पॉडन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ग्रामसभा हा तर पंचायतराजने ग्रामस्थांना दिलेला महत्त्वाचा हक्क. पण गेल्या एका वर्षापासून रंगुबेलीत ग्रामसभाच घेतली नाही, असं गावकऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिलं आणि पेसा (PESA) कायद्याची माहितीही दिली. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, सर्वांना आरोग्य, रोजगार याविषयीच्या महत्त्वाच्या योजनाही गावकऱ्यांना सांगून त्यांचं मनोबल वाढवलं.

थेट गावात जाऊन व गावकऱ्यांत राहून त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन कार्यवाही करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे दुसऱ्या दिवशी धारणी येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतही अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले गेले.

लेखक: हर्षवर्धन पवार

जिल्हा माहिती अधिकारी

अमरावती

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/23/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate