অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हजारवाडीची विकासाकडे वाटचाल

हजारवाडीची विकासाकडे वाटचाल

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील हजारवाडी. लोकसंख्या हजार-बाराशेच्या आसपास. आज जिल्हा आणि तालुक्याच्या विकासाच्या नकाशावर विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या गावाची ओळख होऊ लागली आहे. गेल्या तीन वर्षांत विविध विकासकामांसाठी या ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी जवळपास एक कोटी रुपये निधी विविध योजनांतून प्राप्त केला आहे. विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने महसूलमंत्री आणि जिल्हा प्रशासन हजारवाडीमध्ये अवतरलं होतं, हे या विकासाचीच साक्ष देतात.

हजारवाडी ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव अशी अनेक बिरूदं हजारवाडीनं अभिमानानं मिरवली आहेत. आता त्याही पुढे जात गावच्या विकासासाठी एकाच वर्षात जवळपास एक कोटीचा निधी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात आलाय, हे येथील जागरूक लोकप्रतिनिधींच्या कर्तव्याचं फलितच म्हणावं लागेल.

ग्रामपंचायत दरवर्षी 15 टक्के मागासवर्गीय बांधवांसाठी, 10 टक्के महिला व बालविकासासाठी आणि 3 टक्के दिव्यांग बांधवांसाठी 100 टक्के खर्च करते. गावात साक्षरतेचे प्रमाण 87.42 टक्के आहे. शैक्षणिक सुविधांमध्ये एक अंगणवाडी असून त्यामध्ये 32 बालके आहेत. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 31 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत.

गेल्या दोन आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेमधून हजारवाडी ते पाचवा मैल रस्ता सुधारणा करणे 15 लाख रुपये, हजारवाडी कोळी वस्ती ते गॅस फॅक्टरी रस्ता दुरूस्त करणे 15 लाख रुपये आणि मोराळे, सांडगेवाडी, अनुगडेवाडी तावदारवाडी, बुरूंगवाडी, हजारवाडी ते राज्य मार्ग 151 मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे 30 लाख रुपये अशी एकूण 60 लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, खासदार फंडातून मौजे हजारवाडी येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत अभ्यासिका बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.

13 व्या वित्त आयोगातून सन 2014-15 मध्ये आर. सी. सी. गटर व पाईप गटर यासाठी जवळपास साडेचार लाख रुपये, रस्ता क्राँक्रिटीकरण एक लाख रुपये, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे जवळपास पाच लाख रुपये ही कामे पूर्ण झाली आहेत. तर लक्ष्मी मंदिर सुधारणा करण्यासाठी गेल्या तीन वर्षात 13 लाख 50 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, या कामाचा शुभारंभ नुकताच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

याशिवाय ग्रामनिधीतून आर.सी.सी. गटर, रस्ते क्राँक्रीटीकरण, नवीन कूपनलिका, स्मशानभूमी सुशोभीकरण, वॉटर ए.टी.एम., रस्ते सुधारणा अशी जवळपास 50 लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कन्यारत्न योजनेतून 9 मुलींना प्रत्येकी 10 हजार रूपयांची ठेव पावती, गोबरगॅस प्रोत्साहनपर अनुदान प्रती गोबरगॅस 5 हजार रूपये, घरोघरी कचराकुंडी/ पाण्याचे जार व डिस्पेन्सर प्रत्येक कुटुंबास दोन याप्रमाणे वाटप या योजना राबविण्यात आल्या आहेत.

रस्ता मुरमीकरण व खडीकरण 75 लाख रूपये, भुमिगत अंतर्गत विद्युत व्यवस्थेसाठी 3 कोटी 65 लाख रूपये, 25/15 योजनेतून रस्ता काँक्रीटीकरण करणे 60 लाख रूपये, रस्ता डांबीरकरण 10 लाख रूपये, नाविण्यपूर्ण योजनेतून वायफाय सुविधा 3 लाख रूपये, स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना (24 तास पाणी) 2 कोटी रूपये व स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन 20 लाख रूपये आदि कामे मंजूर केली आहेत.

याचबरोबर मुस्लीम समाजासाठी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, गावातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरण व हायमास्ट (विद्युत दिवे) उभारणे, नागरिकांसाठी सौर उर्जेवर गरम पाणी उपलब्ध करणे, सौर उर्जेवर वीज निर्मिती करून मोफत वीज पुरवठा करणे, अबाल वृध्दांसाठी व लहान मुलांसाठी बगीचा निर्मिती करणे, गावातील प्रमुख रस्ते रेनबो स्ट्रक्चर निर्मिती करणे आदि कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

कृषि विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या क्षारपड सुधार योजनेंतर्गत क्षारपड जमिनीच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येणारअसून अत्याधुनिक निचरा प्रणाली निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. गावात तसेच रस्त्याकडेला नक्षत्र वन निर्माण करून त्याचे संवर्धन व संगोपन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

-संप्रदा द. बीडकर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate