অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निंबोडी दुर्घटनाग्रस्त पालकांना पालकमंत्र्यांची भेट

निंबोडी दुर्घटनाग्रस्त पालकांना पालकमंत्र्यांची भेट

नगर-जामखेड रस्त्यावरचं छोटसं गाव, निंबोडी. अठ्ठावीस ऑगस्टच्या मुसळधार पावसाने येथील प्राथमिक शाळेचं छत हिरावलं आणि त्याचबरोबर तीन चिमुकल्यांना त्यांच्या आईबाबांपासूनही अलग केलं. अजूनही त्या आठवणीने व्याकूळ असणाऱ्या या चिमुकल्यांच्या पालकांची अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट घेतली. मुलांच्या आठवणी काढून हुंदका आवरु न शकणाऱ्या त्या मायबापांना पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दिलासा दिला. आपुलकीच्या आधाराने ते पालकही गहिवरले आणि खुद्द पालकमंत्रीही नंतर काहीकाळ भावविवश झाले.

'निंबोडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर 28 ऑगस्टच्या दिवशी आघात झाला. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पाचवीच्या त्या वर्गाचा आधार कोसळला आणि ते छत विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळले. प्रसंगावधान राखून काही विद्यार्थी धावले तर काही ढिगाऱ्याखाली अडकले. वर्गशिक्षिका असणाऱ्या लीना पाटील यांनीही प्रसंगावधान राखले आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरु केली…’ गावकरी त्यांच्या आठवणी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासमोर सांगत होते आणि सर्वजण अतिशय भावूक होऊन त्या आठवणींची जणू उजळणी करीत होता. प्रसंग अतिशय दु:खदायी होता. परंतू, या दुर्घटनेतून सावरण्यासाठी गावाने केलेल्या प्रयत्नांची पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मनापासून कदर केली. तुमचं हे ऐक्य गावाला या दु:खातून सावरण्यासाठी मदत करेल, असा दिलासा त्यांनी गावकऱ्यांना दिला.

सुरुवातीला त्यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्या वैष्णवी पोटेच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 'राज्य शासनाच्या वतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कार्यवाही करण्यात येईल. तसेच, याप्रकरणी अधिक काय करता येईल, हे पाहू', असा दिलासा त्यांनी दिला. त्यांच्या या दिलाशाने पोटे कुटुंबियांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी मदतीचा धनादेशही त्यांनी प्रकाश पोटे यांच्याकडे सुपुर्त केला.

श्रेयस प्रवीण रहाणे या मुलानेही आपला जीव या दुर्घटनेत गमावला. रहाणे कुटुंब हातावरचे पोट असणारे. त्यांची आपबिती ऐकून पालकमंत्री प्रा. शिंदेही हेलावले. एकूलता एक मुलगा गेल्याचे दु:ख सांगताना आमचा आधार गेला असे सांगत श्रेयसच्या आईलाही रडू कोसळले. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी त्यांना समजावले आणि धीर दिला. 'कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत', असा दिलासा त्यांनी दिला. सुमीत सुनील भिंगारदिवे हा विद्यार्थीही या दुर्घटनेत गमावला. त्याचे पालक अक्षरश: निशब्द होते. या दुर्घटनेने त्यांच्या भावना जणू कुलुपबंद झाल्या होत्या. प्रा. शिंदे यांनी त्यांना धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असल्याचे सांगितले. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा धनादेश त्यांच्या हाती सोपविला. काळजी घ्या.. अशा शब्दांत पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी त्यांचा निरोप घेतला.

तीन दिवस झाल्यानंतरही सारा गाव जणू अबोल होता. मात्र, पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्राथमिक शाळा दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. गावकऱ्यांचे म्हणणे आणि भावना लक्षात घेऊन शाळेसंदर्भातील निर्णय लवकर घेतला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या निधीतून शाळा वर्ग बांधकामासाठी निधी दिला जाईल. सदर निधी अपुरा असल्यास नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतून या बांधकामासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी यावेळी वर्गशिक्षिका लीना पाटील या प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचा राज्य शासनामार्फत उचित सन्मान आणि गौरव करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे ते म्हणाले.

या दुर्घटनेवेळी गावकऱ्यांनी दाखविलेला समजूतदारपणा, संयम खूप मोठा आहे, अशी भावना प्रा. शिंदे यांनी व्यक्त केली. गावातील शाळेच्या गरजा आणि अपेक्षेबाबत लवकरच कार्यवाही करु, असे जणू वचन देऊन आणि गावकऱ्यांना दिलासा देत पालकमंत्री प्रा. शिंदे पुन्हा नगरला परतले.

नगरमध्ये त्यांनी नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली. कुठे लागलंय, काय दुखतंय असा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बरं वाटतयं ना..काळजी घ्या, या शब्दांत त्यांना आणि त्यांच्या पालकांना आधार दिला. तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती आणि औषधोपचार याबाबत माहिती घेतली. डॉक्टरांना सूचना केल्या आणि लवकर बरे व्हा, असे विद्यार्थ्यांना सांगत त्यांनी निरोप घेतला. प्र.जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पी.बी. बुरुटे, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, तहसीलदार सुधीर पाटील, जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. पोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. काठमोरे यावेळी त्यांच्यासोबत होते.

लेखक: दीपक चव्हाण

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 9/5/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate