অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

याची लोचनी देखिला राज्याभिषेक...

याची लोचनी देखिला राज्याभिषेक...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील राज्याभिषेक सोहळा हा अतुलनीय, सुवर्ण अक्षरांनी ‍इतिहासात नोंदविलेला क्षण आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी तसेच राष्ट्रनिर्माणात भूमिका निभावणाऱ्‍या प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी असा प्रसंग आहे.

छत्रपती शिवाजी महारांजाचा राज्याभिषेक सोहळा हा 16 व्या शतकात झाला त्यामुळे तो आपल्याला जर अनुभवायचा असेल तर तो शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकांमधून, जुन्या मराठी सिनेमातून, दूरचित्रवाणीवरील शिवाजी महाराजांवरील आधारित मालिकेमधून अथवा नाटकातून बघता, ऐकता येऊ शकतो. मात्र, हा प्रसंग कायमस्वरुपी मनात कोरून ठेवण्याची संधी मिळाली. ती, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात शिवाजी महाराजांवरील प्रदर्शनीमुळे.

महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, यांनी शिवाजी महाराजांवर केलेले संशोधन जगजाहीर आहे. त्यांनी केलेला अभ्यास आणि लिहिलेल्या पुस्तकावर सतत 15 वर्षे शिवाजी महाराजांवर अनेक चित्रे काढल्यानंतर या विशिष्ट विषयांवर आधारीत प्रदर्शन उभे राहीले. ही माहिती या प्रदर्शनीचे संकल्पनाकार दीपक गोरे यांनी दिली. या प्रदर्शनीत एकूण 123 थ्रीडी, ऑईल पेंटने काढलेले चित्र आहेत. या प्रदर्शनाला छत्रपती शिवराय महोत्सव असे नाव देण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे हे प्रदर्शन प्रथमत: मुंबईतील जहांगीर कला दालनात झाले होते, ज्याचे उद्घाटन मा.राज्यपाल आणि मा.मुख्यमंत्री यांच्याहस्ते झाले होते आणि त्यानंतर हे दुसरे प्रदर्शन जे राष्ट्रीय राजधानीत झाले. ही सर्व चित्र शिवाजी महाराजांशी संबंधित त्यांच्या कार्यकाळातील तसेच त्यांच्या समकालीन व्यक्तीमत्वांची आहेत. ही चित्र चित्रकार श्रीकांत आणि गौतम चौघुले यांनी काढलेली आहेत. यामध्ये सर्वात मोठी चित्र शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांशी संबधित आहेत. ती 9 फूट उंचीची आहेत. अन्य चित्रही 5 ते 6 फुटांची आहेत. प्रत्येका चित्राच्या बाजूला माहितीपर ओळी लिहिलेल्या आहेत. चित्र बघताना व मजकूर वाचतांना रोमांचित झाल्यासारखेच जाणवते.

राज्याभिषेकाच्या समयी भारावलेल्या डोळ्यांनी, सजगतेने एक-एक पाऊल सिंहासनाकडे चालतांनाचा प्रत्येक क्षण चित्रकाराने ज्या बारकाव्याने दर्शविला आहे त्याला मानाचा मुजरा दिल्याशिवाय राहवत नाही. शिवाजी महाराजांची नीती, नीतिमत्ता, धोरण, लोकप्रशासन, आरमार कौशल्य, व्यापार कौशल्य, गडांची बांधणी, जनतेवरील अपार प्रेम, जनतेचा निस्सीम स्नेह हे सर्व या चित्र प्रदर्शनीतून दाखविले आहे. शिवाजी महाराजांचे तेजस्वी रूप चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून पाहतांना धन्य झाल्याची अनुभूती होते. लोककल्याणासाठी राष्ट्रनिर्मितीची संकल्पना मांडणारा रयतेचा राजा कोणी असेल तर ते शिवाजी महाराजच.

या चित्र प्रदर्शनीची खास बात आहे ती रायगडांची चित्र, रायगड हा सर्व दिशांनी कसा दिसतो याची मनोहर चित्र काढलेली आहेत. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वीच दख्खन काबीज केले होते. राज्याभिषेकानंतर उत्तरेवर स्वारी करण्यासाठी सज्ज असलेल्या फौजा तसेच कोणत्याही सीमा नसणारा नकाशा न्याहाळतांना शिवाजी महाराजांचे चित्र, खूप काही सांगून जाते. प्रत्येका चित्रातून तत्कालिन परिस्थितीचे दर्शन घडते, रायगडावरील बाजारपेठ समृद्धता आणि अलौकिकता वर्णन करते.

शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्या महाराष्ट्रात होणे हे आपले परम भाग्यच. मातृभूमीप्रेम, देशप्रेम, स्वराज्य, हे जसे शिवाजी महाराजांच्या नसानसातून वाहत होते. त्यांच्या सोबत काम करणाऱ्‍या सेनापती, सैनिक, मावळे यांच्यापुढे एवढे आदर्श व्यक्तीमत्व होते की, त्यांच्या ठायी आपल्या राजाच्या मागे जाण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा पूर्ण भारावलेला वाटतो. मातृभूमीवरील प्रेम आणि तीच प्राथमिकता या सर्व भाव-भावनांचे चित्र प्रदर्शन या शिवरायांवरील प्रदर्शनीतून दिसून आले.

लेखिका - अंजू निमसरकर-कांबळे

माहिती अधिकारी

9899114130

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate