अजिंक्य टायर्स रिट्रेडर्स प्रा.लि.कंपनीत काम करणाऱ्या वडीलांनी ही कंपनी विकत घेतली. परंतु मोटर न्युरॉन डिसीजने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 25 वर्षांची सायली बबन सोनावणे सासर, माहेर दोन्ही सांभाळून वडीलांची कंपनी समर्थपणे सांभाळत आहे. जीवनाच्या खडतर मार्गावरील सायलीचा हा प्रवास निश्चितच सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने सायलीची ही यशोगाथा...
1987 साली वसंत धायगुडे यांनी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अजिंक्य टायर्स रिट्रेडर्स प्रा.लि.कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये दिवंगत बबन सोनावणे हे विपणन व वितरणाचे काम करत होते. श्री.धायगुडे यांनी ही कंपनी बरीच वर्षे कंपनीसाठी काम करणाऱ्या श्री.सोनावणे यांना विक्री करण्याचे ठरविले. 2006 साली श्री.सोनावणे यांनी ही कंपनी विकत घेतली आणि श्री.धायगुडे हे परदेशी निघून गेले. ही कंपनी यशस्वीपणे वाटचाल करत असतांनाच श्री.सोनावणे यांना मोटर न्युरॉन डिसीजने ग्रासले. यामध्ये स्नायुंची शक्ती क्षीण होत गेली. या दरम्यान वडीलांच्या ठिकाणी सायली कंपनीत काम करु लागली. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे शिक्षण घेत असतांनाच तिचा सूरज जगताप यांच्याशी विवाह झाला. यानंतर काही दिवसांतच तिच्या वडीलांचा मृत्यू झाला.
मोठी जबाबदारी अंगावर पडलेल्या सायलीने शिक्षण अर्धवट सोडून सायलीने कंपनीसाठी स्वत:ला वाहून घेतले. आई लहान बहीण व भाऊ ही माहेरची जबाबदारी आणि सासरची जबाबदारी अशा दोन्ही जबाबदारी उचलत अजिंक्य टायर्स रिट्रेडर्स प्रा.लि.कंपनीची वाटचाल तिने समर्थपणे सुरु ठेवली आहे. दहा कामगारांच्या बळावर ती आज पूर्ण क्षमतेने कंपनी चालवते. एका दिवसात आठ ते दहा आणि जास्तीत जास्त पंधरा टायर रिमोल्ड केले जातात. यामध्ये मोठे ट्रॅक्टर, जेसीबी, क्रेन, ट्रक यांच्या बरोबरच छोट्या वाहनांच्या टायर्सचा यामध्ये समावेश असतो.
गेल्या एकवीस वर्षांच्या कालावधीत कंपनीची वाटचाल विश्वसनीय सेवेच्या आधारावर यशस्वीपणे सुरु आहे. याबाबत सायली सोनावणे म्हणते महिला कोणत्याही कामात कमी पडत नाही. केवळ तिला मार्गदर्शन, प्रेरणा आणि आधाराची गरज असते. मला माझ्या वडीलांनी मार्गदर्शन, प्रेरणा दिली आहे. तर पती सूरज यांनी आधार आणि स्वातंत्र्य दिले आहे. या जोरावरच आणि कामगारांच्या बळावर कंपनीची घोडदौड सुरु आहे.
सायली सोनावणेचे हे उदाहरण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.
लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/31/2023
स्वच्छतेसाठी कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची गरज ना...
८ मार्च हा जागतिक महिला दिवस फक्त त्या दिवसा पुरता...