অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून पोलीसांचे कार्य - विरेश प्रभू

वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून पोलीसांचे कार्य - विरेश प्रभू

म.पो... महाराष्ट्र पोलीस.. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. पोलीस दल हे शासनाच्या नेतृत्वाखाली लोकांच्या संरक्षणासाठी असणारे असे भक्कम दल आहे, ज्यांच्यावर सामान्य नागरिकांपासून ते महनीय व्यक्तींपर्यंत सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी असते. उन्हातान्हात, पाणी-पावसात, वादळ-वाऱ्याला झुंज देत आपले महाराष्ट्र पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. मोर्चा असो किंवा आंदोलन, राजकीय सभा असो किंवा दंगल आपल्या पोलिसांना सतत जागरूक राहून त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यात आषाढी एकादशी म्हटले तर, डोळ्यासमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी! भक्तीचा उत्सव, या वारीला सर्व ठिकाणाहून लाखो वारकरी येत असतात. या यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राखून नियोजनबद्ध वारी पार पडण्याचे मोठे काम सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विरेश प्रभू यांनी केले आहे. याबाबत दिलखुलास या कार्यक्रमातून त्यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कायदा आणि सुव्यवस्था चोख राखून यावर्षीचीही आषाढी वारी सुरळीतपणे पार पडली या यशस्वी नियोजनाबद्दल काय सांगता येईल ?

उत्तर – महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून आषाढी वारीकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या सर्वच भागातून तसेच राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक वारीसाठी पंढरपुरात येत असतात. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून पोलीस दल सर्वतोपरी नियोजन करत असते. सर्व नियोजन करून कायदा व सुव्यस्था प्रस्थापित करणे हे एक मोठे आव्हान असते, अशावेळी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र आणून बैठकीचे आयोजन करण्यात येते. विविध कामाची विभागणी करून प्रत्येक विभागाशी समन्वय साधून नियोजन केले जाते. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, आणि पोलीसदल यांच्याशी संपर्क साधून कामकाजाचे नियोजन करण्यात येते. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी आषाढी एकादशीमध्ये बंदोबस्त केला आहे. त्यांना वारीत नियोजन करताना येणाऱ्या अडचणींची माहिती असते. अशा अनुभवी कॉन्स्टेबल, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पूर्व नियोजन केले जाते.

पंढरपूर यात्रेनिमित्त स्थानिक सार्वजनिक व्यवस्थेवर अतिरीक्त ताण येत असतो त्याचे योग्य नियोजन कसे केले जाते?

उत्तर – आषाढी एकादशीच्या निमिताने १० ते १२ लाख भाविक पंढरपूरात येत असतात. वारीत सहभागी झालेले लोक ७०० किलोमीटर चालत येत असतात. अशावेळी वारकऱ्यांसोबत पाणीव्यवस्था, आरोग्यासाठी रुग्णवाहिका, राहण्यासाठी लागणारे तंबू असणारी गाडी, अशी अनेक वाहने असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत जवळपास २८०० वाहने येत असतात. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीत १५०० वाहने येत असतात. अशा वाहनांना पासेस उपलब्ध करून दिले जातात. सार्वजनिक व्यवस्थेवर ताण येऊ नये. यासाठी २ महिने आधीच योग्य नियोजन केले जाते.

वारी दरम्यान वाहतुकीची व्यवस्था चोख राखण्यासाठी काय करता?

उत्तर – सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून किती भाविक येत असतात. याचा अंदाज घेऊन आकडेवारी काढली जाते. सोलापूर ते पंढरपूर जवळपास ८० कि.मी. अंतर ६ दिवस चालून लोक वारीच्या ठिकाणी पोहोचत असतात. जवळपास ६ हजार गाड्या त्यांच्या सोबत असतात. एकतर्फी वाहतूक असल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान असते, एका बाजूने वारकरी चालतात आणि दुसऱ्या बाजूने वाहतूक चालू राहते. अशाप्रकारे वाहतुकीची कोंडीही होत नाही. म्हणूनच विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक व्यवस्था वळवून आम्ही पर्यायी व्यवस्था निर्माण करतो. वारीने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूने गाड्या जात असतात. तर डाव्या बाजूने वारकऱ्यांसाठी वाट मोकळी करून दिली जाते. एकमेव रस्ता असल्याने योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. एकही चूक झाली तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. याशिवाय पोलीस बंदोबस्तात बदल करून दुचाकी स्वार पोलिसांचा समावेश वारीच्या नियोजनासाठी करण्यात येतो. ११० बाईकस्वार पोलीस असतात. शिवाय संपूर्ण वारीत सुव्यवस्था पार पडण्यासाठी ४५० पोलीस बाईक वर बंदोबस्तासाठी असतात. रस्त्यांची माहिती घेऊन क्रेन आणि जेसीबीची मदत देखील घेतली जाते. शिवाय स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीनेही वारी सुखकर करण्यास मोठी मदत होत असते.

लेखिका: अमृता आनप, मुंबई

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate