অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अभिवादन

वंदन

अभिवादन म्हणजे एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्तिसमुदायाने सामाजिक मूल्यांस व भावनांस अनुसरून एखादी व्यक्ती अगर राष्ट्रीय ध्वजासारख्या पूज्य वस्तू यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरिता केलेले वंदन, नमस्कार अगर तत्सम आचार होय. आदरणीय वा स्वतःपेक्षा उच्च सामाजिक स्थानावर असलेली वा उच्च वा समान दर्जा असलेली वा पूज्य अशी व्यक्ती अगर समोर दिसत असलेली प्रतीकात्मक वस्तू अभिवादनास पात्र होय. अभिवादन करण्याची प्रथा सर्व समाजांत सर्व काळी दिसून येते. व्यक्तीला उद्देशून केलेल्या अभिवादनास प्रत्युत्तर म्हणून त्या व्यक्तीकडून अभिवादन करणाऱ्यास प्रत्यभिवादन, अभय किंवा आशीर्वाद दिला जातो. दैवी शक्तीचे प्रतीक समजून काही वस्तूंना केलेल्या अभिवादनास प्रत्युत्तर म्हणून अभिवादन करणाऱ्यास त्या दैवी शक्तीची कृपादृष्टी लाभते, अशी भावना समाजात रूढ असते. कोणी कोणाला, केव्हा, कोणच्या पद्धतीने अभिवादन करावे, हे त्या त्या व्यक्तींच्या सामाजिक स्थानांवर, दर्जांवर, परस्परसंबंधांवर, नात्यांवर आणि विशिष्ट प्रसंगांवरही अवलंबून असते.

अभिवादनाची प्रथा

अभिवादनाची प्रथा ही सांस्कृतिक आहे. सामाजिक संस्कृती आणि मूल्ये बदलतील तसे अभिवादनाच्या पद्धतींमध्ये आणि कोणाला अभिवादन करावे, कसे करावे इ.  नियमांतही फरक पडणे साहजिक आहे. अभिवादन हे व्यक्तींच्या सामाजिक स्थानांवर अवलंबून आहे असे म्हटल्यावर, एखाद्या समाजात दैनंदिन व्यवहारात परस्परसंबंध असलेल्या दोन व्यक्तींना एकमेकांचे सामाजिक स्थान अवगत असेल, तेव्हाच अभिवादनाची क्रिया योग्य रीतीने होऊ शकते. अभिवादनाने एकमेकांचा परिचय दृढ होण्यास अगर ओळख होण्यास मदत होते. नागरी समाजात भिन्न संस्कृतींचे असंख्य लोक एकत्र वावरत असतात. एकमेकांचा परिचय असतोच असे नाही. परिचय नसताना कोणी कोणाला अभिवादन करताना दिसत नाहीत. त्याची गरजही नसते. परंतु गरज उत्पन्न झाली असता परिचय नसूनही अभिवादनास गरजू व्यक्ती प्रथम प्रारंभ करते.

अभिवादन ही मुख्यत्वे विषम सामाजिक स्थानांवरील व्यक्तींमधील क्रिया असली तरी समान सामाजिक स्थानांवरील व्यक्तींनी एकमेंकाना अभिवादन करण्याची प्रथाही सर्व समाजांत आढळते. अशा संदर्भात अभिवादनाचे प्रत्युत्तर अभिवादनानेच मिळते. अभिवादन करणाऱ्या आणि ते स्वीकारणाऱ्या व्यक्तींची ओळख होऊन, परिचय वाढून, सामाजिक जवळीक निर्माण होते.

अभिवादन हा सांस्कृतिक आचार असल्यामुळे अभिवादनाचे प्रकार समाजानुरूप भिन्नभिन्न आहेत. आर्यांमध्ये हात जोडून, मिठी मारून वा हस्तांदोलन करून अभिवादन करीत. एस्किमोंमध्ये नाकाला नाक घासून अभिवादन करण्याची प्रथा आहे. यूरोपीय आप्तांमध्ये गालाचे वा मस्तकाचे चुंबन घेऊन अभिवादन करतात. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणाऱ्याला शांतताचुंबन (किस ऑफ पीस) घ्यावयास सांगतात. साष्टांग प्रणिपात, पादस्पर्श,मस्तक वाकविणे, कंबरेपर्यंत वाकणे, पाठीवर हात ठेवणे, जवळ घेणे हेही अभिवादनाचेच प्रकार दर्जानुसार असतात. गुडघे टेकून नतमस्तक होणे ही हिब्रू पद्धत आहे. काही समाजांत डोके उघडे ठेवून सामोरे जाणे, अभिवादनपद्धतीमध्ये अनादराचे लक्षण मानतात. टोपी वा पागोटे काढणे, पायातील जोडे काढून ठेवणे, हे अभिवादन करताना कोणी आवश्यक मानतात. प्राचीन काळी रोममध्ये दोन प्रतिपक्षांमध्ये समझोता व्हावा अथवा करार व्हावा ह्या हेतूने हस्तांदोलन करीत. अरब लोकांमध्ये जमिनीला हात लावल्यानंतर तोच हात ओठांना वा कपाळाला लावून अभिवादन करतात. 'टोगन'लोकांत टोळी-प्रमुखाच्या वर्चस्वाखाली असल्याची भावना व्यक्त करताना, त्याच्या पायाच्या तळव्यांना स्पर्श करावा लागे. गुलामांना मालकापुढे अभिवादन करताना थरकाप झाल्यासारखे वा असहाय झाल्याचे दर्शवावे लागे.

अभिवादनाचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन प्रकार आहेत. संध्याकाळी, कालांतराने एकमेंकाची प्रथम भेट होताना, गावाला निघताना वा गावाहून आल्यावर, वरिष्ठ मंडळींना अभिवादन करण्यात येते. शुभकार्यास निघताना वरिष्ठ, गुरू वा आदरणीय व्यक्तींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागणे, हे अभिवादनाचेच लक्षण होय. अभिवादन करताना हातपाय कसे ठेवावेत, किती वाकावे इत्यादींबाबतचे नियम प्रत्येक जातीयासाठी भिन्न असत.

बऱ्याच दिवसांनंतर मित्रमंडळी वा आप्तमंडळी भेटली की एकमेंकाना मिठी मारणे हाही अभिवादनाचाच प्रकार मानला जातो. अशाना परस्परांबद्दलचा जिव्हाळा व्यक्त होतो.

अभिवादन करताना आचारासोबत काही उच्चार व शब्द यांचाही उपयोग करण्यात येतो. भारतीयांत 'नमस्कार', शीख लोकांत 'सत्-श्री अकाल', मुसलमानांत 'सलाम आलेकुम' वा'आलेकुम सलाम', इंग्लीश लोकांमध्ये 'गुडमॉर्निंग', 'गुडलक', 'हाउ-डू-यू-डू' इ. भिन्न प्रकार सर्वपरिचित आहेत. साधारणपणे यूरोपीय राष्ट्रांतील अभिवादन-पद्धती एकाच प्रकारची दिसते.

लेखक: मा. गु. कुलकर्णी ; सुधा काळदाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate