काहीतरी करुन दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर धूळही वाया जात नाही, असे म्हणतात. याची प्रचिती गोंदिया जिल्ह्यात येत आहे. आतापर्यंत केवळ मातीपासून विटांची निर्मिती होत असे, पण आता प्रथमच कोळशाच्या राखेपासून विटांची निर्मिती करणारा उद्योग गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील जयेंद्र पटले यांनी यशस्वीरित्या चालू केला आहे.
अत्यंत बेताची कौटुंबिक परिस्थिती, बेरोजगारी, अपूरे शिक्षण व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या जयेंद्र पटले यांना अस्वस्थ करीत होत्या. कुठलाही व्यवसाय कसा करावा, प्रशिक्षण कसे घ्यावे, कच्च्या मालासाठी येणारा खर्च असे असंख्य प्रश्न त्यांना भेडसावत होते. पण म्हणतात ना, 'इच्छा तेथे मार्ग' सापडतोच. अथक प्रयत्नातून त्यांनाही एक नवा मार्ग गवसला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कोळशाच्या राखेपासून विटा बनविण्याच्या उद्योगाबाबतचे प्रशिक्षण त्यांनी घेतले व पूर्वीच्या विटा बनवण्याच्या व्यवसायाला नव्या कल्पनेतून नवे रुप दिले.
जाळलेल्या कोळशाची राख, जिप्सम, वाळू, सिमेंट, चूना यांच्या मिश्रणातून ह्या विटा बनविण्यात येतात. जिल्हा उद्योग केंद्रातून या विटा बनवण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. ह्या उद्योगाकरीता आवश्यक मशिन व इतर कच्च्या मालाकरीता जिल्हा उद्योग केंद्रातर्फे केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 25 ते 30 टक्के अनुदान देण्यात येते. एवढेच नव्हे तर उद्योग चालू करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यास बँकेकडून लोन देण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.
विटा बनविण्यासाठी लागणाऱ्या राखेचे प्रमाण बघता एवढी राख कोठून व कशी आणायची असाही प्रश्न पटले यांच्या समोर उभा ठाकला. त्यांच्या या समस्येचे निराकरणही अगदी सहज झाले. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या कोळशाची राख या उद्योगासाठी पुरविण्यात येत आहे.
फ्लाय ॲश, जिप्सम, वाळू, सिमेंट, चुना सर्व प्रमाणशीर एकत्र करुन वीट बनविण्याच्या मशीनमध्ये हे मिश्रण टाकून 70 टन फ्लाय ॲश ब्रीक्स प्रेशर मशिनद्वारे प्रेशर दिल्या जाते व विटा तयार करण्यात येतात.अत्यंत अल्पावधीत जयेंद्र पटले निर्मित विटांची मागणी वाढली असून गोंदिया एमआयडीसी व शहरातील इतर बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात विटांची विक्री सुरु झाली आहे.
लाल विटांनी केलेल्या बांधकामाचे आयुष्य बघता या विटांची मागणी बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जयेंद्र पटले फक्त उद्योग यशस्वी करुनच थांबले नाहीत तर या उद्योगाचा आधारे त्यांनी त्यांच्या कारखान्यामध्ये 15 स्त्री-पुरुषांना रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे. महिन्याकाठी 60 हजार रुपये निव्वळ नफा कमावणाऱ्या या उद्योगामध्ये त्यांच्या पत्नी श्रीमती कांता पटले यांचेही मोलाचे योगदान आहे. बिकट आर्थिक परिस्थितीचे जुने दिवस आठविताना त्यांना समाधान या गोष्टीचे आहे की आज जयेंद्र पटले स्वत: यशस्वी उद्योजक असून या उद्योगाच्या आधारे त्यांनी अनेकांना खंबीरपणे उभे केले आहे.
राख व सिमेंटपासून निर्मित विटांमुळे अनेक इमारतींचा पाया मजबूत बनला आहे. जयेंद्र पटले यांचे जीवनमान उंचावले आहे. भविष्यात या उद्योगाचे रुपांतर वटवृक्षात करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल यात शंकाच नाही. कोळशाच्या राखेपासून विटा बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर हा व्यवसाय सुरु केला.
शासनाच्या या योजनेमुळे या उद्योगाच्या माध्यमातून स्वत:ला यशस्वीपणे उभे करण्याचा प्रयत्न केला. याबाबत समाधान तर आहेच, त्याचबरोबर व्यवसायातील नफ्याचे प्रमाण वाढल्यानंतर अनेकांचा आर्थिक पाया भक्कम करु शकलो याचेही मोठे समाधान असल्याची भावना जयेंद्र पटले यांनी व्यक्त केली आहे.
लेखक -पल्लवी धारव, जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर ...