गटारमुक्त गावांसाठी टेंभुर्णीचा बंदिस्त शोषखड्ड्यांचा पॅटर्न नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी-पावनमारी गटग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रल्हाद पाटील यांनी गटारमुक्तीचा आणि गावाला आरोग्यदायी ठेवण्याचा अनोखा उपक्रम यशस्वी केला आहे. टेंभुर्णीत पोहचलात, की तुम्हाला कुठेही सांडपाण्याचा टिपूस दिसत नाही. गटारीच दिसत नाहीत, तर त्यावर घोंघावणाऱ्या माशा, डास कसे दिसतील.
अगदी सार्वजनिक हातपंपाच्या आसपासही दलदल, काळेपाणी आणि त्यात वळवणारे किडे असे चित्र नाही. हातपंपाला पाणीच नाही असे वाटावे, अशी स्थिती. पण एक-दोनदा हापश्याला पंप केले की धो-धो पाणी. गावातील प्रत्येक कुटुंबाचं सांडपाणी शोषखड्ड्यांद्वारे जमिनीतच मुरवण्याचा आगळा पॅटर्न टेंभुर्णीचे उपसरंपच आणि स्थापत्य अभियंता असलेल्या श्री. पाटील यांनी शोधून काढला आहे.
शोषखड्डा म्हणजे, खड्डा खोदून, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे दगड-गोटे, वाळू-खडी किंवा विटांचे तुकडे, दगड यांची भरणी करायची...आणि त्यावर द्यायचे सोडून पाणी, ही पारंपारीक पद्धत. पण कालांतराने हा खड्डाही निकामी होतो. हे अभियंता असलेल्या श्री. पाटील यांच्या नजरेत आले. त्यावर त्यांनी उपाय शोधणे सुरु केले. तो त्यांना सापडला. अगदी स्वस्तात आणि सोपा पण प्रभावी. हा त्यांचा बंदिस्त आणि फिल्टर्स लावलेल्या शोषखड्ड्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. अगदी कमी खर्चात, परिसरातीलच साधन सामुग्री वापरून शोषखड्ड्यांचा हा प्रयोग राबवला आहे. त्यामुळेच टेंभुर्णीत गेल्यावर तुम्हाला एखाद्या अनेक घरांनी मिळून बनलेल्या एका मोठ्या घराच्या लख्ख अंगणात गेल्याचा भास होतो.
या बंदिस्त शोषखड्ड्यांच्या आणि फिल्टर्सपद्धतीबाबत श्री. पाटील यांनी दिलेली माहिती अशी, टेंभुर्णी गाव शंभर टक्के शौचालययुक्त झाले. त्यासाठी निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला. या निर्मल ग्रामपुरस्कारासाठी सांडपाण्याच्या निर्गतीसाठी शोषखड्ड्यांच्या वापराचाही निकष होता. त्याप्रमाणे शोषखड्डेही घेतले. पण कालांतराने हे खड्डे गाळाने, भरून त्यातून पाणी जमिनीत मुरण्यालाच प्रतिबंध होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे शोषख़ड्डयांवरच पाणी साचू लागले. त्याचीच दलदल आणि लोकांनाही कटकट वाटू लागली. त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. तो सापडलाही. आता शोषखड्डे साधारणतः नेहमीच्या आकारातच म्हणजे 3 ते चार फूट रुंद आणि तेवढेच खोल घेतले जातात.
हा खड्डाही खालून शोषखड्डयाच्या विहीत पद्धतीने एका फुटापर्यंत कठीण मुरूम, त्यावर मऊ मुरूम आणि त्यावर मोठ्या आकाराचे दगडगोटे अशा पद्धतीने भरू घेतले जातो. पण यात जेथे पाणी सोडणारा नळ किंवा तोटी असते, त्याठिकाणी ते पाणी थेट खड्ड्यात सोडून दिले जात नाही. तर ते एका शुद्धीकरण किंवा गाळ एकत्र करण्यासाठीच्या पात्रात सोडून दिले जाते. या पात्रासाठी किंवा फिल्टर भांड्यासाठी दिड ते दोन फूट व्यासाची सिमेंटची टाकी, किंवा दंडागोलाकार सिमेंट पाईप, किंवा अगदी आपल्याजवळ उपलब्ध असेल अशी सामुग्री म्हणजे जुना रांजण, माठ किंवा तत्सम् वस्तू वापरता येते. या टाकीला किंवा रांजणाला वरच्या बाजूने सहा ते आठ इंच अंतरावर चोहोबाजूंनी छोटी-छोटी छिद्रे पाडली जातात. असे हे भांडे किंवा पात्र शोषखड्ड्यात बसवले जाते. जेणेकरुन सांडपाणी या पात्रात एकत्र केले जाईल.
अशा पद्धतीमुळे सुक्ष्म गाळ, डिटर्जंट आणि भांडी, आंघोळीचे पाणी यातून येणारा मळ, कचरा या गोष्टी या पात्राच्या तळाशी जाऊन स्थिर होतात. वर पडणारे पाणी मात्र स्वच्छ आणि गाळमुक्त होऊन, वरच्या छिद्रातून शोषखड्ड्यात पडते. यामुळे गाळ शोषखड्ड्यात न गेल्यामुळे, पुर्ण खड्डाच गाळामुळे निकामी होण्याचा, पाणी खाली न मुरण्याचा धोकाच कमी होतो. वरच्या पात्रातला गाळ छिद्रांपर्यंत पोहल्याचेही पात्र भरल्यानंतर लक्षात येते. हा गाळ काढला, की ते उत्तम खत म्हणूनही वापरता येते. शेतात, झाडांना, परसबागेलाही वापरता येते. या पद्धतीमुळे शोषखड्डा वर्षांनुवर्षे आपले काम करतो. हा शोषखड्डा वरून पुर्ण बंदिस्तही करता येतो. त्यामुळे ती जागाही वापरात येते आणि दलदल, माश्या-डास यांची उत्पत्तीही टाळता येते.
टेंभुर्णी गावातील दोनशेही कुटुंबांनी अशा पद्धतीने शोषखड्डे घेतले आहेत. तेही स्वतःच्या कुटुंबांच्या कुवतीनुसार-ऐपतीनुसार. काही खड्डे साध्या प्लाँस्टीकच्या कागद,कापडांनी बंदीस्त करून, त्यावर नेहमीची माती लोटली आहे. काहींनी अगदी आपल्या घराच्या दारातील ओट्यांमध्ये, कट्टयांमध्येही शोषखड्डे बंदिस्त केले आहेत. तेही मोठे तंत्रज्ज्ञान किंवा खर्चिक साधनांचा वापर न करता.
टेंभुर्णीत सहा सार्वजनीक हातपंप आहेत. या हातपंपांचे सांडपाणी असेच बंदिस्त आणि फिल्टर्सच्या शोषखड्ड्यांत लुप्त होताना पाहून अचंबा होतो. यामुळे टेंभुर्णीत डास आणि माश्यांना आश्रयच नाही. त्यामुळे आरोग्यदायी आणि खरेच निर्मळ म्हणावी असे चित्र दिसते. गावठाणच कमी, त्यामुळे गावातील जनावरांचे गोठेही गावाबाहेर नेण्यात यश आले आहे. गावातील प्रत्येक घरात शौचालय. मिळेल त्या जागेत, कमी खर्चात शौचालयांची उभारणी केली गेली आहे. त्याचप्रमाणे आता शोषखड्डेही वापरात आहेत. जागा नसेल, त्यांच्यासाठी घरातच न्हाणी घरातच शोषखड्डा घेऊन तो प्रयोगही यशस्वी झाल्याचे श्री. पाटील सांगतात. टेंभुर्णीतील घरा-घरात अशा प्रकारे आता आरोग्यदायी स्थिती आहे. शोषखड्ड्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे टेंभुर्णीतील भुजलस्तराची स्थितीही सुधारली आहे. पावसाचे पाणीही या शोषखड्ड्यांवाटे मुरवण्याचा प्रयोगही काही घरांनी केला आहे. गावातल्या घरा-घरात या शोषखड्ड्यांच्या वापराबाबत जागरुता निर्माण झाली आहे. त्यातूनच एका घरातील गृहीणीने कपडे धुण्याच्या ठिकाणचे पाणीही शोषखड्ड्यात कसे जाईल यासाठी प्रयत्न केला आहे तोही नजरेस पडला की, टेंभुर्णीतील शोषखड्ड्यांचा प्रयोग मनात ठसतो.
उपसरपंच पाटील आणि सरपंच श्रीमती सुचेताबाई माने यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी गावाने गटारमुक्तीचा वस्तुपाठच घालून दिला आहे. सांडपाणी व्यवस्थापन ही वाढती लोकसंख्या आणि घरांची दाटी यामुळे जटील समस्या बनते आहे. कुणाचे पाणी कुणाच्या दारात यावरूनही वाद होतात. त्या वादांनाही टेंभुर्णीत थाराच नाही. गावात फेरफटका मारताना, एका ज्येष्ठ नागरीकाने पैजेच्या सुरातच सांगितले, टेंभुर्णीत रात्री उघड्यावर झोपल्यावर किंवा अगदीच उघड्याने झोपल्यावर एकाही डासाचा त्रास झाला, तर दाखवून द्या. इतका आत्मविश्वास नागरिकांच्या या गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्नात आहे.
टेंभुर्णीचे उपसरपंच प्रल्हाद पाटील स्थापत्य अभियंता आहेत. ते नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर, त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून ग्रामविकास क्षेत्रात प्रवेश केला. शोषखड्ड्यांच्या या प्रयोगासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यासह, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी नुकताच टेंभुर्णीची पाहणी करून, त्यांना प्रोत्साहन दिले. शोषखड्ड्यांचा या नव्या पॅटर्नचा नांदेड जिल्ह्यासह, राज्यभर नव्हे देशभर वापर व्हावा, अशी श्री. पाटील यांची तळमळ आहे. त्यासाठी तेही ज्या-ज्या ठिकाणांहून मार्गदर्शनासाठी विचारणा होते, त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करत असतात, माहिती देत असतात.
टेंभुर्णी-पावनमारी ग्रामपंचायतीने निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, सावकारमुक्त, कुऱ्हाडबंदी, विजबिल थकबाकी मुक्त, चराईबंदी म्हणून ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर ग्रामसमृद्धी योजनेत शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टही सुमारे अठराशेहून अधिक झाडांची लागवडीने साध्य केले आहे. गावात गुटखाबंदी, दारुबंदीही आहे. घरोघरी शौचालयातून निर्मल ग्रामपुरस्कार तर मिळालाच आहे, पण आता घर तिथे शोषखड्डा यामुळे गटारमुक्त आणि डासमुक्त संकल्पना राबवण्यातही टेंभुर्णीने पुढचे पाऊल टाकले आहे.
टेंभुर्णीतील गटारमुक्त आणि तोही विना-खर्च पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी आता दूर-दूरवरून नागरीक येऊ लागले आहेत. आतापर्यंत अशा दोनशेहून अधिक गावातील नागरिकांनी टेंभुर्णीच्या शोषखड्ड्यांच्या पॅटर्नची माहिती घेण्यासाठी भेट दिल्याचे टेंभुर्णीकर अभिमानाने सांगतात.टेंभुर्णीची वैशिष्ट्ये... मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील गाव. पैनगंगा नदीच्या तीरापासून तीन किलोमीटरवर वस्ती. गावाची लोकसंख्या नऊशे पन्नास.
कुटुंब संख्या 200. पैनगंगेच्या महापुरामुळे विस्थापित गावाला, चार एकर क्षेत्रावर पूनर्वसित करण्यात आले. जिल्हा परिषदेची शाळा आणि ग्रामपंचायतीची टूमदार इमारती. जवळगावकडून जाताना एका प्रशस्त कमानीतून दोहोबाजुला असलेल्या झाडांच्या शिस्तबद्ध रांगेतून टेंभुर्णीत प्रवेश होतो. संपर्कासाठी टेंभुर्णी-पावनमारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभियंता प्रल्हाद पाटील यांचा भ्रमणध्वनी नंबर 9527815559. -
निशिकांत तोडकर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020