राज्यातील युवक व युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान म्हणजे आर्थिक सक्षमता प्रदान करणारे मूलभूत केंद्र ठरले आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियान’ यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना आजपर्यंत विविध क्षेत्रात रोजगार प्राप्त झालेला आहे. प्रशिक्षणानंतर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने युवकांना आर्थिक संपन्नता मिळते. त्यामधूनच युवावर्ग स्वत:च्या विकासासोबतच देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहे. यामुळेच देशाच्या विकासाची वाटचाल अधिक समृध्द होत आहे.
कौशल्य विकास अभियांतर्गत 18 ते 45 वयोगटातील किमान 5 वी उत्तीर्ण असलेल्या व त्यापुढील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य विकासाचे विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. गारमेंट, ब्युटिशियन, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, आयटी, संगणक, डिजिटल फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, बांधकाम, सिक्युरिटी, इलेक्ट्रॅानिक्स, प्लंबर आदी विविध क्षेत्रामधील प्रशिक्षण या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमाप्र, इमाव, खुला वर्ग, अल्पसंख्यांक व प्रकल्पग्रस्त अशा सर्व प्रर्वगातील युवक व युवतींना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. यामुळे सर्वच स्तरातील उमेदवारांना प्रशिक्षणासाठी समान संधी प्राप्त झाली आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामधीलच एक नागपूर जिल्हा. जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणींनी यामार्फत प्रशिक्षण घेऊन आपला आर्थिक विकास साधला आहे. त्यामधील काहींच्या यशस्वी वाटचालीची यशकथा त्यांच्या मनोगताने.....
बारावीपर्यंत माझे शिक्षण झालेले आहे. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मी पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हते. एके दिवशी वृत्तपत्र वाचत असतांना मला कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती मिळाली. सदर प्रशिक्षणामध्ये मी Banking and Accountting या माझ्या आवडीच्या विषयातील प्रशिक्षण पूर्ण केले. या कोर्सविषयी परिपूर्ण माहिती प्रशिक्षण कालावधी दरम्यान मला देण्यात आली. त्यामुळेच मी नोकरीसाठी यशस्वीपणे मुलाखत देऊ शकले. कौशल्य विकास प्रशिक्षण अभियानाच्या माध्यमातून मला साक्षी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरी मिळाल्याने मी स्वत:च्या पायावर उभी राहू शकले आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुध्दा सक्षम होऊ शकले. हे केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळेच साध्य झाल्याने मी शासनाची खूप आभारी आहे.
मला शिक्षणाची खूप आवड होती. परंतु वडील हयात नसल्याने आर्थिक टंचाईचा सतत सामना करावा लागत असे. त्यामुळेच शिक्षण मध्येच सोडावे लागले. मात्र कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून अर्धवट राहिलेले शिक्षण मी पूर्ण करण्याचा संकल्प केला आणि मोठ्या जिद्दीने आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण या उपक्रमाच्या माध्यमातून मी पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान माझ्यामध्ये जीवनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्याचा नवा मार्ग सापडला. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती व तंत्रज्ञान या विषयामध्ये प्रशिक्षण घेऊन मला SBI क्रेडीट कार्ड डिव्हीजनमध्ये नोकरी मिळाली आहे. यामधूनच मी माझ्या प्रगतीची वाटचाल करीत आहे. सोबतच माझ्या कुटुंबाचा विशेषत: माझ्या आईसाठी मी आज मोठा आधार झाल्याने मनस्वी आनंद होत आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाव्दारे राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची मी खुप ऋणी आहे. तसेच युवावर्गाला स्वकर्तृत्व निर्माण करण्याची राज्यशासनाने ही संधी उपलब्ध करुन दिली, त्याबद्दल त्यांची आभारी आहे. इतर युवकांनी या अभियानाचा लाभ घेऊन आर्थिक प्रगतीसोबतच स्वत:चा सर्वांगिण विकास साधावा, असे मला मनापासून सुचवावे वाटते.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत नवनवीन कोर्सेस व त्याविषयीचे ज्ञान शिकायला मिळत आहे. माझे शिक्षण B.S.C. M.B.A. झाले आहे. या प्रशिक्षणामध्ये मी बिझिनेस ॲन्ड कॉमर्सचा कोर्स पूर्ण केला. प्रशिक्षणामध्ये असतांना प्रात्यक्षिकावर जास्त भर देण्यात आला. त्यामुळे मला नवनवीन माहिती शिकण्यास मिळाली. त्याचा उपयोग मला नोकरी मिळविण्यासाठी झाला. दोन ठिकाणी माझी निवड झाली होती. मात्र मी SAGA(Training & Outsouring) मध्ये नोकरीवर रुजू झाले. पदव्युत्तर शिक्षण झालेले असूनसुध्दा मला नोकरी मिळत नव्हती. या प्रशिक्षणानंतर मला लगेच नोकरी मिळाल्याने मी अर्थाजन करण्यास सक्षम झाले असून याविषयी मला अभिमान वाटत आहे. यामुळेच माझ्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाला धन्यवाद देते. तसेच इतर उमेदवारांना त्यांच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा देते.
शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असताना मला कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी माहिती मिळाली. यामध्ये अकाऊटींगच्या कोर्सला मी प्रवेश घेतला. प्रशिक्षणानंतर नोकरीसाठी विविध जागी मी मुलाखती दिल्या. आता साक्षी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मला नोकरी मिळाली आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणामुळेच मला नोकरी मिळाली व त्यामाध्यमातून आर्थिक सबलता मला प्राप्त झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या जीवनामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान मोलाची भूमिका बजावत आहे,असे मला माझ्या अनुभवातून जाणवले आहे.
लेखक : गणेश गव्हाळे,
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/8/2020