दोन सिमेंट नाला बांध व एका कोल्हापुरी बंधाऱ्यादरम्यान सुमारे नऊशे मीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यामुळे मौजे कातपूर (ता. जि. लातूर) येथे जलसुरक्षा निर्माण झाली आहे. नाला रुंदीकरण व खोलीकरणासाठी एकूण 16.39 लाख रुपये खर्च आला. त्यातील "आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्ट'ने 50 टक्के निधी दिला. उर्वरित 50 टक्के निधी गावकऱ्यांनी उभा केला. काटकसरीतून झालेल्या या कामाचे मूल्यांकन एका खासगी संस्थेने रु. 50 लाखांचे केले आहे. लातूर जिल्ह्यात लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच असे काम होत असावे. नऊशे मीटर लांबीचे नाला बांध खोदकाम करून तो सहा मीटर खोल करण्यात आला. नाल्याची रुंदी 35 ते 45 फूट करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील कातपूर गावाला जलसंवर्धनाची परंपरा आहे. त्याला लोकसहभागाची जोड येथील ग्रामस्थांनी दिली आहे. गावाच्या बाजूनेच लेंडी नाला वाहतो. त्यावर कृषी विभागाने 1994 मध्ये तीन व 2004 मध्ये एक असे एकूण चार सिमेंट नाला बांध बांधले. जिल्हा परिषदेनेही दोन कोल्हापुरी बंधारे बांधले. शासनाचे हे काम असले तरी पुढे गावकऱ्यांनी त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे बांधांमध्ये गाळ साचत गेला, त्याची तूट-फूट झाली. कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट चोरीला गेले. तो निरुपयोगी झाला. पुढे-पुढे गावाला पाण्याची टंचाई भासू लागली. गावातील तरुण शेतकरी लालासाहेब देशमुख यांनी ओढ्यालगतच्या शेतकऱ्यांची बैठक घेतली व जलसंवर्धन कामाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले.
जलसंधारणाच्या कामांतून समृद्धीकडे वाटचाल
गावाजवळील सिमेंट नाला बांधाजवळ पाणीपुरवठ्याची विंधन विहीर आहे. त्याचे पाणी कमी झाले होते. या नाला बांधाची दुरुस्ती जिल्हा परिषदेने केली. थोडा गाळ काढला. यामुळे विंधन विहिरीचे व आजूबाजूच्या विहिरींचे पाणी वाढले. गावकऱ्यांनी मग कोल्हापुरी बंधाऱ्याला गेट बसवण्याचे ठरवले. त्यासाठी 86 हजार रुपयांची लोकवर्गणी संकलित करून 2010 मध्ये गेट बसवण्यात आले. दुसऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडत होते; परंतु नाला अरुंद झाला होता. सन 2011 मध्ये गावकऱ्यांनी सुमारे एक लाख 86 हजार रुपये वर्गणी गोळा केली. दोन्ही कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या समोरील नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण केले. रुंदीकरणामध्ये नाल्याची रुंदी 25 मीटर झाली होती व दोन्ही काठांवर मातीचा उंच भराव झाला होता. त्याचा फायदा घेण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर आणखी सिमेंट कॉंक्रिटचे बांधकाम करून त्याला लोखंडी गेट बसवण्यात आले. यामुळे बंधाऱ्याची उंची दीड फुटाने वाढली आणि पाणी साठाही वाढला. लोकसहभागातून झालेल्या या कामांमुळे गावात आर्थिक समृद्धी येण्यास मदत झाली. बागायती क्षेत्र वाढले. दुभत्या जनावरांची संख्या वाढली. चारा पिकाखालील क्षेत्रात भर पडली. गावातून दररोज सुमारे एक हजार लिटर दूध लातूरला जाऊ लागले.
कातपूरची झाली निवड
मौजे कातपूर हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावचे माजी सरपंच लालासाहेब देशमुख हे "आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या परिवारातील आहेत. फेब्रुवारी 2013 मध्ये बंगळूर येथील संस्थेच्या आश्रमात जलजागृती करणारे शिबिर झाले होते. त्यात देशमुख व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. तेथून परत आल्यानंतर जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कोणकोणती कामे घेता येतील यावर त्यांनी विचारमंथन केले. कृषी विभागाने कातपूर येथे नाला खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम घ्यावे असे सुचवले. लोकसहभागाची चळवळ तिथे चांगली रुजल्यामुळे या गावाची निवड करण्यात आली.
लोकसहभागातून उभारली चळवळ
कातपूर गावात लोकसहभागातून बरेचसे काम पूर्वी झाले असल्याने पुन्हा जास्त प्रबोधन करण्याची गरज नव्हती. गावकऱ्यांनी लोकसहभागातून नाला रुंदीकरण व खोलीकरण करण्यासाठी वर्गणी गोळा करणे सुरू केले. यंदाच्या एप्रिलमध्ये कामाचे उद्घाटन करण्यात आले. लेंडी नाल्यावर पूर्वी सिमेंट नाला बांध व केटी वेअर झालेले होतेच. या नाल्याला गावच्या खालील बाजूला आणखी एक नाला मिळतो. या नाल्याचे प्रथम खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे ठरले. बघता-बघता सुमारे 900 मीटर नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होईल असे कोणाला वाटले नव्हते. काम जसजसे पुढे जाईल तसतसा गावकऱ्यांचा कामात सहभाग वाढत गेला. वर्गणीही वाढत गेली. काम सुरू झाले तेव्हा विरोध करणारे पुढे या चळवळीत सहभागी झाले.
विरोध करणारेच कामासाठी पुढे आले
जिल्ह्यातील सर्व तलाव कोरडे पडले होते. त्यामुळे गाळ वाहून नेण्याची मोहीम जोरात सुरू होती. यामुळे पोकलेन, ट्रॅक्टरला जास्त भाडे देऊन काम करून घ्यावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी नाल्यातील माती आपल्या शेतात टाकली. नाल्याच्या कडांवर उंच-उंच मातीचे भराव तयार झाले. कामाचे अवाढव्य स्वरूप पाहून अनेक गावांत त्याची माहिती पोचली होती. अनेक गावांतील लोक काम पाहण्यासाठी येत होते.
गावातील अनेक जण कामांसाठी झटत होते. सुरवातीला ज्या एका ग्रामस्थाने काम अडवले होते, त्याने तर सर्व काम पाहिल्यानंतर सर्वांत जास्त म्हणजे अडीच लाख रुपयांची वर्गणी दिली व पुढच्या वर्षी आमचा नाला खोलीकरणासाठी घ्या, असे सुचविले.
शिवाराची पाणीपातळी वाढली ः
काम सुरू असताना पावसाळा आला आणि काम थांबले. पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी अडले. अडलेल्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने ते जमिनीत मुरले. पाण्याने कातपूर शिवाराची शीव ओलांडली. नाल्यापासून तीन किमी परिसरातील शिकंदरपूर, बाभळगाव, शिरसी व कव्हा येथील विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. ज्या विहिरी किंवा बोअरला सप्टेंबर अखेरशिवाय पाणी वाढत नव्हते, त्यांना जुलै महिन्यातच पाणी वाढले. नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.
(लेखक लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)
----------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांनी अनुभवली जलसुरक्षा
काही प्रतिक्रिया
नाला खोलीकरण आणि रुंदीकरण करताना अनेक अडचणी आल्या; परंतु आम्ही हार मानली नाही. सुरवातीला आमच्यासोबत फार कमी लोक होते; परंतु काम दिसू लागले तसे अधिक संख्येने ग्रामस्थ आमच्यासमवेत येऊ लागले आणि वर्गणीही देऊ लागले. अन्य गावांतून लोक भेटी देऊन झालेल्या कामाचे कौतुक करतात तेव्हा केलेल्या कामाचा अभिमान वाटतो. या कामामुळे कातपूर गावाला फायदा झालाच, परंतु आजूबाजूच्या चार गावांच्या शिवारातील पाणी पातळी उंचावण्यास मदत झाली आहे.
लालासाहेब देशमुख - 9011762111
कातपूर.
----------------------------------------------------------------------
मौजे कातपूरला काम झाले, परंतु त्याचा फायदा आमच्या गावापर्यंत पोचला. कातपूरपासून माझी विहीर दीड किलोमीटर अंतरावर व उंचीवर असूनही माझ्या विहिरीचे पाणी वाढले.
भाऊसाहेब लोखंडे - 8421334658
मौजे बाभळगाव
----------------------------------------------------------------------
सिरसी गाव कातपूरपासून अडीच किलोमीटरवर आहे. कातपूरमध्ये नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे चांगला पाणीसाठा झाला. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुरले व ते आमच्या विहिरीपर्यंत पोचले. आमच्याकडे पोळ्यानंतरच विहिरीला पाणी यायचे. परंतु या वर्षी मिरगाचा पहिला पाऊस पडल्यानंतरच विहिरीचे पाणी वाढल्याचे दिसले.
महादेव शेळके - 7350076263
मौजे सिरसी.
----------------------------------------------------------------------
कातपूर नाल्यावर केलेल्या कामांचा फायदा आम्हाला झाला आणि कधी नव्हे ते जुलैमध्येच आमच्या विहिरींमध्ये पाणी उतरले. यामुळे आमचे सिंचन क्षेत्र वाढण्यास निश्चित मदत होईल.
पांडुरंग म्हस्के - 9096695262
मौजे सिरसी.
डॉ. टी. एस. मोटे
माहिती संदर्भ : अॅग्रोवन