चाऱ्यासाठी मका -
चारा पिकासाठी मक्याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद- 2 इ. जातींची पेरणी करावी. हेक्टरी 75 किलो बी वापरावे, पेरणीपूर्वी बियाण्यावर ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 गाडी शेणखत, कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्यावेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश तसेच 50 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी अशी खतांची मात्रा द्यावी.
प्रतिहेक्टरी 50 ते 60 टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.
चाऱ्यासाठी ज्वारी -
चारा पिकासाठी ज्वारीची पेरणी पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी, निळवा, एम.पी.चारी, एस.एस.जी. 59-3 या जाती निवडाव्यात. चारा पिकासाठी हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी 25 ते 30 गाडी शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्यावेळी हेक्टरी 50 किलो नत्र व 50 किलो स्फुरद व पेरणीनंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र अशी खतांची मात्रा द्यावी.
चाऱ्यासाठी बाजरी -
चाऱ्यासाठी बाजरीची पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे, चारा पिकासाठी बाजरीच्या जाएंट बाजरा, राजको बाजरा, वायफ बाजरा या वाणांची निवड करावी. हेक्टरी 10 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 गाडी शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्यावेळी हेक्टरी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 किलो नत्र अशी खतांची मात्रा द्यावी. प्रति हेक्टरी 45 ते 50 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
संकरित नेपियर गवत -
मार्च अखेरपर्यंत पेरणी करावी. लागवड 90 सें.मी. x 60 सें.मी. अंतरावर करावी. फुले जयवंत (आर.बी.एन.13) किंवा यशवंत या वाणाची निवड करावी. हेक्टरी 25,000 ठोंब लागतात. पेरणीपूर्वी हेक्टरी 30 ते 40 गाडी शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्यावेळी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 20 किलो पालाश तसेच 25 किलो नत्र प्रत्येक कापणीनंतर अशी खतांची मात्र द्यावी. प्रतिहेक्टरी 200 ते 250 टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.
चाऱ्यासाठी चवळी -
चारा पिकासाठी चवळीची पेरणी एप्रिलपर्यंत करता येते. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पेरणीसाठी श्वेता, ईसी 4216, यूपीसी 5286 या वाणांची निवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 गाडी शेणखत / कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्या वेळी हेक्टरी 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद अशी खतांची मात्रा द्यावी. प्रतिहेक्टरी 30 ते 35 टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन