जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून आपल्याला जनावरांचे वय ओळखता येते. बाजारात विक्रीकरिता आणलेल्या जनावरांचे निश्चित वय, जनावरांची आनुवंशिकता याची विक्रेत्याला माहिती नसते. अशा वेळेस त्याच्यावर किंवा मध्यस्थावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. याउलट मोठ्या सरकारी फार्मवर जनावरांचे रेकॉर्ड ठेवलेले असते. तेथे जनावरांची संपूर्ण माहिती मिळू शकते. जनावरांची खरेदी करण्यासाठी, तसेच औषधोपचारासाठी त्याचे वय माहिती असणे योग्य असते.
जनावरांच्या वयाची ओळख:
1. जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून
2. जनावरांच्या शिंगावरील वलयांच्या संख्येवरून.
3. जनावरांच्या दातांवरून.
अ)जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून ः
1) जनावरांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे या वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.
2) लहान जनावरे या गटामध्ये वासरांचा समावेश होतो. तरुण जनावरे म्हणजे आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी.
3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली.
मर्यादा ः 1. या पद्धतीमध्ये नेमके वय समजू शकत नाही.
2. बाजारात विक्रीकरिता जनावरे पाहिल्यानंतर फजिती होण्याची शक्यता असते.
ब) जनावरांच्या शिंगावरील वलयांच्या संख्या .
1) जनावरांची शिंगे बारकाईने पाहिल्यास त्यावर वलय दिसते.
2) जनावरांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शिंगांवरील वलयांची संख्या व त्यांचा आकार वाढत असतो.
3)3 वर्षे वयाच्या जनावरांच्या शिंगावर पहिले वलय होते.
जनावरांचे वय (वर्षे)= N+2 (N= शिंगावरील वलयांची संख्या)
या सूत्रानुसार जनावरांचे वय काढता येते.
मर्यादा 1. बऱ्याचदा शिंगे रंगविलेली असल्यामुळे जनावरांचे वय लक्षात येत नाही.
2. शिंगे घासून त्यावर तेल लावले जाते. त्यामुळे शिंगांवरील वलय स्पष्ट दिसत नाही.
3. जनावरांच्या काही जातींमध्ये शिंगाचा आकार खूप छोटा असतो व त्यावर वलय पाहणे अवघड जाते.
क) जनावरांच्या दातांवरून
1.जनावरांमध्ये दातांचा उपयोग चारा खाण्यासाठी होतो. तसेच दातांवरून जनावरांचे वय ओळखता येते.
2.गायी-म्हशीच्या बाबतीत खालच्या जबड्यात दात असतात, तर वरच्या जबड्यात नसतात; त्यामुळे कडबा किंवा चारा तोंडामध्ये ओढण्याकरिता जनावरे जिभेचा वापर करतात.
दातांचे सूत्र
दुधाचे दात ः कृतंक = 0+0
r+r
3+3
समोरील दाढा ः = 3+3 = 20
कायमस्वरूपी दातांचे सूत्र
कृतंक ः = 0+0
r+r
0+0
सूळ दात ः = 0+0
3+3
समोरील दाढा ः 3+3
3+3
मागील दाढा ः = 3+3 =32
3+3
जनावरांमध्ये वयानुसार दातांची संख्या बदलत जाते. वासरांना किंवा कमी वयाच्या जनावरांना दुधाचे दात असतात. वयस्कर किंवा मोठ्या जनावरांना कायमचे दात असतात. कृतंक दातांचा उपयोग जनावरांचे वय ओळखण्याकरिता होतो.
कृतंक ः
-गाई-म्हशीच्या खालच्या जबड्यात दात असतात व वाढीप्रमाणे दाताचे मूळ अवस्थेमधून बाहेर येऊ लागते.
-5 वर्षे वयानुसार या दातांच्या पृष्ठभागावर गोल तारा निर्माण होतो व नंतर वयवाढीबरोबर त्यांचे रूपांतर चौकोनी ताऱ्यामध्ये होतो.
-10 वर्षे वयाच्या जनावरांमध्ये हा तारा एका दातामध्ये चौकोनी होतो व 12 वर्षे वयाच्या जनावरांमध्ये या प्रकारचे सुळे दातांमध्ये तयार होतात.
-सोबतच दातांच्या समोरील भागावर असलेले दंतवलक निघून जाते. ही दंतवलक निघण्याची क्रिया व तारा मधला कृतंक 1 दातापासून सुरू होऊन कृतंक 4 पर्यंत पोचते.
समोरील दाढा व मागील दाढा
- या दाढा जबड्यात व दोन्ही बाजूला खाली व वर असतात.
- समोरील दाढा प्रत्येकी 3 पण आकाराने लहान असतात.
- मागील दाढासुद्धा प्रत्येकी 3 पण आकाराने लहान असतात.
- तसेच 12 वर्षे वयानंतर जनावरांच्या दातांवरून वय ओळखणे अवघड जाते.
प्रा. एस. यू. सूर्यवंशी प्रा. के. आर. भोईर
(लेखक मराठा विद्या प्रसारक कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन