जनावरांत रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास ते अशक्त होऊन त्याची उत्पादनक्षमता कमी होते. अशा जनावरांना रक्त संक्रमणाद्वारे दुसऱ्या सशक्त जनावराचे रक्त द्यावे लागते. अशावेळी रक्तदाता व रक्त घेणाऱ्या जनावरांच्या रक्ताची तौलनिक चाचणी करणे गरजेचे असते.
गाई-म्हशींमध्ये 13 प्रकारचे रक्तगट आढळून आले आहेत. उदा.- A, B, C, F/V, J, L, M, N, S, Z, R/S, N d T. जनावरांच्या रक्तामध्ये समजंतू विरोधकांचे (ISO - antibodies) प्रमाण अत्यल्प वा शून्य असते, त्यामुळे जनावरांमध्ये पहिल्यांदा रक्तसंक्रमण सुरक्षित असते. तरीसुद्धा रक्तदाता व रक्त घेणाऱ्या जनावरांच्या रक्ताची तौलनिक चाचणी करणे जरुरी आहे.
1) दात्याची निवड : कोणतेही तंदुरुस्त गाय/ म्हैस/ बैल शक्यतो त्याच जातीच्या दात्याचे रक्त तपासून घ्यावे व सर्वसामान्य असल्यासच स्वीकारावे.
2) रक्त स्वीकारणाऱ्या जनावराला ताप नसावा. त्याच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमीत कमी 3-4 ग्रॅम % असावे. तसेच ते जनावर रक्त स्वीकारण्यासाठी योग्य असावे.
3) रक्तदात्या जनावराच्या मानेतील शिरेतून 157 सुईच्या साह्याने ऍसिड सायट्रेट डेक्ट्रोस असलेल्या बाटलीत जमा करावे. रक्त जमा करण्यासाठीची बाटली कोणत्याही रक्तपेढीमध्ये शुल्क भरून उपलब्ध होऊ शकते. रक्त जमा करीत असताना ही बाटली कायम हळूहळू हलवत राहावी. जवळ रक्तपेढी नसल्यास नुकत्याच संपलेल्या सलाईनची प्लॅस्टिकची बाटली आपण ऍसिड सायट्रेट डेक्ट्रोस टाकून वापरू शकतो. त्यामध्ये डेक्ट्रोस 14.7 ग्रॅम, ट्रायसोडिअम सायट्रेट 13.2 ग्रॅम, सायट्रिक ऍसिड 4.8 ग्रॅम व उर्ध्वपातीत पाणी 1000 मि. लि. हे मिश्रण बनवून निर्जंतुक करावे व 100 मि. लि. रक्तासाठी 15 मि. लि. मिश्रण हे प्रमाण वापरावे.
4) रक्त देणे वा घेणे हे शक्यतो थंड व शांत वातावरणात उदा.ः सकाळी वा संध्याकाळी पार पाडावे.
5) रक्त जमा केल्यानंतर ते ताबडतोब रोगी जनावराला देण्यात यावे. जमा केलेले रक्त 4-10 अंश से. तापमानामध्ये पाच-सहा दिवसांसाठी साठवून ठेवता येते. हे रक्त वापरताना प्रथम त्या बाटलीला गरम पाण्यात ठेवून त्याचे तापमान रक्त स्वीकारणाऱ्या जनावराच्या तापमानाला आणावे व त्याच्या मानेतील शिरेमध्ये द्यावे.
6) 400 ते 500 किलो वजनाच्या जनावरांमध्ये एकवेळेस दोन ते तीन लिटर रक्त संक्रमित करता येते. एकवेळच्या रक्तसंक्रमणानंतर अपेक्षित परिणाम दिसून येतो. क्वचितच दुसऱ्यांदा रक्तसंक्रमणाची गरज भासते, अशावेळेस दुसरे रक्तसंक्रमण पाच-सहा दिवसांनी करावे.
7) रक्तसंक्रमण करीत असताना चेहऱ्यावर वा कोणत्याही स्नायूचे थरथरणे, उचकी येणे, हृदयाचे ठोके, तसेच श्वासोच्छ्वास वाढणे ही लक्षणे दिसून आल्यास रक्तसंक्रमण ताबडतोब थांबवावे व त्याला ऍण्टी-हिस्टॅमिनिक व ऍड्रीनॅलिनचे इंजेक्शन द्यावे.
8) दोन वेगवेगळ्या दात्यांचे रक्त एक आठवड्याच्या कालावधीनंतर देता येऊ शकते.
1) पशुवधखान्यामधून सुयोग्य दात्याकडून आपण योग्य पद्धतीने रक्त जमा करू शकतो.
2) ऍसिड सायट्रेट डेक्ट्रोसचे द्रावण योग्य प्रमाणात बनवावे, अन्यथा रक्ताच्या गाठी होऊ शकतात.
3) रक्तसंक्रमणासाठी लागणारे साहित्य निर्जंतुक असावे वा हॉट एअर ओव्हनमध्ये निर्जंतुक करून घ्यावे.
4) निर्जंतुक सुया मुबलक प्रमाणात जवळ असू द्याव्या.
5) रक्तसंक्रमणाआधी ऍण्टीहिस्टॅमिनिकचे इंजेक्शन दिल्याने संभावित प्रतिक्रिया टाळता येतात.
6) 400 ते 500 किलो वजनाच्या तंदुरुस्त प्राण्याकडून जास्तीत जास्त तीन ते चार लिटर रक्त जमा करता येते. रक्त जमा करणे, संक्रमण व साठवण या क्रिया पूर्णपणे जंतूविरहित वातावरणात पार पाडाव्यात.
7) रक्तसंक्रमण शक्यतो जनावर बांधलेल्या जागेवरच करावे.
8) रक्तदाता व ग्राहक जनावरांच्या रक्ताच्या जलद तुलनात्मक चाचणीसाठी दोघांच्या रक्ताचा सोडिअम सायट्रेट मिसळलेला एक-एक थेंब एकत्र घ्यावा व त्यामध्ये गाठी आढळून आल्यास ते रक्त एकमेकांना जुळत नाही, असे समजावे.
9) क्वचित प्रसंगी रक्त शिरेमधून देण्याऐवजी पेरिटोनियममध्ये देता येते.
: डॉ. चौधरी, 9987237342
: डॉ. कुंभार, 9850773775
(लेखक पशुवैद्यकीय महविद्यालय,
उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)
-------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...