वाढलेले खाद्य दर, अन्य खर्च, त्यामानाने दुधाचा घटलेला विक्रीदर व नफ्याचे कमी झालेले प्रमाण अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायद्यात आणणे जिकिरीचे झाले आहे. अशा वेळी सांगली जिल्ह्यातील नरसिंहपूर (ता. वाळवा) येथील संजय तानाजी कुंभार या युवकाने कष्ट, प्रामाणिक प्रयत्न व व्यवसाय फायद्यात ठेवण्यासाठी अवलंबलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर दुग्ध व्यवसायात दखलपात्र मजल मारली आहे. दूधविक्री व खाद्यदराच्या हिशेबाने खर्चाचे व्यवस्थापनही त्यांनी नियंत्रित ठेवले आहे. श्रम व वेळेची बचत घडवत अधिक नफा मिळविण्याचे तंत्रही आत्मसात केले आहे.
श्री क्षेत्र नृसिंह देवस्थान असलेले नरसिंहपूर गाव बागायती शेतीबरोबर वीट व्यवसायासाठीही जिल्ह्यात परिचित आहे. गावातील संजय कुंभार यांची वडिलोपार्जित विहीर बागायत पाच एकर शेती. त्यांचे वडील तानाजी यांना शेतीबरोबर जनावरे पालनाचाही छंद होता. संजय 1998 ला शिक्षणानंतर वीट व्यवसायाकडे वळले. तो सांभाळत वडिलांबरोबर शेतीही पाहत होते. ऊस हे त्यांचे मुख्य पीक. साधारण सात वर्षांपूर्वी विहिरीद्वारा पाण्याच्या उपलब्धीनंतर उसासह ते हळद घेऊ लागले. वीट व्यवसायात वाढलेल्या अधिकच्या अडचणी व धोके पाहून संजय दोन वर्षांपूर्वी पूर्ण वेळ दुग्ध व्यवसायात उतरले. त्या वेळेस गोठ्यात सुमारे दहा म्हैशी व चार गायी होत्या.
पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला दुग्ध व्यवसाय सुधारताना सुरवातीला अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गायींची पैदास वाढवली. त्यानंतर सातत्यपूर्ण कष्ट घेत व्यवसाय वाढीस लावला. आजमितीला दुधाळ, गाभण, कालवडी, म्हैस आदी मिळून 35 जनावरे आहेत.
मध्यंतरीच्या काळात काही म्हशी व गायी विकल्या. त्या उत्पन्नातून परिसरातील जनावरांच्या बाजारातून संकरित म्हणजे होलस्टीन फ्रिजीएन (एचएफ) जातीच्या काही गायी विकत आणल्या. त्यापासून पैदास झालेल्या कालवडी न विकता गोठ्यातील जनावरांची संख्या वाढवली. प्रति गाय प्रति दिन 12 लिटरपासून 19 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या आहेत.
पूर्वी बंदिस्त गोठा होता. कोंडत्या हवेमुळे जनावरांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत होता. परिणामी गायींना स्तनदाहासारखा आजार उद्भवायचा. व्यवस्थापनासाठी मनुष्यबळही जादा लागायचे. गायींमध्ये लाळ खुरकत आजाराची समस्या उद्भवल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला होता. तालुक्यातील राजारामबापू सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रोत्साहनानंतर कुंभार मुक्त संचार गोठा पद्धतीकडे वळले. यासाठी घराजवळील पाच गुंठ्यांतील सागवान लागवडीखालील क्षेत्राचा अवलंब केला. या आवारात गायींना मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. सभोवती तारेच्या जाळीचे कुंपण घातले आहे. या क्षेत्रात सागवानाची झाडे असल्याने गायींना अंग घासता येते, त्यामुळे गोचिडचा प्रार्दुभाव आटोक्यात आला आहे. गोठा उभारणीकामी दोन लाख 50 हजार रुपये खर्च आला. यासाठी विकास सेवा सोसायटी व दूध संघांकडील उचलस्वरूपी रकमेतून टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले. गायी बारमाही मुक्त असतात. दूध काढणीवेळी गायी गव्हाणीवर आणल्या जातात. आतील बाजूस सहा फूट लांब व साडेतीन फूट रुंद आकारात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. याद्वारा गायींसाठी 24 तास पाण्याची सोय केली आहे. या सर्व व्यवस्थापनामुळे जनावरांचे आरोग्य सुधारले आहे. दुधाचे उत्पादनही वाढले आहे. औषधोपचारांवरील खर्चही कमी करता आला.
आजमितीला गोठ्यातून प्रति दिन सरासरी 250 ते 300 लिटर दूध (दोन्ही वेळचे मिळून) उत्पादित होते. दुधाची विक्री गावापासून काही किलोमीटरवरील इस्लामपूर (जि. सांगली) येथील राजारामबापू सहकारी दूध उत्पादक संघाच्या शाखेकडे केली जाते. प्रति लिटरला सरासरी 22 ते 25 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. वैरण काढणी व गोठ्यातील व्यवस्थापन स्वतः संजय व त्यांचे वडील सांभाळतात, त्यामुळे मजुरीचा बहुतांश खर्च कमी झाला आहे. खाद्य, सुकी वैरण, टंचाईवेळी आणलेली ओल्या वैरण तसेच व्यवस्थापनकामी एकूण उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपर्यंत खर्च होतो. दरमहा चार ते पाच ट्रेलर शेणखत विकले जाते. विक्रीतून प्रति ट्रेलर दीड हजार रुपये मिळतात. उर्वरित वर्षभरातील साठ ट्रेलर शेणखत स्वतःच्या शेतात वापरले जाते. शेणकाढणी, पाणी पाजणे, गाई तसेच गोठ्याच्या स्वच्छतेकामी लागणारे 40 टक्के श्रम आता कमी झाले आहेत.
1) दूध संघाकडून भांडवल घेऊन 14 नवीन गायी खरेदी केल्या आहेत. एका गाईस चार हजार व मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे एकूण पंधराशे रुपयांचे अनुदान मिळाले. दुधाळ गाईला एकावेळेस तीन किलो गोळी खाद्य व गाभण गाईस अर्धा किलोप्रमाणे खुराक दिला जातो. दूधकाढणीआधी वैरणीची कुट्टी व खाद्य दिले जाते.
2) मातीविना शेतीआधारित (हायड्रोपोनीक्स) मकांकुर निर्मिती केली जाते. त्यासाठी सुमारे 25 ट्रे आहेत. दुभत्या गायीला दररोज दोन ट्रेमधील उत्पादित मकांकुर खाण्यास दिला जातो.
3) मध्यंतरी एक एकर क्षेत्रातील मका पिकापासून मुरघासचीही निर्मिती केली.
4) दूधकाढणी यंत्राचा वापर केला जातो.
5) कृत्रिम रेतन करण्यासाठी पशुवैद्यकांची मदत घेतली जाते.
6) उत्कृष्ट पद्धतीचे भुकटीस्वरूपी शेणखतही तयार केले जाते.
संजय यांना दुग्ध व्यवसायात आपल्या वडिलांची मोठी साथ आहे. दूधखरेदीदार शाश्वत असल्यास हा व्यवसाय फायद्यात राहतो असे कुंभार पिता-पुत्रांचे म्हणणे आहे, त्यामुळे शाश्वत खरेदीदारांकडेच दूधविक्री केली जाते. कष्ट व प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो. अन्य शेतकऱ्यांकडील गोठा व्यवस्थापन पाहून या व्यवसायातील अनुभव जाणून घेऊन त्यानुसार व्यवसायात सुधारणा केल्या आहेत. पहाटे पाच ते सकाळी सात व सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत ते गोठ्यातील व्यवस्थापन सांभाळल जाते. पाच एकर शेतीच्या व्यवस्थापनाकडेही दुर्लक्ष केले जात नाही. तीस गुंठे ऊस असून 20 गुंठे चारा पिकासाठी राखीव आहे. पीक फेरपालटावेळी मका वैरणीसाठी घेतात. उर्वरीत क्षेत्रातील ऊस साखर कारखान्याला दिला जातो.
संजय यांना आई सौ. रुक्मिणी व पत्नी सौ. सुवर्णा यांचीही मोठी मदत लाभली आहे.
संपर्क : संजय कुंभार- 9881984448.
स्त्रोत: अग्रोवन:
अंतिम सुधारित : 7/10/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...