प्राचीन काळी मेंढ्यांची पैदास व जोपासना कशी केली जात असे याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासूनची यांसंबंधीची माहिती मिळते.
उत्तर व दक्षिण गोलार्धाच्या २० ते ६० अक्षांशामधील देशांमध्ये मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. बहुतांशी लोकरीसाठी तर काही देशांत प्रामुख्याने दुधासाठी व आणखी काही देशांत मांसासाठी त्या पाळल्या जातात. अठराव्या शतकापर्यंत उ. गोलार्धामध्ये स्पेन, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांत मेंढीपालन प्रगतावस्थेत होते. औद्यागिक क्षेत्रात आघाडीवर येण्यापूर्वी हे देश केवळ मेंढ्या व त्यांपासून मिळणाऱ्या लोकरीच्या उत्पादनावर संपन्न झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस द. गोलार्धात, यूरग्वाय, अर्जेंटिना, द. अफ्रिका प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाळण्यात येऊ लागल्या. ऑस्ट्रेलियामध्ये १८५० मध्ये मेंढ्यांची संख्या१ कोटी ७० लाख होती, तर १८९० च्या सुमारास ती १० कोटींच्या आसपास झाली.
यूरोप व भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांतील मिश्र अर्थव्यवस्थेमुळे, मांस, लोकर व दूध यांच्या उत्पादनाकरिता कॉर्सिकन आणि सार्डिनियन मेंढ्या पाळल्या जातात. मध्य व द. यूरोपामध्ये – जर्मनीमध्ये ईस्ट फ्रिझियन, बल्गेरियामध्ये पेलबिन आणि स्टारा झागॉरा व बाल्कन देशांमध्ये झॅकेल या जातींच्या मेंढ्या दुग्धोत्पादनासाठी पाळतात. इराणमधील दुग्धोत्पादनातील २५% दूध मेंढीचे आहे. तेथील बलुची मेंढ्या एका दुग्धकालात सरासरीने ५०किग्रॅ. तर लेबाननमधील आवास्सी मेंढ्या भरपूर खाद्य दिल्यावर १९० दिवसांत २०० किग्रॅ. दूध देतात. इराकमधील अर्धेअधिक दुग्धोत्पादन मेंढीचे आहे. इराणमधील बलुची, सँडजबी व मोघानी या मेंढ्यांच्या दुधामधील चरबीचे प्रमाण अनुक्रमे सरासरीने ६.२१%, ६.४७% आणि ५.६९% इतके आहे.
मध्यपूर्वेकडील भाग, प. आशियातील वाळवंटी प्रदेश, मंगोलिया, चीन व भारतीय उपखंडातील भागामध्ये मेंढ्यांच्या अनेक जाती आणि उपजाती पाळण्यात येतात व त्यांच्यापासून प्रायः गालिचे व कांबळी (घोंगड्या) यांना उपयुक्त असलेल्या लोकरीचे उत्पादन होते. यांशिवाय अफगाणिस्तान व इराणमध्ये मांसोत्पादनासाठी दुम्बा आणि मध्य आशियामध्ये फरसाठी काराकुल जातीच्या मेंढ्या पाळण्यात येतात.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या १९८२ सालच्या अंदाजाप्रमाणे जगातील मेंढ्यांची संख्या ११५.७ कोटीच्या आसपास असून त्यांपैकी १/३मेंढ्या द. गोलार्धात आहेत. भारतामध्ये ४.१७ कोटी मेंढ्या असून संख्येच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना व द. आफ्रिका प्रजासत्ताक या देशांतील संख्या भारतापेक्षा अधिक आहे. भारतामधील जवळजवळ निम्म्या मेंढ्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत मिळून आहेत. महाराष्ट्रातील मेंढ्यांची संख्या २१ लाखांच्या आसपास आहे.
चराऊ रानांची विपुलता व समशीतोष्ण जलवायुमान मेंढीपालनाचा अनुकूल असते. तथापि अंगावरील लोकरीमुळे आपल्या शरीराच्या तापमानाचे नियंत्रण त्या चांगल्या तऱ्हेने करू शकतात, म्हणून उष्ण जलवायुमानालाही त्या तोंड देऊ शकतात. त्यांचे नेहमीचे तापमान ३९० से. असले, तरी ३७० ते४१० से. इतका फेरबदल त्यात असून शकतो. शरीरातील उष्णता मुख्यत्वे श्वसनावाटे बाहेर टाकली जाते; तरी पण मेंढ्यांना काही प्रमाणात घाम येतो. मकरवृत्ताच्या उत्तरेकडील ऑस्ट्रेलियाच्या भागात सरासरी पर्जन्यमान ४२ सेंमी. पेक्षा कमी आहे व त्या ठिकाणी नुसत्या झाडाझुडपांच्या चराईवर मेरिनो जातीच्या मेंढ्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात.
पश्चिम राजस्थानातील दुर्जल प्रदेशामध्ये उन्हाळ्यातील कमाल तापमान ४२० से. इतके असते. तेथील मारवाडी व माग्रा जातींच्या मेंढ्यांच्या एका अभ्यासावरून या मेंढ्यांना आठवड्यातून फक्त दोनदाच पिण्याचे पाणी दिले, तरी त्यांच्या वजनामध्ये अगर उत्पादन व प्रजनन कार्यक्षमतेवर काहीही विपरित परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. तसेच हिवाळ्यामध्ये सलग १३ दिवसांपर्यंत पाणी मिळाले नाही, तर त्या तग धरून राहतात.
जगातील मेंढ्यांच्या लोकरीचे उत्पादन १९८२ साली २८.५६ लक्ष टन झाले व त्यातील ४२% मेरिनो जातीच्या मेंढ्यांचे होते; संकरित मेरिनो व इंग्लंडमधील लोकर देणाऱ्या मेंढ्यांपासून मिळणारी लोकर ३८%, तर २०% गालिच्याची लोकर होती लोकर. ऑस्ट्रलियामध्ये जगातील संख्येच्या१/६ मेंढ्या आहेत; पण लोकरीचे उत्पादन जगातील उत्पादनाच्या १/३ आहे. द. आफ्रिकेतील मेंढ्यांची संख्या जगाच्या ४% व उत्पादनही जगातील उत्पादनाच्या ४% आहे, तर भारतातील संख्या जवळजवळ ४% पण उत्पादन मात्र १.४% आहे (३७,००० टन).
भारतामध्ये हिमालयाच्या आसपासच्या जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील समशीतोष्ण जलवायुमान व कमीअधिक उंचीवरील चराऊ राने यांमुळे तेथे मेंढीपालनाचा धंदा चांगल्या तऱ्हेने होतो. भारतीय मेंढीपासून सरासरीने वर्षाला ०.८ ते ०.९ किग्रॅ. लोकर मिळते.
कोष्टक क्र. १ विदेशी व भारतातील मेंढीची तुलना. |
||
|
भारतीय मेंढी |
विदेशी मेंढी |
लोकरीचे उत्पादन (प्रती वर्ष/ प्रती मेंढी) |
१ – १.५ किग्रॅ. |
४ – ५ किग्रॅ. |
शरीराचे वजन (प्रती मेंढी) |
२० – २५ किग्रॅ |
४० – ५० किग्रॅ. |
मांसाचे उत्पादन (प्रती मेंढी) |
१० – १२ किग्रॅ |
२० – २५ किग्रॅ. |
लोकर विकण्यापासून फायदा (प्रती वर्ष/ प्रती मेंढी) |
१० – १५ रु. |
१२० – १२५ रु. |
मांस विकण्यापासून फायदा |
१४० – १७० रु. |
२८० – ३५० रु. |
मेरिनो, रॅम्ब्युलेट यांसारख्या विदेशी जातींच्या मेंढ्यांपासून सरासरीने ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. द. भारतातील मेंढ्या प्रामुख्याने मांसोत्पादनासाठी पाळल्या जातात. त्यांचे सरासरी वजन ३० किग्रॅ. च्या आसपास असते. विदेशी मांसोत्पादक मेंढ्यांचे याच्या तिप्पट असते. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या मांसाचे १९८२ मध्ये ६२.४४ लक्ष टन जागतिक उत्पादन झाले व त्यापैकी भारतामध्ये १.२७ लक्ष टन झाले. द. भारतातील या मांसोत्पादक जातींची (नेल्लोर, बन्नूर व दख्खनी) लोकर केसाळ असते; पण त्यांची कातडी जगामध्ये उत्कृष्ट समजली जातात. घट्ट विणीची कणीदार पोत असलेली ही कातडी मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या विदेशी मेंढ्यांच्या कातड्याची प्रत चांगली असत नाही. त्यांच्या कातड्यामध्ये अधिक चरबी असल्यामुळे ती विसविशीत व कमजोर असतात.भारता-मधून निर्यात होणाऱ्या मेंढ्यांच्या कातड्यांपैकी ९०% कातडी द. भारतातून निर्यात होतात चर्मोद्योग. जगातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन १९८२ मध्ये अंदाजे १३ लाख टन झाले, तर भारतात ३७,००० टन झाले.
भारतातील मेंढ्यांची संख्या ४.१७ कोटी आहे व त्यादृष्टीने भारताचा क्रमांक सहावा लागतो. उत्पादनाच्या दृष्टीने ह्याच मेंढ्या जगाच्या तुलनेत १.४% आहेत हे जरी सकृतदर्शनी तोकडे वाटले, तरी ही तुलना करताना इतरही गोष्टीचा विचार अवश्य करावयास हवा. सबंध ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येइतकी असून ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे. याशिवाय गाय, बैल, म्हशी इ. पशूंची संख्यादेखील तुलनेने खूप कमी आहे. ह्या मर्यादा लक्षात घेता, देशी मेंढ्यांपासून मिळणारे कोष्टक क्र. २ मध्ये दिलेले उत्पन्न लक्षणीय आहे, असे म्हणावे लागेल
कोष्टक क्र. २ भारतातील एकूण मेंढ्यांची संख्या व त्यांपासून मिळणारे उत्पन्न. |
|
मेंढ्यांची संख्या |
४.१७ कोटी |
लोकरीचे उत्पादन |
३.४५ कोटी किग्रॅ. प्रती वर्ष |
मांसाचे उत्पादन |
१०.०० कोटी किग्रॅ. प्रती वर्ष |
कातड्याचे उत्पादन |
१.५५ कोटी कातडी प्रती वर्ष |
परकीय चलनाची उपलब्धी |
१०८ कोटी रुपये(गालिच्याच्या निर्यातीमुळे) |
मेंढ्यांपासून देशाच्या उत्पादनात पडणारी भर |
१४० कोटी रुपये |
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/6/2020
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी...
प्रत्येक गावाला आपली एक ओळख असते. त्या ओळखीच्या खा...
आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळ...
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...