रानटी मेंढ्यांपासून उत्पन्न झालेल्या माणसाळलेल्या मेंढ्यांच्या अनेक जाती जगामध्ये अस्तित्वात आहेत. विविध आनुवंशिक गुणांचे संचय असलेल्या या जातींपासून मानवाची गरज, विशिष्ट पर्यावरणात तग धरून राहण्याची क्षमता, मांस, दूध व लोकर यांबाबतींतील त्यांची उत्पादनक्षमता यांचा अभ्यास करून शास्त्रीय दृष्टीने प्रजनन करून बऱ्याच विदेशी जाती निर्माण केल्या गेल्या आहेत.
जगामध्ये अशा एकूण २०० च्यावर जाती अस्तित्वात आल्या आहेत. यांतील बऱ्याच स्थानिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सु. ३० विदेशी जाती जागतिक महत्त्वाच्या आहेत. त्यांतील काही प्रसिद्ध जाती, तसेच महत्त्वाच्या भारतीय जातींची माहिती येथे दिली आहे.
स्थूलमानाने भारतामध्ये मेंढ्यांचे चार प्रकार आढळतात व वर्णनाच्या सोईसाठी भारताचे चार भाग कल्पिले आहेत. हिमालयाच्या आसपासचा, उत्तर, दक्षिण व पूर्व भारत हे ते भाग होत.
पहिला म्हणजे हिमालयाच्या जवळचा समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या जम्मू व काश्मीर राज्य, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील भाग, पंजाब या राज्यांचा मिळून झालेला भाग. या भागातील मेंढ्यांची लोकर लांब धाग्याची, मऊ व तलमसर आहे. त्यातल्या त्यात उत्तम प्रतीची लोकर व लोकरीखाली अंगालगत असणारी मऊ फर असलेल्या मेंढ्या २,४०० ते ३,६०० मी. उंचीवरील डोंगराळ भागात आढळून येतात. मेंढ्यांची संख्या ५२ लाखाच्या आसपास असून त्यांच्यापासून वर्षाला ४,५०० टनाच्या आसपास लोकरीचे उत्पादन होते. पूंछ, करनाह, भाकरवाल, भादरवाह व रामपूरबशीर ह्या या भागातील प्रसिद्ध जाती आहेत.
पूंछ : पूंछ भागात आढळणाऱ्या या जातीच्या मेंढ्या थोराड आणि आखूड कानाच्या असून रंगाने पांढऱ्या असतात. शेपटी आखूड असून तिचा बुंधा जाड असतो. यातील बहुसंख्य मेंढ्यांना शिंगे नसतात. उन्हाळ्यात चराऊ रानामधील गवत खाऊन व हिवाळ्यात बंदिस्त मेंढवाड्यामध्ये खाद्य देऊन त्या वाढविल्या जातात. वर्षातून दोन किंवा तीन कातरणींमध्ये एका मेंढीपासून सरासरीने १.६ किग्रॅ. लोकर मिळते.
करनाह : काश्मीरमध्ये १,२०० ते ४,६०० मी. उंचीवरील करनाह भागात या जातीच्या मेंढ्या आढळतात व केल हे त्यांचे माहेरघर आहे. या जातीतील मेंढ्यांचे नाक उठावदार असून शिंगे मोठी व वळलेली असतात. वर्षाला दोन कातरणींत ०.९ ते १.३ किग्रॅ. उत्तम प्रतीची तलम पण आखूड धाग्याची लोकर यांच्यापासून मिळते.
भाकरवाल : काश्मीरमध्ये डोंगराळ भागात व पीर पंजालच्या पर्वतराजीवरील पठारावर या जातीच्या मेंढ्या आढळतात. त्या काटक आणि थोराड असून त्यांचे कळप स्थानांतर करीत काश्मीर दरीमध्ये लिद्दार, पहलगामपर्यंत पोहोचतात. काही उपजातींच्या मेंढ्यांच्या शेपटीवर बरीच चरबी साठलेली असते. यांचे कान लांब, रुंद व लोंबते असून त्यांच्या डोळ्यांच्या व तोंडाच्या भोवती विटकरी रंगाचे वलय असते. वर्षातून एका मेंढीपासून तीन कातरणींमध्ये सरासरीने १.६ किग्रॅ. जाड धाग्याची रंगीत लोकर मिळते. स्थानिक लोक तिचा जाडीभरडी ब्लँकेटे बनविण्यासाठी उपयोग करतात.
भादरवाह (गद्दी) : जम्मूमधील किश्तवार व भद्रवाह भागांत या मेंढ्या आढळतात. या जातीच्या नरांना शिंगे असतात; पण माद्यांना नसतात. यांचा रंग पांढरा असतो व चेहऱ्यावर तपकिरी रंगाचे केस असतात. हिवाळ्यामध्ये यांचे कळप कुलू व कांग्रा खोऱ्यांमध्ये राहतात, तर उन्हाळ्यात पीर पंजालच्या सर्वांत उंच टेकड्यांवर चराईसाठी जातात. वर्षातून तीन कातरणींमध्ये सरासरीने एका मेंढीपासून १.१३ किग्रॅ. तलम, तजेलदार लोकर मिळते. यातील काही धारीवाल लोकर गिरणीमध्ये उपयोगात आणली जाते. लोकरीखालील अंगालगतच्या मऊ फरचा उपयोग अधिक किंमतीच्या कुलू शाली व ब्लँकेटे करण्यासाठी होतो.
रामपूरबशीर : हिमालयाच्या पायथ्याशी सर्व दूर आढळणारी ही मेंढ्यांची प्रसिद्ध जात आहे. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्यांची शिंगे मागे वळून पुन्हा खाली वळलेली असतात. कान मोठे असून शेपटी बारीक व आखूड असते. यांचे कळप उन्हाळ्यात तिबेटच्या सीमेपर्यंत चरत जातात व पुन्हा यमुना, टॉन्स व सतलज दरीतील शिवालिक टेकड्यांमध्ये परततात. डेहराडून जिल्ह्याच्या चक्राता भागात या जातीच्या मेंढ्यांचे काही प्रकार आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.३६ ते १.८ किग्रॅ. चांगल्या प्रतीची लोकर मिळते. तिबेटच्या सीमेवर शेळ्यांबरोबर या मेंढ्या सामानाची ने-आण करण्यासाठी वापरतात.
राजस्थान, गुजरात, पंजाब व उत्तर प्रदेशाचा सपाटीचा भाग व मध्य प्रदेशाचा लगतचा भाग धरून कल्पिलेल्या उत्तर विभागातील मेंढ्यांची संख्या१.२३ कोटीच्या आसपास आहे आणि त्यांच्यापासून अदमासे भारतातील लोकरीच्या उत्पादनाच्या ६३% (२०,२०० टन) लोकर मिळते. गालिचे बनविण्यासाठी ही उपयुक्त असून तीतील ११-१२ हजार टन निर्यात केली जाते. या भागातील कोरडी हवा, हिवाळ्यातील थंडी, अपुरी चराऊ राने व मधूनमधून उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती यांना समर्थपणे तोंड देऊ शकणाऱ्या चार प्रमुख जाती या भागात आढळतात.
लोही : डोक्याचा तपकिरी रंग, उठावदार उंचावलेले नाकाचे हाड (रोमन नोज), मऊ व लांबसडक कान ही या जातीची वैशिष्टये आहेत. यांच्या चेहऱ्यावर लोकर नसते. ल्यालपूर, झांग व मंगमरी या पाकिस्तानातील जिल्ह्यांत या जातीच्या जातिवंतर मेंढ्या आढळतात. तथापि या जातीतील काही प्रकार राजस्थान व गुजरातमध्ये आहेत. लोकर, मांस व दूध या तीनही प्रकारचे उत्पादन या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.८ किग्रॅ. जाड, लांब धाग्याची लोकर व दररोज ३.६ लिटरपर्यंत दूध मिळू शकते. राजस्थानमध्ये या जातीच्या मेंढ्यांच्या उपजातींना निरनिराळी नावे आहेत. जोधपूर व जैसलमीर जिल्ह्यांत जैसलमीरी; जयपूर, टोंक व सवाईमाधवपूर जिल्ह्यांत मालपुरी; उदयपूर जिल्ह्यांत सोनाडी अशी नावे आहेत; तर गुजरातमधील बडोदे जिल्ह्यात या मेंढ्या चारोथ्री या नावाने ओळखल्या जातात.
बिकानेरी : पूर्वीच्या बिकानेर संस्थानातील भाग व त्या लगतच्या उ. प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील भागात या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने आढळतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्यांचे डोके लहान असते व कान सुरळीसारखे असतात. भारतातील सर्वांत जास्त प्रमाणात लोकर देणारी ही मेंढ्यांची जात आहे. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.८ ते ४ किग्रॅ. लोकर मिळते. माग्रा, चोकला किंवा शेरबवटी व नाली या उपजातीही या भागात आढळतात. चोकला या राजस्थानमधील उपजातीपासून चांगल्या प्रतीची गालिचे करण्याला उपयुक्त लोकर मिळते.
मारवाडी : या जातीच्या मेंढ्यांपासून पांढरी, केसमिश्रित, जाडीभरडी गालिच्याची लोकर मिळते. काळ्या रंगाचा चेहरा, लांब पाय व उठावदार नाक ही या जातीची वैशिष्टये आहेत. या मेंढ्यांना गळ्याखाली गलूली आढळतात. जोधपूर व जयपूर भागांत या मेढ्या आढळत असल्या, तरी भटक्या जातींनी पाळलेले या जातीच्या मेंढ्यांचे कळप उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच उत्तर महाराष्ट्रात दूरवर येतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ०.९ ते १.८ किग्रॅ. लोकर मिळते.
कच्छी : उत्तर गुजरात व सौराष्ट्राच्या वाळवंटी प्रदेशात या जातीच्या मेंढ्या आढळतात. काळसर बदामी रंगाच्या या मेंढ्या चणीने लहान पण बांधेसूद असतात. यामुळे त्यांच्यापासून बऱ्यापैकी मांस उपलब्ध होते. विविध प्रकारची लोकर या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते व तिचा उपयोग लष्करामध्ये लागणाऱ्या फेल्टच्या कपड्यासाठी करतात.
काठेवाडी : काठेवाड व त्याच्या लगतचा कच्छचा भाग, दक्षिण-राजस्थान व उत्तर गुजरात व भागांतील मेंढ्यांची ही जात आहे. मेंढ्या मध्यम बांध्याच्या, पांढऱ्या रंगाच्या पण चेहरा व पाय यांवर काळे अगर तपकिरी रंगाचे केस असतात. सरासरीने प्रत्येक मेंढीपासून वर्षाला दीड किग्रॅ. जाड व लांब धाग्याची लोकर मिळते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या मिळून कल्पिलेल्या दक्षिण भागात २.२६ कोटी मेंढ्या आहेत. यांतील पूर्वेकडील भागातील १.०२ कोटी मेंढ्यांपासून जवळ जवळ अजिबात लोकर मिळत नाही, त्या मांसोत्पादनासाठी पाळल्या जातात. उरलेल्या मेंढ्यांपासून १०,७००टन जाडीभरडी करड्या रंगाची लोकर मिळते. दख्खनी व नेल्लोर या प्रमुख जाती या भागांत आढळतात.
दख्खनी : राजस्थानातील लोकर देणाऱ्या मेंढ्या आणि आंध्र प्रदेश व तमिळनाडूमधील केसाळ मेंढ्या यांच्या संकरापासून ही मेंढ्यांची जात निपजलेली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व कर्नाटक राज्याच्या काही भागांत या मेंढ्या आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला सरासरीने ४५० ग्रॅ. लोकर मिळते व ती काळ्या व करड्या रंगाची आणि केसाळ असते. तिचा कांबळी करण्यासाठी उपयोग करतात. या मेंढ्या मुख्यत्वे मांसासाठी पाळल्या जातात. निकृष्ट चराऊ रानावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात.
नेल्लोर : या जातीच्या मेंढ्या भारतातील सर्वात उंच मेंढ्या आहेत. लांबोळा चेहरा, लांब कान व सर्वांगावर दाट पण आखूड केस यामुळे या शेळीसारख्या दिसतात. नराला पीळदार शिंगे असतात, तर मादीच्या डोक्याला मध्यभागी उंचवटा असतो. यांचा रंग पिवळट तांबूस हरिणासारखा असून शेपटी आखूड असते. शेपटीच्या टोकला केसांचा झुबका असतो. सामान्यपणे जंगली भाग, नद्यांची पात्रे, डोंगरांचे उतार व पीक काढलेली शेते या ठिकाणी मिळेल त्या खाद्यावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात. मंड्या, यलाग व तेंगुरी हे या जातीच्या मेंढ्यांचे प्रकार आहेत. या मेंढ्यांपासून जवळ जवळ काहीही मिळत नाही. मात्र मांसोत्पादनासाठी या जाती प्रसिद्ध आहेत. बन्नूर ही कर्नाटकातील आणखी एक जात मांसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
बिहार, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांचा मिळून कल्पिलेल्या पूर्व विभागामध्ये मेंढीपालनाचा धंदा फारसा केला जात नाही. येथील हवेमध्ये आर्द्रता व उष्णता, तसेच पावसाचे मानही बरेच असल्यामुळे या भागात मेंढ्यांच्या नाव घेण्यासारख्या जाती नाहीत. या भागातील मेंढ्यांची संख्या ३० लाख असून त्यांच्यापासून ९०,६०० किग्रॅ. जाडीभरडी लोकर मिळते. तिचा उपयोग प्रायः कांबळी बनविण्यासाठी करतात. प्रत्येक मेंढीपासून सरासरीने ११० ते २२५ग्रॅ. लोकर मिळते.
मेरिना : ही मूळची स्पेनमधील जात असून अतिशय तलम लोकरीच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. बाराव्या शतकापासून ही जात अस्तित्वात आहे. मूर लोकांनी ती स्पेनमध्ये आयात केली असावी. समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या रुक्ष प्रदेशात स्थानांतर करीत जगण्याची क्षमता या जातीच्या मेंढ्यांच्या अंगी असल्यामुळे जगातील कित्येक देशांमध्ये या जातीचा प्रसार झाला आहे. त्या त्या देशात या जातीच्या मेंढ्यांचे अनेक विभेद निर्माण झाले. उदा., ऑस्ट्रेलियन मेरिनो, रशियन मेरिनो, अमेरिकन मेरिनो इत्यादी. या जातींच्या नरांना शिंगे असतात, माद्यांना ती नसतात. डोके व पाय यांवरही भरपूर व दाट लोकर असते. या मेंढ्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्या लोकरीचे धागे बारीक व लवचिक असतात. कातड्यातील तैल ग्रंथीमधून पुष्कळ चरबी या धाग्यामध्ये मिसळली गेल्यामुळे लोकर कुरळी, मऊ, तलम व तजेलदार असते. वरच्या बाजूच्या चरबीवर धूळ साचून एक काळपट आवरण तयार होते व त्यामुळे आतील स्वच्छ पांढरी लोकर आयतीच सुरक्षित राहते. मानेवर जाडजूड वळ्या असलेल्या नेग्रेटी मेरिनो या मेंढ्यांपासून एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लिश मेरिनो ही जात इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली. एका मेंढीपासून वर्षाला ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. या जातीच्या मेंढ्यांच्या संकरापासून निपजलेल्या प्रजेची लोकरही उत्कृष्ट दर्जाची असते.
रॅम्ब्युलेट : फ्रान्सच्या सोळाव्या लूई या राजाच्या रॅम्ब्युलेट येथील मेंढवाड्यावर स्पेनमधून १७८६ मध्ये व पुन्हा १७९९ मध्ये निवडक मेरिनो जातीच्या मेंढ्या आयात केल्या गेल्या. या मेंढ्यांपासून हिची पैदास करण्यात आली. या मेंढ्यांच्या अंगावर दाट, तलम लोकर भरपूर असते. चेहरा व पाय यांचा रंग पांढरा असून चेहऱ्यावर पुष्कळ लोकर इतकी असते की, त्यामुळे काही मेंढ्यांना आंधळेपणा येण्याचा संभव निर्माण होतो. नराला शिंगे व डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो; माद्यांना फक्त उंचवटा असतो. या जातीच्या मेंढ्यांच्या लाकरीबरोबरच त्यांचे मांसोत्पादन वाढविण्याचे प्रयत्न जर्मन मेंढपाळांनी केले. उत्तर अमेरिकेत या जातीच्या मेंढ्या १८४० मध्ये प्रथमतः आयात केल्या गेल्या व पश्चिम किनाऱ्यावरील प्रांतात निवड पद्धतीने प्रजनन करून त्यांचे संगोपन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
चेव्हिऑट : मध्यम प्रतीची लोकर उत्पादन करणाऱ्या ह्या मेंढ्यांच्या जातीची स्कॉटलंडमध्ये पैदास करण्यात आली. यांच्या चेहऱ्याचा रंग पांढरा असून डोके, कान आणि पायावर कोपराखाली व ढोपराखाली लोकर नसते, त्यामुळे त्या डौलदार दिसतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला २.५ ते ३.५ किग्रॅ. लोकर मिळते. लिंकन जातीच्या मेंढ्यांशी संकर प्रजनन करून मांसोत्पादनासाठी संकरित प्रजा उपयोगात आणतात.
साऊथ डाऊन : इंग्लंडमध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आलेली ससेक्स टेकड्यांतील ही मेंढ्यांची जात बांध्याने लहान आहे. त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट तपकिरी असून त्यांना शिंगे नसतात. एका मेंढीपासून वर्षाला २ ते ३ किग्रॅ. उत्कृष्ट प्रतीची पांढरी पण आखूड धाग्याची लोकर मिळते.
इंग्लिश लायस्टर : रॉबर्ट बेकवेल या शास्त्रज्ञांनी १७५५ मध्ये स्थानिक मेंढ्यांपासून निवड पद्धतीने प्रजनन करून ह्या जातीची इंग्लंडमध्ये पैदास केली. चेहरा व पाय यांवर लोकर नसते. सर्वांगावर पिळ्यासारखी झुबकेदार लोकर असते. ही लोकर जाड व लांब धाग्याची असते.
रोमनी मार्श : जाड व लांब धाग्याची लोकर देणाऱ्या इंग्लंडमधील केंट परगण्यातील मेंढ्यांची ही जात आहे. या मेंढ्या काटक असून त्यांच्या अंगावर दाट लोकर असते. द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांत या जातीच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणावर पाळतात. नर व मादी यांच्या डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो.
कॉरिडेल : मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढ्यांच्या ह्या जातीची पैदास न्यूझीलंडमध्ये लिंकन जातीचे मेंढे व मेरिनो जातीच्या मेंढ्या यांच्या संकर प्रजननाने करण्यात आली. या जातीच्या मेंढ्यांचा चेहरा पांढरा असून त्यांना शिंगे नसतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून लोकर व मांस यांसाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेमध्ये पाळण्यात येतात. लिंकन व मेरिनो यांच्याच संकरातून ऑस्ट्रेलियामध्ये (व्हिक्टोरिया) १८८० च्या सुमारास तयार करण्यात आलेली दुसरी
जात म्हणजे पोलवर्थ ही आहे. या मेंढ्या थोराड असून ऑस्ट्रेलियाच्या अतिथंड व जास्त पाऊस असलेल्या भागात पाळल्या जातात.
लिंकन : लांब पण जाड धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्यांची ही जात इंग्लंडमधील स्थानिक जात आहे. या जातीच्या मेंढ्यांना शिंगे नसतात; पण डोक्यावर मध्यभागी लोकरीचा झुबका असतो. अंगावरही झुबकेदार लोकर असते. ही जात मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध असली, तरी प्रत्येक मेंढीपासून ५ ते७ किग्रॅ. लोकर मिळते.
काराकुल : मध्य आशियातील उझबेकिस्तान व अफगाणिस्तान येथील ही मूळची मेंढ्यांची जात आहे. उत्कृष्ट मऊ तजेलदार फरबद्दल ही जात प्रसिद्ध आहे. नवजात कोकराचा रंग काळा असतो. एक ते तीन दिवसांची कोकरे मारून त्यांची कातडी फर धंद्यासाठी विकली जातात. पर्शियन लँबस्किन म्हणून ही प्रसिद्ध आहेत. रशिया, आफ्रिका व अमेरिका या प्रदेशांमध्ये काराकुल मेंढ्या कोकरांच्या कुरळ्या फरकरिता पाळण्यात येतात. रशियामधून या जातीच्या शुद्ध बीजाच्या मेंढ्यांची आयात भारतामध्ये अलीकडे करण्यात आली आहे. राजस्थानमधील थर वाळवंटाच्या प्रदेशात लोकरीसाठी त्यांची पैदास सुरू करण्यात आली आहे. तेथील जलवायुमान या मेंढ्यांना अनुकूल असल्यामुळे हे पैदाशीचे प्रयत्न यशस्वी हात असल्याचे दिसून आले. मौल्यवान लँबस्किन खेरीज प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ३ ते ३.५ किग्रॅ. लोकर, तसेच २० ते 25 किग्रॅ. मांस मिळू शकते. मात्र अद्याप फर कातडीच्या उत्पादनाकडे लक्ष देण्यात आलेले नाही [→फर-२]. यांशिवाय पेलविन, सेव्हलिव्हो, स्टारा झागॉरा या बल्गेरियातील मेंढ्यांच्या जाती मुख्यत्वे दुग्धोत्पादनासाठी पाळल्या जातात.
विविध जननिक गुणधर्म समुच्चय (आनुवंशिकतेतून येणारे गुणधर्म) असलेल्या अनेक जातींच्या मेंढ्या जगामध्ये अस्तित्वात असताना स्ववंशीय संयोग अगर अंतःप्रजनन (निकटचा संबंध किवा जवळचे नाते असलेल्या प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून होणारे प्रजोत्पादन) या पद्धतींचा उपयोग करून आपले कळप सुधारण्याचा फारसा प्रयत्न पूर्वीच्या मेंढपाळांनी केल्याचे दिसून येत नाही. विसाव्या शतकामध्ये मात्र यांचा, तसेच निवड पद्धतीचे आडाखे व संततीची कार्यक्षमता यांचा अभ्यास करून मेंढ्यांच्या सुधारित जाती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. तशातच ⇨कृत्रिम वीर्यसेचन व मेंढ्यांना माजावर आणण्यासाठी स्टेरॉइड औषधांचा उपयोग होऊ लागल्यामुळे प्रजननाचे तंत्रच बदलून गेल्याचे दिसते. आनुवंशिक गुणधर्म प्रदान करण्यात मादीपेक्षा नराचा वाटा अधिक असतो, असेही निदर्शनास आले. याचा फायदा घेऊन मध्यपूर्वेकडील व भारतातील स्थानिक मेंढ्यांशी संयोग करण्यासाठी मेरिनो नरांचा वापर करून निर्माण झालेल्या संकरित प्रजेच्या लोकरीची प्रत व उत्पादन वाढविण्यात बरेच यश आलेले दिसते. निवड पद्धत वापरून प्रजनन केल्यावर काराकुल जातीच्या मेंढ्यांच्या फरच्या कुरळेपणाची लांबी कमी करण्यात यश आले. मेंढ्यांचे वजन व त्यांच्या अंगावरील त्वचेच्या वळ्या यांचा मांसाची प्रत व उत्पादन आणि लोकरीच्या धाग्यांची लांबी यांच्याशी संबंध आहे, असे निदर्शनास आले आहे. या व अशा अनेक संशोधनात्मक निष्कर्षाचा इष्ट परिणाम होऊन मेंढ्यांच्या कित्येक जातींमध्ये लोकरीची प्रत व उत्पादन आणि मांसोत्पादन यांमध्ये लक्षणीय प्रगती करता आलेली आहे. या अनुषंगाने मेंढ्यांचे खाद्य, संगोपन इ. अनेक बाबींकडेही लक्ष पुरविण्यात आले. अमेरिकेमध्ये डबॉइस, आयडा आणि फोर्ट विंगेट येथे, तसेच इतर देशांमध्येही संशोधन केंद्रे काढण्यात आली आहेत.
भारतामध्ये मेंढ्यांच्या लोकरीची प्रत व उत्पादन यांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन मेरिनो, अमेरिकन रॅम्ब्युलेट, रशियातील स्टॅव्हरोपोलेस्की, पोलवर्थ व काराकुल इ. विदेशी जातींचे नर आयात करून शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. काश्मीरमध्ये बनिहाल व दाचिगाव, हिमाचल प्रदेशामध्ये सरहान, उत्तर प्रदेशात पिंपळकोटी, राजस्थानमध्ये जयपूरजवळ अवकिनगर व तमिळनाडूमध्ये उटकमंड येथील संशोधन केंद्रांमध्ये असे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये पुणे येथे मेरिनो व रॅम्ब्युलेट महूद आणि रांजणी येथे कॉरिडेल या जातींच्या मेंढ्या आयात करून दख्खनी मेंढ्यांशी संकर प्रजननाने नवीन विभेद निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यांशिवाय हिस्सार येथे १९६९ मध्ये आणि अगदी अलीकडे ममिडीपल्ली (आंध्र प्रदेश), चल्लाकेरी (कर्नाटक), डकसम (जम्मू व काश्मीर), भैंसोरा (उत्तर प्रदेश) व फतेपूर (राजस्थान) येथे केंद्र शासनाच्या मदतीने मेंढ्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ह्या ठिकाणी आयात केलेल्या विदेशी नरांचा स्थानिक मेंढ्यांशी संकर करण्यात येतो. येणाऱ्या संकरित प्रजेचे वाटप शेतकऱ्यांत केले जाते.
मेंढ्यांच्या मांसल जातींची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दक्षिण भारतातील मंड्या व नेल्लोर आणि उत्तर भारतातील बिकानेरी, नाली व लोही या मांसल जातींमध्ये संकर प्रजननाचे तसेच साऊथ डाऊन, रोमनी मार्श, कॉरिडेल आणि डॉर्सेट डाऊन या विदेशी मांसल मेंढयांच्या जातींचा मंड्या, नेल्लोर व बिकानेरी या भारतीय जातींच्या मेंढ्यांबरोबर संकर प्रजननाचे नवे विभेद तयार करण्याचे प्रयत्न चालू आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/17/2020
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.