सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विश्वासराव पाटील यांनी ऊस, केळी या पिकांपासून चांगले उत्पादन घेताना, या पिकामध्ये कांदा, हरभरा यासारखी आंतरपिके घेऊन उत्पादनखर्चात बचत केली आहे.
उरूण इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील विश्वासराव राजाराम पाटील यांच्याकडे 17 एकर शेती आहे. त्यातील 8 ते 10 एकरमध्ये ऊस लागवड असते. या ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याचे व नंतर हरभरा पीक घेतात. कांदा आंतरपीक काढणीस तयार झाल्यावर विश्वासराव त्यामध्ये सरीत उसाची लागवड करतात. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने लागवड करायचे. यामध्ये ऊस बेण्याचा मोठा खर्च होता. तसेच उगवण क्षमतेची खात्री नव्हती. यासाठी उसाचे रोप तयार करण्यास सुरवात केली. त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर दर वर्षी ऊस रोपे स्वतः तयार करून त्याची लागवड करतात. यासाठी ऊस शेतीतील निवडक ऊस काढून एक डोळा पद्धतीने कांड्या करतात. या कांड्या चुन्याच्या निवळीत बुडवून बाहेर काढल्या जातात. गोणपाटात गुंडाळून अंधाऱ्या खोलीत चार दिवस ठेवल्या जातात. नंतर बाहेर काढून डोळा फुगलेल्या कांड्यांना ऍझोटोबॅक्टर लावले जाते. त्यांची लागवड ट्रेमध्ये कोकोपीट भरून करतात. नंतर हे ट्रे उन्हात ठेवले जातात. त्यावर आच्छादन म्हणून उसाचा पाला टाकला जातो. सावलीपेक्षा उन्हात रोपांची वाढ चांगली होते, असे त्यांचे मत आहे. असे करण्यामुळे रोपवाटिकेत शंभर टक्के उगवण होते.
वाळवा तालुक्यात साधारणपणे भुईमूग आणि सोयाबीनचे आंतरपीक घेतले जाते. लासलगाव, नाशिक या परिसरात शेतकरी दौऱ्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड पाहण्यात आली. नाशिक भागामध्ये प्रत्येकाच्या बांधावर उभ्या असलेल्या मोठमोठ्या कांदा चाळी पाहून ते भारावले. विश्वासरावांनी सरळ राजगुरुनगर येथील कांदा, लसूण संशोधन केंद्र गाठले. तेथील तज्ज्ञांशी बोलून कांदा पिकाचे नियोजन केले. 2003 पासून अशा प्रकारच्या कांदा पिकाला सुरवात केली. पूर्वी ते सरी- वरंबा पद्धतीने कांद्याची लागवड करत असत. आता ते तीन फुटांच्या गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करतात. जुलैमध्ये कांद्याची रोपवाटिका ते स्वतः करतात. ज्या क्षेत्रात कांदा पीक घ्यायचे, तिथे ताग पेरून फुलोऱ्यात आल्यानंतर गाडला जातो. त्यानंतर पाच फुटांच्या सऱ्या सोडून तीन फुटांचे गादी वाफे तयार केले जातात. यामध्ये ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकून सिंचनाची सोय केली जाते. चार ते पाच इंच अंतरावर कांद्याची रोपे लावली जातात.
खरिपातील कांद्यामध्ये सेंद्रिय खतांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. शेणखत कंपोस्ट पाच ते सहा ट्रॉली वापरले जाते. कांद्यासाठी रासायनिक खतांचा वापर करत नाही. तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी तंबाकूच्या काड्या व गोमूत्र एकत्र भिजवून फवारणी करतो. तसेच पिकाच्या पोषणासाठी दोन किलो गूळ, दोन किलो मासे यांचे मिश्रण करून चांगले कुजल्यानंतर त्याची फवारणी केली जाते. या फवारण्या दर पंधरा दिवसांनी करतात. त्यामुळे पिकाचे पोषण व कीड रोगाला प्रतिबंध होत असल्याचे त्यांचा अनुभव आहे.
कांद्याचे एकरी सहा ते सात टन उत्पादन मिळते. मागील वर्षी अधिक पावसामुळे एकरी पाच टन उत्पादन मिळाले. कांद्यासाठीचा उत्पादन खर्च एकरी 17 हजारपर्यंत येतो. मोठ्या कांद्याची विक्री प्रामुख्याने परिसरातील ढाबे, हॉटेल व्यावसायिक यांना केली जाते. लहान कांद्याच्या विक्रीसाठी बाजारामध्ये अन्य व्यक्तींच्या साह्याने केली जाते. त्यामुळे दोन्ही कांद्यांना सरासरी 17 रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
दर वर्षी कांद्यानंतर उसामध्ये हरभरा लागवड केली जाते. त्यापासून एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळते. हरभऱ्याची विक्री काढणीनंतर लगेच करत नाही. कारण त्या वेळी दर कमी असतात. मागील वर्षी काढणीनंतर हरभऱ्याचे दर 3000 ते 3200 रुपये क्विंटल होते. त्याऐवजी त्याची साठवण शासकीय गोदामात करून बियाण्यांसाठी 5000 ते 5200 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री केली.
खरिपात घेतलेल्या कांद्याची फार काळ साठवण करता येत नाही. उन्हाळ्यातील कांदा साठवणीत अधिक काळ टिकतो. कांदा साठवणीसाठी विश्वासरावांनी 100 फूट लांब व 4 फूट रुंद आकाराची कांदा चाळ उभारली आहे. त्यासाठी बांबू आणि शेतातील अवशेषांचा वापर करून खर्चात बचत केली आहे.
सिंचनासाठी गावातील सहकारी पाणीवापर संस्थेकडून मिळणाऱ्या पाण्याचा वापर केला जातो. या संस्थेचे ते संस्थापक आहेत. अर्थात पाणीवापर संस्थेचे पाण्यावर ठिबक सिंचन यंत्रणा चालवणे हे अधिक खर्चिक काम ठरत असल्याने स्वतःचे शेततळे उभारले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते यशस्वी झाल्याने अन्य शेतकऱ्यांनाही या पद्धतीचा वापर करण्यासाठी ते उद्युक्त करतात. शेततळ्यात पाणीवापर संस्थेचे पाणी मीटरद्वारा सोडणे शक्य आहे. तेथून प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार ठिबकद्वारा शेतीला देता येईल. त्यातून पाण्याची मोठी बचत साधणार आहे.
हळद - 2011 पर्यंत दोन वर्षे हळदीचे उत्पादन 30 गुंठ्यांमध्ये त्यांनी घेतले होते. त्यांची एकरी उत्पादकता 18 क्विंटलपर्यंत आली होती. मागील वर्षी हळद घेतली नाही.
रताळे लागवड - गेली दोन वर्षे विश्वासराव डिसेंबर जानेवारीमध्ये दीड एकरवर रताळे लागवड करत होते. त्यासाठी पाटाने पाणी दिले जाते. ठिबकवर रताळे चांगले पोसत नसल्याचे त्यांचे मत आहे. उत्पादन खर्च 20 हजार रुपये होतो. रताळे उत्पादकता एकरी 10 टन असून, प्रति किलो सरासरी दहा रुपयेपर्यंत दर मिळतो. या वर्षी आषाढी एकादशीच्या बाजारपेठेकडे लक्ष ठेवून एप्रिलमध्ये रताळे लागवड करण्याचा विचार असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले.
1) पाचट न जाळता कुट्टी करून शेतात गाडतात. हिरवळीचे खत तागाची लागवड करून गाडतात.
2) उसाची एक डोळा रोप निर्मिती.
3) उसाच्या फुटव्यासह येणारी संख्या 50 हजार ठेवतात.
4) 12 एकरवर ठिबक सिंचन. भांगलण, पाणी देणे या उत्पादन खर्चात बचत होते.
5) ऍग्रोवनचे नियमित वाचक. ऍग्रोवनच्या प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांसह हजेरी.
6) बाजारपेठेतील परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन.
------
विश्वासराव पाटील - 9970900200
माहिती संदर्भ : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
राष्ट्र राज्य हे कडधान्य पिकाच्या उत्पादनांमध्ये द...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा...