অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्षारयुक्त जमिन व सुबाभुळ शेती

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन ही क्षारयुक्त झाली आहे. परिणामत: त्या जमिनीवर शेती करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. जिल्ह्यात अन्यत्र देखील मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जाते त्यास रासायनिक खते दिली जातात. या सततच्या बागायतीमुळे त्यास दिल्या जाणाऱ्‍या रासायनिक खतांमुळे जमिनी क्षारयुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आलेले आहे.

क्षारयुक्त शेतजमिनीवरील सुबाभुळ शेती

धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट येथे शेती करणारे डॉ. दीपक पाटील यांची देखील १७ एकर शेती ही बागायतीमुळे क्षारयुक्त झाली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांना सुबाभुळ हा पर्याय सापडला आणि आज ते ही शेती करार पद्धतीने करून या शेतीत सुबाभुळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत आहेत. त्यांचे अनुकरण करत धरणगाव तालुक्यात ३०० एकरात विविध शेतकरी यांनी देखील आपली क्षारयुक्त शेती ही करार पद्धतीने करत आपल्या क्षारयुक्त जमिनीवर सुबाभुळाची शेती करून उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील क्षारयुक्त शेतजमिनीवरील शेतीला सुबाभुळ हा पर्याय मिळाला आहे. जळगावला वैद्यकीय व्यवसाय करणारे प्रगतीशील शेतकरी डॉ. दीपक पाटील यांची ही यशोगाथा.

जळगावचे वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रगतीशील शेतकरी डॉ.पाटील यांची त्यांच्या मुळगावी धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट येथे १८ एकर शेती आहे. आपला व्यवसाय सांभाळून शेतीची आवड असल्याने ते शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादनवाढीसाठी प्रयोग करत असतात. आज आपल्या १८ एकर शेतात सुबाभुळची लागवड करून शाश्वत व भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. प्रथम ते आपल्या बागायती शेतात ऊस, कापूस, मका, गहू ही पिके घेत असत. सतत बागायतीतील लागवड त्यात दिली जाणारी रासायनिक खते यामुळे जमीन क्षारयुक्त होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येऊ लागली.

एकदा डॉ.पाटील लग्नानिमित्ताने सुरतला गेले असता रस्त्यात सोनगढ गुजरात येथे जे.के. पेपर मिल्सबाहेर लाकडाचे अनेक ट्रक उभे राहिलेले त्यांनी पाहिले. त्यांची उत्सुकता चाळवली गेली. त्यांनी थांबून ट्रक चालकांना विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्‍यांच्या शेतातील सुबाभुळचे तोडलेले लाकूड या पेपरमीलमध्ये आणल्याचे सांगितले. डॉ.पाटील यांनी तडक जे.के.पेपर मीलमध्ये जाऊन चौकशी केली असता शेतात कंपनीने दिलेले सुबाभुळचे बियाणे लावले तर ठराविक हमी भाव देऊन पेपर मील सुबाभुळ लाकूड करार करून ते लाकूड खरेदी करते. कटाई आणि वाहतूक देखील मील करत असल्याचे पेपरमीलच्या अधिकाऱ्‍यांकडून सांगण्यात आले. आपली जमीन क्षारयुक्त असल्याची कल्पना दिली असता काहीही हरकत नसल्याचे त्यांना उत्तर मिळाले.

जमिनीतील तणनिर्मुलन

जळगावला येताच डॉ.पाटील यांनी जे.के. पेपर मिल्सशी करार करून सुबाभुळाला क्षारयुक्त जमीन उत्तम असल्याने आपल्या १८ एकर जमिनीत एकरी चार हजार प्रमाणे झाडे लावली. एकरी ४० टन प्रमाणे २०१३ मध्ये प्रथम उत्पन्न घेतले तीन हजार रूपये प्रती टन सुबाभुळला भाव मिळाला. अकरा लाख रूपये नफा झाला. या सुबाभुळ लागवडीमुळे जमिनीतील तणनिर्मुलन झाले असल्याचे व मजुरी मशागतीचा ९० टक्के खर्च कमी झाला असल्याचे डॉ.पाटील सांगतात. शेतातील उभ्या लाकडाची तोडणी आणि मीलपर्यंतची वाहतूक देखील कंपनीच करीत असल्याने तो देखील खर्च कमी झाला. कंपनी भाव बांधून देत असल्याने भावाची निश्चिती झाली असल्याचे डॉ.पाटील यांनी बोलतांना सांगितले.

डॉ.पाटील यांना मिळालेले यश पाहता केवळ वांजारी खपाट मध्येच ८० एकरमध्ये अन्य शेतकऱ्‍यांनी सुबाभुळ लावून करार शेती करण्यास सुरुवात केला आणि पाहता पाहता धरणगाव तालुक्यात ३०० एकरात करार शेतीद्वारे सुबाभुळचे उत्पादन घेतले जात आहे. क्षारयुक्त जमीन सकस बनत आहे शेतकरी आता त्यात आंतर पीकदेखील घेऊ लागलेले आहेत. बागायती जमिनीमुळे जिल्ह्यात क्षारयुक्त जमिनीचे प्रमाण वाढत असतांना सुबाभुळ हे शोधलेले उत्तर जिल्ह्याला दिलासा देणारे आहे. या सुबाभुळच्या माध्यमातून करार शेती होऊ लागल्याने शेतकऱ्‍यांना निश्चित असा भाव मिळायला लागला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा ठरणार आहे.

लेखक - विजय पाठक, जळगाव

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate