कृषि विभागासह विविध विभागांनी जलयुक्त शिवार योजनेत केलेली कामे आणि त्याला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागाची मिळालेली साथ यामुळे कळवण तालुक्यातील वाडी गाव टँकरमुक्त झाले असून 212 हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवड देखील झाली आहे. वाडी गावात हिवाळ्यातच टँकरची गरज भासत असे गेली चार वर्षे अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागला. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत 2015-16 मध्ये प्रथम टप्प्यात गावाची निवड करण्यात आली.
उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे आणि तालुका कृषि अधिकारी जीतेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फेरीद्वारे कामांची निवड करण्यात आली. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे योजनेला प्रतिसाद दिल्याने कामे वेगाने सुरू झाली. कृषी विभागामार्फत माथा ते पायथा या संकल्पनेनुसार मजगीची 24 कामे करण्यात आली. त्यामुळे पाणी जिरण्यास मोठी मदत झाली. शिवाय लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झाली. तीन सिमेंट नाला बांध उभारण्यात आल्याने गावातील जेवणा ओहळ या नाल्यात आजही पाणीसाठा दिसून येतो.
याशिवाय गावातील पाझर तलावातील गाळ काढण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेद्वारा पुनर्भरणाची 5 कामे आणि लघुपाटबंधारे विभागाने कोल्हापुरी बंधारा दुरुस्तीची केल्यामुळे गावाच्या पिण्याची पाण्याची समस्या दूर झाली आहे. पूर्ण झालेल्या कामांमुळे 526 टीसीएम पाणी अडविण्यात आल्याने रब्बी क्षेत्राला त्याचा फायदा झाला आहे. गावाच्या गरजेएवढे पाणी उपलब्ध झाल्याने पीक रचनेतदेखील बदल झाला आहे. पारंपरिक बाजरी, मका ऐवजी भाजीपाला घेण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. पिकाची घनता 110 टक्क्यावरून 160 टक्क्यापर्यंत वाढली आहे. पाण्याचा कार्यक्षम उपयोग करण्यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहित केले.
गावातील 49 हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आले आहे. त्याशिवाय 4 शेतकऱ्यांना तुषार संच देण्यात आले आहेत. गावात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा साठवण गृह अनुदानावर देण्यात आली आहेत. गावात 47 कांदा चाळी आहेत. रोजगार हमी योजने अंतर्गत 7.5 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कांदे, गहू, मका, हरबऱ्याची लागवड केली आहे. गावातील विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली असून संपूर्ण शिवार हिरवेगार दिसते आहे. जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना प्रामुख्याने लाभ झाल्याने शेतकरी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.
रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. विलास पगार, उपसरपंच- जलयुक्त शिवार योजनेमुळे तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांमुळे गावात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे. ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्वदेखील कळले असल्याने लोकसहभागाने अधिकाधिक पाणी शिवारात अडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जितेंद्र शहा, तालुका कृषी अधिकारी- विविध विभागांनी एकत्रित प्रयत्न केल्याने गाव वॉटर न्युट्रल झाले. गावातील पाणी उपलब्धतेचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी कृषि विभागाने विविध योजना प्रभाविपणे राबविण्यावर भर दिला आहे. शेतकरी आता अधिक लाभाची पिके घेण्याकडे वळतो आहे. जलयुक्तची ही मोठी उपलब्धी आहे.
लेखक - डॉ.किरण मोघे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/5/2020
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके...
खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी,...
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भार...
पशुपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च काढला तर तो चारा आ...