অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हुमणी

खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे.

हुमणीविषयी

  • बहुभक्षी कीड.
  • शास्त्रीय नाव
  • कोणत्या पिकांवर आढळते? - ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका
  • नुकसानाची तीव्रता- 30 ते 80 टक्के
  • वालुकामय जमिनीमध्ये अधिक उपद्रव

ओळख हुमणीची

अळी अवस्था

  • प्रथम अळी अवस्था पांढरीशुभ्र, पिवळे डोके, सुमारे 8 मी.मी. लांबी. छातीवर पायांच्या तीन जोड्या.
  • पूर्ण विकसित अळ्या पिवळट-सफेद, डोक्‍याचा रंग बदामी व इंग्रजीच्या "सी' अक्षराप्रमाणे अर्धगोलाकार.
  • पूर्ण विकसित अळीची लांबी सुमारे 40 ते 45 मि.मी.
  • प्रौढ भुंगेरा
  • तपकिरी किंवा बदामी रंग. 18 ते 20 मि.मी. लांब व 8 मि.मी.पर्यंत जाड. पंखाची प्रथम जोडी ढाली प्रमाणे मजबूत. पंखाची दुसरी जोडी पातळ व घडी करण्यासाठी लवचिक असून, पहिल्या जोडीखाली सुरक्षित व पंख उघडताना मदत करते.

हुमणी किडीची जीवनसाखळी

1) पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात.
2) कडूलिंब, बाभूळ, बोर यासारख्या वृक्षावर मादीसोबत मिलनासाठी जमतात.

नियंत्रण हवे याच वेळी

याच काळात बांधावरील यजमान झाडांची पाने खातात.
रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावून त्यांना आकर्षित करावे. संध्याकाळी व रात्री या झाडांच्या फांद्या जोरात हलवून प्रौढ खाली पाडावेत. ते गोळा करून केरोसीन वा कीटकनाशकमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. हे काम सामुदायिकरीत्या करणे अधिक फायदेशीर.
3) त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत परत जातात.
(दिवसा प्रौढ किडे दिसून येत नाहीत.)

अंडी घालण्याचा कालावधी जून-जुलै

  • जमिनीत साधारणपणे 8 ते 10 सें.मी. खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी
  • एक मादी तिच्या जीवनकाळात देते- 60 ते 70 अंडी.
  • अंड्यातून 9 ते 10 दिवसांत अळी बाहेर येते.

अळी अवस्था- 5 ते 7 महिन्यांची

  • जमिनीत ती 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते.
  • हीच पिकासाठी नुकसानकारक अवस्था
  • ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते.
  • कोष तांबूस तपकिरी रंगाचा व टणक. कोषावस्था 20 ते 25 दिवस
  • प्रौढ- कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत भुंगेरे सुरवातीस पिवळसर पांढरट व कालांतराने तपकिरी होतात. भुंगेराचे आयुष्य सुमारे 80 ते 90 दिवस.
  • हुमणीची अशा प्रकारे एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.

नुकसान

  • प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.
  • नुकसान प्रामुख्याने आढळणारे महिने- ऑगस्ट-सप्टेंबर

एकात्मिक कीड नियंत्रण

  1. उन्हाळ्यात खोल नांगरट, त्यामुळे जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था (प्रौढ कीटक) नाश पावतात.
  2. लागवडीपूर्वी चारीत एरंडी खत (250 किलो प्रति हेक्‍टर) दिल्यास भुईमुगातील नुकसान टाळणे शक्‍य.
  3. यजमान झाडांवर फवारणी- (प्रति 10 लिटर)
  4. कार्बारील (60 टक्के)-20 ग्रॅम किंवा
  5. थायोडीकार्ब (75 टक्के) 10 ग्रॅम
  6. द्रावण सर्व पानांवर व्यवस्थितरीत्या फवारावे.
  7. पीक लागवडीपूर्वी- फोरेट (10 टक्के दाणेदार)- 25 किलो प्रति हेक्‍टर प्रमाणे जमिनीत टाकावे.
  8. भुईमूग पेरण्यापूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस (25 टक्के ईसी) 25 मिली प्रति किलो प्रक्रिया. तीन तास सावलीत वाळवून पेरणी करावी.
  9. हुमणीचे नैसर्गिक शत्रू- बगळा, चिमणी, घार, कावळे, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस हे हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
  10. परोपजीवी बुरशी-बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम ऍनिसोपली),
  11. जिवाणू-बॅसीलस पॉपीली
  12. सूत्रकृमी- हिटरोऱ्हॅब्डिटीस व स्टेनरनेमा
  13.  

    पीक फेरपालट- एरंडी, कापूस अथवा तुरीला पसंती द्यावी.

    उभ्या पिकात

    उपद्रव आढळल्यास ठिबकद्वारा पाण्यामध्ये थेंब-थेंब क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के ईसी) पाच लिटर प्रति हेक्‍टर सोडावे.

     

    संपर्क - डॉ. मिलिंद जोशी, 9975932717
    (लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे येथे कार्यरत आहेत. )

    स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate