অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हरितगृहात ढोबळी मिरची

तारगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील दिलीप बाबासाहेब मोरे हे गेल्या पंधरा वर्षींपासून ढोबळी मिरचीचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. सातत्याने पीक लागवड तंत्रात बदल करून दर्जेदार ढोबळी मिरची उत्पादन घेण्याचा मोरे यांचा प्रयत्न असतो. ढोबळी मिरचीच्या बरोबरीने ऊस, हळद, स्टॉबेरी तसेच चायनीज भाजीपाला लागवडीतही त्यांनी सुधारित तंत्राचा अवलंब करून चांगले उत्पादन मिळविले आहे.
तारगाव (जि. सातारा) हे कोरेगाव तालुक्‍याच्या टोकावर असलेले गाव. या गावातून कृष्णा नदी गेली असल्याने गावास मुबलक पाणी. या गावातील बाबासाहेब खाशाबा मोरे हे प्रगतशील शेतकरी, त्यांना तीन मुले. दोघे नोकरी करतात, तर एकाकडे शेतीचे नियोजन आहे. मोरे कुटुंबीयांची एकूण साडेसात एकर शेतजमीन. सन 1986 मध्ये बाबासाहेबांना कृषी अधिकारी ए. के. म्हमाणे यांनी ढोबळी मिरची लागवडीचा प्रयोग करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 18 गुंठे क्षेत्रात तीन बाय दीड अंतरावर चार हजार 700 रोपांची लागवड केली. पीक जरी नवीन असले तरी त्याचे योग्य व्यवस्थापन करीत त्यांनी नऊ टनाचे उत्पादन मिळविले. प्रति किलोस सरासरी सहा रुपये इतका दर मिळाला. सगळा खर्च वजा जाता त्यांना 37 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन मिळाले. या पिकातील आर्थिक नफा लक्षात घेऊन त्यांनी दर वर्षी मिरची लागवडीत सातत्य ठेवले. अशा या प्रयोगशील शेतीचा वारसा त्यांचे चिरंजीव दिलीप पुढे चालवित आहेत. दिलीप हे दहा वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य आहेत. पारंपरिक ढोबळी मिरची लागवडीचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी आता हरितगृहात ढोबळी मिरचीमध्येही हातखंडा मिळविला आहे. सन 1998 मध्ये दिलीप मोरे यांनी पाच गुंठे क्षेत्रावर हरितगृहात बाजारपेठेच्या मागणीनुसार लाल आणि पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीची लागवड केली. हरितगृहात ढोबळी मिरचीच्या उत्पादनात चांगले सातत्य राहिल्याने त्यांनी 2006 मध्ये दुसरे पाच गुंठे क्षेत्रावर हरितगृह उभे केले.

अशी आहे हरितगृहातील ढोबळी मिरची लागवड

  • लागवडीसाठी गादीवाफा केला. वाफा करताना तांबडी माती, दोन ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत, दीड बॅग निंबोळी पेंड, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून वाफे तयार केले.
  • गादी वाफ्याची उंची दीड फूट, रुंदी अडीच फूट आणि दोन वाफ्यात मध्यापासून अंतर पाच फूट ठेवले आहे.
  • गादी वाफ्यावर दोन ओळीतील अंतर पावणेदोन फूट आणि दोन रोपातील अंतर दोन फूट ठेवले. रोप लागवड फेब्रुवारी महिन्यात केली. यामध्ये लाल मिरचीची 550 रोपे आणि पिवळ्या मिरचीची 550 रोपांची लागवड केली.
  • पिकाला ठिबक सिंचन केले. रोप वाढीच्या दृष्टीने महिन्याभरात नायलॉन दोरीचा आधार दिला जातो.
  • पिकाला शिफारशीनुसार विद्राव्य खते दिली जातात.
  • या पिकावर भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो, तसेच फुलकिडे, पांढरी माशी, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो. कीड रोगाचा प्रादुर्भाव ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशक आणि बुरशीनाशकांची शिफारशीत मात्रेत फवारणी केली जाते. सेंद्रिय कीडनाशकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
  • लागवडीनंतर साधारणपणे तीन महिन्यांने उत्पादन सुरू होते. तापमान जास्त असण्याच्या काळात आठवड्यातून दोनदा तोडणी होते. हिवाळ्याच्या काळात आठवड्यातून एकदा तोडणी केली जाते.
  • पहिल्या तोडणीत 50 किलो मिरचीचे उत्पादन मिळते. पुढे पीक वाढीच्या काळात उत्पादन वाढत जाते. पुढे प्रति तोड्यात 200 किलो उत्पादन मिळते. साधारणपणे काढणी चार महिने चालते.
  • यंदाच्या हंगामातील ढोबळी मिरचीची काढणी सप्टेंबरपासून सुरू झाली. आत्तापर्यंत 2100 किलो उत्पादन मिळाले, अजून एक टन उत्पादन मिळेल. जानेवारी अखेरपर्यंत काढणी सुरू राहील.
  • सध्या मुंबई बाजारात सरासरी 60 रुपये किलो दर मिळत आहे. एका बॉक्‍समध्ये 10 किलो मिरची पॅकिंग केले जाते.
  • पीक निघाल्यानंतर रोपांची काढणी करून एक महिना जमिनीला विश्रांती दिली जाते. त्यानंतर जमीन हलकी नांगरून ताग पेरतो. फुलोऱ्यात येताच ताग कापून जमिनीवर अंथरतो. पाला वाळल्यानंतर जमीन नांगरून पुन्हा गादीवाफे तयार करतो.
  • पाच गुंठ्यांची दोन हरितगृहे असल्याने एका हरितगृहातील हंगाम संपल्यानंतर दुसऱ्या हरितगृहातील ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू राहील असे नियोजन केले जाते, त्यामुळे वर्षभर ढोबळी मिरची बाजारपेठेत जाते.

महत्त्वाच्या बाबी

  • शक्‍यतो जून ते ऑगस्ट या महिन्यात ढोबळी मिरचीची लागवड करण्याचे टाळावे.
  • पीक निरोगी राहण्यासाठी हरितगृहामध्ये खेळती हवा ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
  • पीक वाढीच्या गरजेनुसार खते व पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पिकांस पाणी व खत कमी-जास्त होणार नाही यांची काळजी घ्यावी. जीवाणू खतांचा वापर फायदेशीर ठरतो.
  • अनावश्‍यक पाने वेळेत काढली जावीत. पिकांची दररोज निरीक्षणे ठेवावीत.
  • ढोबळी मिरची लागवडीपासून 21 दिवसांच्या आत बांधणी केली जाते.
  • किडी व रोगाच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकांची फवारणी.
  • एक पीक घेतल्यावर चार महिने त्या हरितगृहाला विश्रांती दिली जाते.
  • हरितगृहामधील मशागत पॉवर टिलरच्या साहाय्याने केली जाते.
  • ढोबळी मिरची बाजारात पाठवताना प्रतवारीला महत्त्व दिले जाते.
  • गेल्या 26 वर्षांपासून ढोबळी मिरचीचे पीक.
  • 1998 पासून विविध पिकांना ठिबक व तुषार सिंचनाचा वापर.
  • पाच गुंठ्यांच्या दोन हरितगृहांमध्ये रोटेशन पद्धतीनुसार वर्षभर ढोबळीच्या उत्पादनाचे गणित.
  • प्रत्येक पिकास पुरेशा प्रमाणात शेणखत, हिरवळीच्या पिकांचा वापर.
  • उसाचे एकरी 50 टनांपर्यंत सरासरी उत्पादन, सेंद्रिय खताचा जास्तीतजास्त वापर.
  • दर वर्षी 20 गुंठे क्षेत्रावर हळद लागवड केली जाते.
  • स्ट्रॉबेरी, चायनीज भाज्यांचे यशस्वी लागवडीचे प्रयोग.

पिकाचा ताळेबंद 

दिलीप मोरे यांनी 1998 व 2006 मध्ये दोन हरितगृहांची उभारणी केली आहे. त्यातून ते वर्षभर ढोबळीचे उत्पादन घेतात.

जून 2013 मध्ये पाच गुंठे हरितगृहातील ढोबळी मिरची लागवडीच्या खर्चाबाबत मोरे म्हणाले, की 1100 रोपांचे 12 हजार 100 रुपये, शेणखत सात हजार रुपये, रासायनिक खत 1300 रुपये, विद्राव्य खते 6600 रुपये, कीडनाशके 4600 रुपये, मेहनत व मजुरी 11 हजार रुपये असा एकूण 42 हजार 600 रुपये एवढा खर्च झाला. आतापर्यंत त्यांना 2100 किलो ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळाले असून प्रति किलोस 40 व सर्वांत जास्त 70 रुपये असा दर मिळाला आहे. अजूनही या प्लॉटमधून ढोबळीचा एक तोडा होणार आहे. यंदाच्या हंगामात सरासरी 50 रुपये दराने तीन टनांचे दीड लाखाचे उत्पादन मिळणार आहे. खर्च वजा जाता त्यांना एक लाख सात हजार रुपये उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.

2010 पासून ढोबळी मिरचीचा ताळेबंद

सन ......................... उत्पादन (किलो) ................. सरासरी दर (प्रति किलो)
2010 ..................... 2800 ..................................... 60 
2011 ..................... 3200 ....................................... 55 
2012 ..................... 3800 .......................................... 35

बाजारपेठेचा अभ्यास महत्त्वाचा...

दिलीप मोरे सुरवातीच्या काळात ढोबळी मिरचीची विक्री सातारा येथील स्थानिक बाजारपेठा तसेच हॉटेल व्यावसायिकांना करत होते. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांकडून जास्त मागणी नव्हती, त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळत नव्हता. चांगला दर मिळण्यासाठी वेगळी बाजारपेठ शोधण्याशिवाय पर्याय नसल्याची त्यांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी मुंबई बाजारपेठेत शोध घेतला. त्यांना पंचतारांकित हॉटेलला भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांची माहिती मिळाली. मुंबईतील लोकांशी दराबाबत चर्चा केली. दर चांगला मिळण्यासाठी प्रतवारी व वेळेत ढोबळी पुरवठा करून अल्पावधीत त्यांनी विश्‍वास संपादन केला. बाजारात असलेली मोठी मागणी व स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू लागल्याने उत्साह वाढत गेला. त्यांना स्थानिक बाजारपेठेत प्रति किलोस 25 ते 30 असा दर मिळत होता, तर मुंबई येथे 40 ते 70 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या मिरची दहा किलोच्या बॉक्‍स पॅकिंगने पाठवली जाते.

कुटुंबाची चांगली साथ

पीक व्यवस्थापनाबाबत मोरे म्हणाले, की माझे वडील ढोबळी मिरची लागवड 1986 पासून करत असल्याने या पिकांच्या सर्व अवस्था, त्यातील धोके पहिल्यापासून माहिती होत्या. त्यांचा उपयोग आम्हाला हरितगृहामध्ये चांगला झाला. आजही वडील मार्गदर्शन करतात, तसेच आई, पत्नी राजश्री यांची ढोबळी मिरची प्रतवारी, पॉकिंगमध्ये मोठी मदत होते. ढोबळी मिरची, स्टॉबेरी, चायनीज भाज्या लागवडीसाठी कृषी सहायक अनंत कर्वे, तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. शेतीमुळे कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याबरोबरच तीन मुलांना अभियांत्रिकी शिक्षण देता आले आहे. भविष्यात फळप्रक्रिया उद्योग उभारण्याची इच्छा असून त्याबाबत माहिती घेणे सुरू आहे. 

दिलीप मोरे-9403686030.

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate