राज्यात सर्वत्र पावसाळी आर्द्रतायुक्त वातावरण आहे. या वातावणामध्ये द्राक्षबागेमध्ये करपा, भुरी, केवडा, तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या वर्षी पाऊस उशिरा आल्याने आधीच वाढलेला मिलीबग, तसेच या अनुकूल वातावरणात जीवनचक्राची सुरवात करणारा खोडकिडा आढळून येतो. या कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी बागायतदार छाटणीनंतर रासायनिक घटकांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र, या आर्द्रतायुक्त वातावरणात जैविक घटकांचा वापर केल्यास संभाव्य कीड-रोगांची समस्या कमी होऊ शकते. तसेच रासायनिक कीडनाशकांचा उर्वरित अंश (रेसिड्यू)ही मर्यादेत राहू शकेल.
मिलीबग व खोडकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी व्हर्टिसिलीयम लेकॅनी, मेटारायझिम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक बुरशीजन्य कीडनाशकांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. आर्द्रतायुक्त वातावरणात या बुरशीजन्य कीडनाशकांची वाढ किडींच्या शरीरावर चांगल्या प्रकारे होते. ही बुरशीजन्य कीडनाशके वापरण्यापूर्वी गुळाच्या पाण्याची प्रक्रिया केल्यास अधिक फायदा मिळतो. बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम या बुरशीच्या वापरामुळे खोडकिडीच्या प्रौढावस्थेचा चांगला बंदोबस्त होऊ शकतो.
साधारणपणे मे महिन्याच्या शेवटपासून किंवा जून महिन्याच्या सुरवातीपासून बागेत भुरीची समस्या जाणवू लागते. नंतरच्या काळात परिपक्व होत जाणाऱ्या काडीवर फुटणाऱ्या अतिरिक्त कोवळ्या फुटींवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागतो. छाटणी जवळ आल्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. उशिरा होणाऱ्या छाटणीसाठी पाने टिकवणे फार महत्त्वाचे असते. या हंगामात काडी परिपक्वतेची समस्या फारशी जाणवत नाही. त्यामुळे बागायतदार बंधूंनी छाटणीचे नियोजन करताना बागेत वाढणाऱ्या भुरी, डाउनीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलीस, सुडोमोनास फ्लुरोसन्स, ऍम्पोलोमायसिस क्विसकॅलिस यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा. त्यामुळे रोगांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते.
मागील हंगामात रासायनिक कीडनाशकांच्या अंश पातळी (रेसिड्यू)चा अनुभव आलेल्या बागायतदारांनी जैविक कीडनाशकांचा वापर अभ्यासपूर्वक करावा.
संपर्क- प्रा. तुषार उगले, 8275273668
(लेखक जैव कीड नियंत्रण प्रयोगशाळा, कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत. )
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरिता बागायतदारांन...
केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्...
हवामान बदलामुळे द्राक्षशेतीत रोगांची समस्या व त्या...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...