ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते. चुनखडी, तसेच हलक्या बरड जमिनीत याची लागवड करू नये/ टाळावी. या पिकाची लागवड खरीप, तसेच रब्बी हंगामात केली जाते.
सर्व लागवड एकाच वेळी न करता 15 दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड केल्यास फुलांची नासाडी कमी होते. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत.
लागवडीपूर्वी कंद शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात 20 मिनिटे बुडवून नंतर सुकवून लागणीस वापरावेत. लागवड सरी वरंब्यावर 45 x 15 सें. मी. अंतराने करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना 30 सें. मी. x 20 सें. मी. अंतराने, पाच ते सात सें. मी. खोलीवर कंदांची लागण करावी. साधारणपणे हेक्टरी 1.25 ते 1.50 लाख कंद लागवडीसाठी लागतात.
1) पिवळसर रंगाची फुले "गणेश', फिकट गुलाबी रंगाची फुले "प्रेरणा', जांभळट गुलाबी रंगाची फुले "तेजस' आणि निळ्या रंगाची फुले "नीलरेखा' या जाती निवडाव्यात.
2) फिकट गुलाबी रंगाची "सुचित्रा', लाल रंगाची "पुसा सुहागन', निळ्या रंगाची "ट्रॉपिक सी', पिवळसर रंगाची "सपना', पांढऱ्या रंगाची "संसरे', केशरी रंगाची "हंटिंग सॉंग' या जातीही बाजारपेठेच्या दृष्टीने फायदेशीर आहेत.
फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी 50 ते 70 टन शेणखत जमिनीची मशागत करताना मिसळावे. माती परीक्षणानुसारच लागणीच्या वेळी 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. प्रति हेक्टरी नत्र खताची 300 किलो मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये द्यावी. नत्राची मात्रा पिकाला दोन, चार आणि सहा पाने आल्यावर, म्हणजेच लागवडीनंतर तीन, पाच आणि सात आठवड्यांनी सम प्रमाणात विभागून द्यावी. रासायनिक खते दिल्यावर पाण्याची पाळी द्यावी. पिकाला मातीची भर द्यावी.
संपर्क - 020 - 25693750
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020