অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओळख रानभाज्यांची- करंबळ

करंबळ


शास्त्रीय नाव- डिलेनिया इंडिका (Dillenia indica)
कूळ - डिलेनिएसी (Dilleniaceae)
  • स्थानिक नावे- करंबेळ, मोठा करमळ
  • संस्कृत नावे- भव्य, भाव्य
  • हिंदी नावे- चालत, चालता
  • इंग्रजी नावे- एलिफंट ऍपल (Elephant Apple), इंडियन कॅटमॉन (Indian catmon)

होंडापारा ट्री (Handapara tree)
करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत, श्रीलंका, नेपाळ या देशांत आढळतात. भारतात करमळीचे वृक्ष कोकण, मलबार परिसरात, तसेच आसाम, बिहार या राज्यांतही नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले आढळतात. गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यांतील समुद्रकिनारी प्रदेशात करमळीचे वृक्ष आढळतात. महाराष्ट्रात करमळीचे वृक्ष अलिबाग, बांदा, सावंतवाडी या कोकण परिसरांत, तसेच विदर्भातील मेळघाट परिसरातील जंगलात वाढलेले आढळतात. भारतात अनेक ठिकाणी करमळीच्या वृक्षांची शोभेसाठी बागेत लागवड करतात.

वृक्षाची ओळख

खोड ः करमळीचे खोड मध्यम उंचीचे, सरळ वाढणारे असते. खोडावरची साल पातळ, फाटलेली, तपकिरी रंगाची.

  • फांद्या ः अनेक, पसरणाऱ्या असून, वृक्षाला गोलसर आकार देतात.
  • पाने ः साधी, एका आड एक, फांद्यांच्या टोकांवर गुच्छाने येतात. पाने गडद हिरवी, लांबट 20 ते 30 सें.मी. लांब व 10 सें.मी. रुंद, पानांच्या कडा धारदार कातरलेल्या, पानांवरील शिरा अनेक एकमेकांस समांतर, स्पष्ट व अगदी ठळक. पानांचा देठ 2.5 ते 5.0 सें.मी. लांब, तळाकडे थोडासा जाडसर. मे महिन्यात पानगळ होते. जून महिन्यात नवीन कोवळी पाने येऊ लागतात.
  • फुले ः पांढरी, मोठी 15 ते 16 सें.मी. व्यासाची, सुंदर व आकर्षक असतात. फुले द्विलिंगी, नियमित, एकांडी, फांद्यांच्या टोकांवर येतात. फुलांना गोड सुगंध असतो. फुलांचा देठ 7.5 ते 8.0 सें.मी. लांब, नाजूक असल्याने फुले खाली झुकलेली असतात. पुष्पमुकुट 5 दलांनी बनलेला. पुष्पमुकुट दले अर्धगोलाकार, जाड व मांसल, पाकळ्या 5, पांढऱ्या, लगेच गळून पडतात. पुंकेसर अनेक, बीजांडकोश 5 ते 20 कप्पी, बीजांडे अनेक. परागवाहिनी एक, जाडसर, परागधारिणी 15 ते 20 गोलाकार चक्राप्रमाणे पसरलेल्या, आकर्षक. करंबळ वृक्षांना जून, जुलै महिन्यांत फुले येतात.
  • फळे ः मोठी 7.5 ते 10 सें.मी. व्यासांची गोलाकार, बाहेरून टणक, पण आतून जाड, गरयुक्त मांसल. फळांचा देठाकडील अर्धा भाग जाड, अर्धगोलाकार मांसल पुष्पमुकुटानी झाकलेला असतो. फळे हिरव्या रंगाची, पिकल्यावर पिवळट रंगाची, रुचिकर लागतात.
  • बिया ःअनेक, रसाळ, गरामध्ये लगडलेल्या, चपट्या, कडा केसाळ.

करमळीचे औषध गुणधर्म

  • करमळ या वनस्पतीची फळे, साल व पाने औषधी गुणधर्माची आहेत.
  • फळे खोकल्यावरील औषधात वापरतात. करमळीच्या पिकलेल्या फळांचा रस साखर पाण्यात घोटून ज्वरात आणि खोकल्यात देतात. त्याने शौचासही साफ होते. फळांमध्ये अँटिऑक्‍सिडंट गुणधर्म आहेत.
  • अतिश्रमामुळे तसेच अशक्तपणात पाय वळतात, त्या वेळी करंबळीच्या सालीचा रस मिरपुडीबरोबर पायावर लावतात व त्यावर करंबळीची पाने बांधतात, यामुळे थोडी आग होते, पण फोड येत नाहीत.
  • करंबळीची पाने आकाराने मोठी असल्याने, पानांपासून पत्रावळ्या तयार करतात.
  • करमळीच्या फुलांचे व फळांचे जाड मांसल पुष्पमुकुट दले आंबट चवीची असतात. ही दले स्थानिक लोक खाण्यासाठी वापरतात, तर काही वेळा दले वाळवून अमसुलीप्रमाणे वापरतात.
  • करमळीची कच्ची, तसेच अर्धवट पिकलेल्या फळांपासून भाजी बनवितात, त्याचप्रमाणे लोणचेही बनवितात.

भाजी बनविण्याची कृती

साहित्यः करमळीची कच्ची हिरवी किंवा अर्धवट पिकलेली फळे, तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा आणि ओल्या मसाल्यासाठी ओले खेबरे, आले, लसूण, तीळ, खसखस इ. 
कृती ः फळे धुऊन, चिरून, बिया काढून घ्यावे. फळे परत चिरून लहान तुकडे करावेत. तीळ, खसखस भाजून घ्यावेत. ओले खोबरे किसून घ्यावे. तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले मिक्‍सरमध्ये बारीक करून ओला मसाला तयार करावा. चिरलेला कांदा तेलात भाजून घ्यावा. त्यात चिरलेल्या फळांचे तुकडे घालावेत. नंतर हळद, तिखट मीठ घालून भाजी नीट परतून घ्यावी. थोड्या वेळाने ओला मसाला घालावा. सर्व मिश्रण परतून घ्यावे. भाजी चांगली शिजवून घ्यावी.

लोणचे बनविण्याची पाककृती

साहित्य ः करमळीची कच्ची फळे, मीठ, हिंग, हळद, मेथी पावडर, तेल, मिरपूड, मोहरी डाळ, मिरची पावडर, लोणचे मसाला इ. 
कृती ः फळे पुष्पमुकुटासहित धुऊन चिरून घ्यावीत. गरजेप्रमाणे फळाच्या फोडी तयार कराव्यात. नंतर फोडींना मीठ लावून चोळावे. तेल गरम करून, त्यात मोहरी डाळ, मिरची पावडर, मिरपूड, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद टाकून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यानंतर मीठ लावलेल्या फोडींवर ओतावे. सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. आवश्‍यकता असल्यास लोणचे मसाला वापरावा. नंतर हे सर्व बरणीत भरून, झाकण लावून हवाबंद करून काही दिवस ठेवावे. नंतर लोणच्याचा वापर करावा.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate