* शास्त्रीय नाव-ः Tribulus terrestris (ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस)
* कुळ ----phyllaceae झायगोफायलेसी
स्थानिक नावे - गोखरू या वनस्पतीला ‘सराटा’, ‘काटे गोखरू’, ‘लहान गोखरु’, ‘गोक्षुर’ अशीही अन्य नावे आहेत.
इंग्रजी नाव - गोखरूला इंग्रजीत ‘स्मॉल कॅलट्रोप्स’ असे म्हणतात.
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते. शेतात, ओसाड, पडीक जमिनीवर ही तण म्हणून सर्वत्र आढळते. गोखरू हे तण असले तरी, ती महत्त्वाची औषधी वनस्पती असून तिला वर्षभर फुले व फळे येतात.
खोड - पसरत वाढणारे, केसाळ, फांद्या अनेक बारीक केसाळ, लवयुक्त,
पाने - संयुक्त, समोरासमोर ५ ते ८ सें.मी. लांब, संमुख जोडीतील एक पान लांबीने दुसऱ्यापेक्षा आखूड, पर्णिकेच्या ४ ते ८ जोड्या ८ ते १२ मि.मी. लांब, पर्णिकांचे देठ अगदी लहान, पानाला उपपर्णाची जोडी. पर्णाक्षावर टोकाला पानांचा आकार लहान-लहान होतो. पर्णिकांच्या खालील बाजूला दाट लव व कळाकडील भाग विषम विभागी.
फुले - पिवळी, द्विलिंगी, नियमित १ ते १.५ सें.मी. व्यासाची, पानांच्या बगलेत, विरुद्ध बाजूला, एकांडी, पुष्पकोश ५ दलांनी बनलेला. पाकळ्या रुंद ५. पुंकेसर १०. बीजांड कोषाखाली चकती १० भागांनी बनलेली. बीजांडकोष पाच कप्पी, परागधारिणी आकाराने मोठी, ५ भागांनी बनलेली.
फळे - गोलाकार पंचकोनी, ५ कप्पी. प्रत्येक कप्पीवर काट्यांच्या दोन जोड्या, एक जोडी लांब, एक लहान, फळांवरील काटे तीक्ष्ण, फळांच्या प्रत्येक कप्प्यात अनेक बिया. गोखरूची फळे नेहमी पायांना, कपड्यांना, जनावरांच्या शरीराला, वाहनांच्या चाकांना चिकटतात.
गोखरूची पाने व कोवळी खोडे भाजीसाठी वापरतात. यामुळे मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. कारण एकदा मूतखडा झाला, की वारंवार होत राहतो. हे होऊ नये म्हणून गोखरूची भाजी उपयोगी पडते. प्रमेहासारख्या व्याधीतही गोखरूची भाजी उपयुक्त ठरते. हृदयरोगांना मज्जाव करते. छाती भरली असल्यास ती कमी करण्यासाठी गोखरूची कोरडी भाजी देतात. कंबरदुखी, अंगदुखी यासाठीसुद्धा गोखरूची भाजी उपयोगी आहे.
साहित्य - कोवळी भाजी, भिजवलेली मूगडाळ किंवा तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा, जिरे, मोहरी, हिंग, तिखट, मीठ इ.
कृती - भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यावी. कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करून त्यात डाळ व कांदा परतून घ्यावा. नंतर चिरलेली भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे. तिखट, मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभ...
चुका ही वनस्पती ओसाड जमिनीमध्ये वाढलेली दिसते. तसे...
आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्या...
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आ...