অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानभाजी - आघाडा

शास्त्रीय नाव - Achyranthes aspera ॲचरॅन्थस ॲस्पेरा
कुळ - Amaranthaceae ॲमरान्थेसी
इंग्रजी नाव - प्रिकली चॅफ फ्लॉवर
संस्कृत नाव - अपामार्ग

आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारत, बलुचिस्तान, श्रीलंका, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे आढळते. प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते.
खोड- साधारण मीटरभर उंच, ताठ वाढणारे.
फांद्या - चौकोनी, रेषांकित.
पाने - साधी, एकासमोर एक, ३.५ - ६.८ सें. मी. x २.५ - ४.५ सें. मी., व्यस्त अंडाकृती किंवा लंबगोलाकार, मृदू केसाळ, फिकट हिरव्या रंगाची, पानांना राखाडी रंगाची झाक, मागील बाजू पांढरट - राखाडी, देठ लहान, लवयुक्त.
फुले - लहान, द्विलिंगी, नियमित, हिरवट रंगाची, फुलांचे दांडे फांद्यांच्या टोकांवर येतात. फुलांचे दांडे ४० ते ५० सें. मी. लांब, टोकांजवळ साधारण खाली झुकलेले, पाकळ्या पाच, हिरवट - पांढऱ्या, पुंकेसर ५, बीजांडकोष एककप्पी.
फळे - लहान, आयताकृती, दंडगोलाकार, परिदल मंडलात झाकलेली, फळांवर लहान टोकदार काटे असल्याने अंगाला, कपड्यांना चिकटतात. आघाड्याला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात फुले-फळे येतात. आघाडा गणपतीला वाहण्याची प्रथा असल्याने ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे.

औषधी उपयोग

आघाडा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात.

  • आघाडा कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक, स्वेदजनन, कफघ्न, पित्तसारक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारांत उपयुक्त आहे.
  • आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे. आघाड्याचा क्षार, मज्जातंतू व हाडांना, तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे. आघाडा वनस्पती वाळवून नंतर जाळली जाते. त्यापासून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात. वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात. त्यापासून मिठासारखा क्षार जमतो. या क्षारामध्ये चुना, लोह, जवखार, मीठ, गंधक, सोरा खार इत्यादी घटक असतात.
  • जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
  • यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावह आहे. यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात.
  • पित्ताश्मरीत व अर्श रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे.
  • आघाडा मूत्रजनन आहे. त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते. यामुळे आघाडा मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो. आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते. मूत्रनलिकेचा दाह आघाड्यामुळे कमी होतो. यामुळे बस्तिशोथ, मूत्रपिंड शोथ, तसेच मूत्रेंद्रियांच्या रोगात आघाडा वापरतात.
  • अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.
  • श्वासनलिकाशोथ व कफरोगात आघाड्याचा क्षार हे दिव्य औषध आहे.
  • विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात.
  • आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत. उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात. विंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व मूळ उगाळून पिण्यास देतात.
  • रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.
  • दातदुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातांच्या ढोलीत भरतात.
  • चामखीळ काढण्यासाठी क्षार वापरतात.
  • कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकडून, वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात.
  • संधिशोथात आघाड्याची पाने ठेचून, गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर बांधतात.
  • अंगात काटे शिरल्यास आघाड्याचा अंगरस देतात व पाने वाटून जखमेवर लावतात.
  • मज्जातंतू व्यूहाच्या रोगात आघाड्याच्या अंगरसाने फायदा होतो.
  • आघाड्याच्या मुळाचा फांट आतड्याच्या रोगात उपयुक्त आहे. आघाड्याच्या बिया वांतिकारक आहेत, तसेच बीजचूर्ण शिरोवेरेचक आहे.
  • आघाड्याची राख बाह्य त्वचेवरील व्रणांसाठी उपयुक्त आहे.

आघाड्याची भाजी

आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून, लघवीस साफ होण्यासाठी उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी, गुदभागी वेदना, खाज इत्यादी कमी होण्यास मदत होते.
पाककृती १ -
साहित्य -आघाड्याची कोवळी पाने, कांदा, लसूण, मीठ, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे इत्यादी.
कृती - आघाड्याची कोवळी पाने निवडून घ्यावीत. पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. कढईत तेल घालून तेलात जिरे, चिरलेला कांदा, चिरलेली मिरची घालावी. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, चिरलेली भाजी, मीठ घालून नीट परतावे. झाकण ठेवून भाजी शिजवावी.

पाककृती


साहित्य - आघाड्याची कोवळी पाने, लसूण, कांदा, डाळीचे पीठ, तेल, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य इत्यादी
कृती - आघाड्याची पाने धुऊन, चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन त्यात फोडणी करून घ्यावी. लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. नंतर चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरत टाकावे. सतत भाजी हलवावी. एकसारखे हलवत राहिल्याने भाजी मोकळी होईल. भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यावी.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate