অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओळख रानभाज्यांची - भोकर

  • शास्त्रीय नाव - कॉर्डिया डायचोटोमा (Cordia dichotoma)
  • कुळ - बोऱ्याजिनेएसी (Boraginaceae)
  • स्थानिक नावे - बारगुंड, गुंदन
  • हिंदी नावे - लासोरा, लसोडा, लसोरा
  • गुजराती नावे - पिस्तन, रायगुंडो, गुंदा
  • संस्कृत नावे - श्‍लेष्मान्तक, भुकरबुंदर
  • इंग्रजी नावे - इंडियन चेरी, क्‍लामीचेरी, सोपबेरी, सॅबॅस्टन प्लम.
भोकर ही वनस्पती भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशांत आढळते. भारतात ही वनस्पती कोरड्या पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्‍चिम घाट, सातपुडा, कोकण सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात, तर काही ठिकाणी या वृक्षाची लागवडही करतात.

ओळख

  • भोकरी हा 10 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढणारा सदापर्णी वृक्ष आहे. त्याची साल धुरकट गडद रंगाची असून, ती खडबडीत व फाटलेली असते.
  • पाने - साधी, एका आड एक, क्वचित समोरासमोर, रूंद अंडाकृती 7.5 ते 10 सें.मी. लांब व 6.2 ते 10.4 सें.मी. रूंद, गुळगुळीत, वरील भागावर पांढरट ठिपके, पानांच्या कडा अगदी साधारण दंतूर. पानांचे देठ 2 ते 4 सें.मी. लांब, पानांच्या तळाकडील शिरा तीन ते पाच. या वृक्षाच्या फांद्या खाली झुकलेल्या असतात.
  • फुले - लहान, पांढरी किंवा पांढरट - हिरवी, नियमित, एकलिंगी, नर व मादी फुले एकाच झाडावर येतात. फुले पानांच्या बेचक्‍यातून लोंबणाऱ्या घोसात येतात. पुष्पमंजिरी 2.5 ते 5 सें.मी. लांब. फुलांचे देठ आखूड. पुष्पमुकुट पाच संयुक्त दलांनी बनलेला. पाकळ्या 5, एकमेकांस चिकटलेल्या. पुंकेसर 5, समान लांबीचे, तळाकडे पाकळ्यांना चिकटलेले, केसाळ. बिजांडकोश चार कप्पी, प्रत्येक कप्प्यात एक बीजांड. परागवाहिनी एक, टोकाकडे दोन विभागी. परागधारिणी दोन, टोपीच्या आकाराच्या.
  • फळे - गोलाकार, चकचकीत बोरांएवढी, पिकल्यावर पिवळसर किंवा गुलाबी पिवळसर रंगाची. 1 ते 4 बिया. फळे आतून बुळबुळीत चिकट रसांनी भरलेली. यामुळे भोकर या वनस्पतीला "इंडियन ब्लू बेरी' असे म्हणतात.

भोकरीचे औषधी गुणधर्म

  • फळे - फळेस्नेहन व संग्राहक आहेत. भोकरीचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकरीचे फळ उपयोगी आहे. फळे शोथशामक असल्याने खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लिहेच्या रोगात भोकरीची फळे वापरतात.
  • साल - भोकरीची साल संग्राहक व पौष्टिक आहे. भोकरीची साल स्तंभक असल्याने फुफ्फुसांच्या सर्व रोगात उपयुक्त आहे. साल फांटाच्या रूपात गुळण्या करण्यासाठी वापरतात. सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त आहे. साल सौम्य शक्तिवर्धक म्हणून उपयोगी आहे. सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगांवर वापरतात.

सालीचा काढा जीर्णज्वरात आणि पुष्टी येण्यास देतात. कफ ढिला होण्यास, लघवीची आग कमी होण्यास व अतिसारात फळांचा काढा देतात. यामुळे आतड्यास जोम येतो. भोकराच्या सालीची राख तेलात खलून व्रण लवकर भरून येण्यासाठी लावतात.

पिकलेले भोकर फळ, अडूळसा पाने व बेहडा फळे समप्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्यांच्या आंबीत उगाळून द्यावी. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत.

भोकराच्या भाजीचे औषधी गुणधर्म

भोकराच्या फळांची भाजी करतात व लोणचे बनवितात.

  • भोकराच्या कोवळ्या पानांचीही भाजी करतात. भोकराच्या फळांच्या भाजीचा उपयोग अतिसारात होतो. या भाजीमुळे आतड्याची ताकद वाढते व पुष्टी येते.
  • भोकराच्या फळांचे लोणचे खूप चविष्ट असून, हे राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध आहे. भोकराचे लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले आहे. रक्तपित्तात भोकरीच्या पानांची भाजी उपयोगी आहे.

पाककृती

भोकराच्या पानांची भाजी

  • साहित्य - भोकराची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ इत्यादी.
  • कृती - भोकराची कोवळी पाने निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत व पाने बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्यावे. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. नंतर हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.
भोकराच्या फळांची भाजी
  • साहित्य - भोकरीची हिरवी कच्ची फळे, तीळ, खसखस, ओले खोबरे, आले, लसूण, तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा इत्यादी.
  • कृती - भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत. बिया काढून टाकाव्यात व परत फळे चिरून घ्यावीत. तीळ, खसखस थोडे भाजावेत. ओले खोबरे किसून घ्यावे. नंतर तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले मिक्‍सरमध्ये बारीक करून ओला मसाला तयार करावा. तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा व त्यात चिरलेली फळे घालावीत. हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी व नंतर ओला मसाला घालून परतावी. नंतर भाजी शिजवून घ्यावी.
भोकराच्या फळांचे लोणचे
  • साहित्य - भोकराची हिरवी कच्ची फळे, तेल, मिरेपूड, मोहरी डाळ, मिरची पावडर, मीठ, हिंग, हळद, मेथी पावडर, लोणच्याचा मसाला इत्यादी.
  • कृती - भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत व त्यातील बिया काढून टाकाव्यात व परत फळांच्या (गरजेप्रमाणे) फोडी कराव्यात. काही ठिकाणी फळे न चिरता अखंड फळे लोणच्यासाठी वापरतात. नंतर फोडींना मीठ लावून चोळावे. तेल गरम करून त्यात मोहरी डाळ, मिरची पावडर, मिरेपूड, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद टाकून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यानंतर मीठ लावलेल्या फोडींवर ओतावे व सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. आवश्‍यकता असल्यास लोणच्याचा मसाला घालावा. नंतर हे सर्व बरणीत भरावे व झाकण बंद करून काही दिवस ठेवावे व नंतर लोणच्याचा वापर करावा.


डॉ. मधुकर बाचूळकर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate