शास्त्रीय नाव - Basella alba (बेसिला ॲल्बा)
कुळ - Basellaceae (बॅसिलेसी)
मायाळू हा बहुवर्षायू वेल असून, या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळू वनस्पती आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. मायाळू या वनस्पतीला ‘वेलबोंडी’ असेही काही ठिकाणी म्हणतात. इंग्रजीत मायाळूला ‘इंडियन स्पिनॅच’ व ‘मलबार नाईट शेड’ अशी नावे आहेत. मायाळूचे तांबडा व पांढरा असे दोन प्रकार आहेत.
१) साहित्य - मायाळूची पाने, चणाडाळ, मीठ, हिरवी मिरची किंवा तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.
कृती - मायाळूची पाने स्वच्छ धुवून नंतर चिरून घ्यावीत. त्यात चणाडाळ घालून एक वाफ आणावी. मिरची चिरून किंवा तिखट घालावे. चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून शिजवावी. प्रथम मीठ व नंतर गूळ घालून भाजी परतावी.
२) साहित्य - मायाळूची पाने, एक वाटी शिजवलेली तूरडाळ, एक वाटी चिरलेला कांदा, एक वाटी ओले खोबरे, धने, मीठ, हळद, चार सुक्या मिरच्या, गूळ, चिंच, तेल इ.
कृती - मायाळूची पाने धुवून चिरून घ्यावीत. मायाळूची चिरलेली पाने, अर्धी वाटी कांदा व पाणी घालून शिजवून घ्यावी. नंतर शिजवलेली तूरडाळ घालावी. धने, मिरची व खोबरे वाटून घ्यावे. वाटण, हळद, मीठ, गूळ व थोडी चिंच असे मिश्रण उकळून घ्यावे व शिजवलेल्या भाजीत घालावे. वरून कांदा घातलेली फोडणी द्यावी.
३) साहित्य - मायाळूची देठासहित पाने, एक जुडी आंबट चुका, ३ ते ४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, गूळ, शेंगदाणे, हरबरा डाळ, काजू, मीठ, तेल, तिखट, मोहरी, हळद, कडीपत्ता इ.
कृती - मायाळूची पाने बारीक चिरून घ्यावीत. आंबट चुका निवडून चिरावा. शेंगदाणे, हरभरा डाळ एक तास पाण्यात भिजवावी. कुकरमध्ये मायाळू व चुका एकत्र शिजवावा. शेंगदाणे व हरभरा डाळही त्याच कुकरमध्ये दुसऱ्या भांड्यात शिजवावी. पालेभाज्या कोमट झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटाव्यात. कढईत तेलाची फोडणी करून (मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हळद) त्यात काजू परतून घ्यावेत. नंतर पालेभाज्यांचे वाटण त्यात ओतावे. मीठ व गूळ घालावा. भाजी ढवळू घ्यावी. शिजवलेले शेंगदाणे व हरभरा डाळ घालावी व पुन्हा ढवळावे. चांगली उकळी आल्यावर झाकण ठेवून आच बंद करावी. अशाप्रकारे मायाळूची पातळ भाजी तयार करता येते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ ...
बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकड...
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभ...
कानफुटी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्...