অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानभाजी - मोरशेंड

* शास्त्रीय नाव - बायडन्स बायटरनेटा (Bidens biternata)
* कुळ - ऍस्टरेसी (Asteraceae)

ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते.

  • - महाराष्ट्रात ही वनस्पती कोकण, पश्‍चिम घाट, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या पाचही ठिकाणी शेतात, जंगल परिसरात, रस्त्यांच्या कडेने, ओसाड पडीक जमिनीवर, गावांत, गावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते.
    • मोरशेंड ही सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पती आहे.

ओळख


मोरशेंड ही वनस्पती 2 ते 3 फूट उंच वाढते.

  • खोड - चौकोनी, रेखाकृती, सरळ उंच वाढणारे, साधारण लवयुक्त.
  • फांद्या - समोरासमोर, सरळ वाढणाऱ्या, लोमश.
  • पाने - संयुक्त, समोरासमोर, पर्णिका बहुतेक वेळा 3; पण काही वेळा 7. पर्णिकेच्या खालील दोन जोड्या विषम विभागी, कडा कातरलेल्या, टोकाकडील पर्णिका आकाराने मोठी, जास्त लांब व तीन विभागी, त्रिकोणी आकाराची, कडा कातरलेल्या. पर्णिकेचे देठ लहान.
  • फुले - फांद्यांच्या टोकांना, तसेच पानांच्या बेचक्‍यांतून तयार होणाऱ्या लहान फांद्यांच्या टोकांवर पुष्पगुच्छ तयार होतात. प्रत्येक पुष्पगुच्छात दोन प्रकारची फुले तयार होतात. पुष्पगुच्छ 1.3 सें.मी. व्यासाचा, लंबगोलाकार. पुष्पगुच्छाबाहेर हिरव्या दलांचे गोलाकार आवरण. बाहेरची फुले मादी, तीन अनियमित पांढऱ्या पाकळ्यांनी बनलेली. आतील फुले द्विलिंगी व नियमित. पुष्पमुकुट दोन दलांचा. पाकळ्या 5, एकमेकांस चिकटलेल्या, पुष्पनळी लंबगोलाकार शंकूच्या आकाराची. पुंकेसर 5, एकमेकांस चिकटलेले, यामुळे गोलाकार नळी तयार होते. बीजांडकोष लंबगोलाकार, एक कप्पी, 1.5 सें.मी. लांब. परागवाहिनी लांब, पुंकेसर नळीतून बाहेर येते. परागधारिणी द्विविभागी.
  • फळे - लंबगोलाकार, 3 ते 4 सें.मी. लांब. फळांवर दोन ते चार लांब काटेरी केस. काटेरी केसांमुळे फळे जनावरांच्या अंगास चिकटतात. कपड्यांना चिकटतात व त्यांचा दूरवर प्रसार होण्यास मदत होते. फळांमध्ये एकच लांबट बी असते.
  • मोरशेंड या वनस्पतीस ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत फुले व फळे येतात.

मोरशेंड भाजीचे औषधी गुणधर्म

मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.

  • संधिवाताच्या विकारात या भाजीचा उपयोग होतो.
  • या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.
  • रक्तातील उष्णता कमी होऊन रक्तदृष्टीजन्य विकार या भाजीमुळे कमी होण्यास मदत होते.
  • तरुणांतील गुप्तरोग व स्त्रियांमधील श्‍वेतप्रदर या विकारात मोरशेंड भाजीचा चांगला उपयोग होतो.

मोरशेंड भाजीच्या पाककृती

पानांची भाजी
साहित्य - मोरशेंडची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, तेल, जिरे, मोहरी, लसूण, मीठ इ.
कृती - मोरशेंडची कोवळी पाने खुडून, स्वच्छ धुऊन व बारीक चिरून घ्यावीत. कढईत तेल, जिरे, मोहरी व लसूण घालून फोडणी द्यावी. फोडणीत चिरलेली भाजी घालून परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये भिजवलेली मूगडाळ व चवीपुरते मीठ घालून परत भाजी परतावी. मंद आचेवर कढईवर झाकण ठेवून भाजी नीट शिजवून घ्यावी.

मोरशेंड पानांची बाटी

साहित्य - बारीक चिरलेली मोरशेंडाची पाने, धने-जिरेपूड, आले-लसूण पेस्ट, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट, मीठ, हळद, चिरलेली कोथिंबीर, हरभरा डाळीचे पीठ, तेल, मोहरी, हिंग इ.
कृती - पाने, धने-जिरेपूड, आले-लसूण पेस्ट, ठेचलेल्या मिरच्या, कोथिंबीर, तिखट, मीठ व हळद हे सर्व घटक एकत्र करावेत. त्यात हरभरा डाळीचे पीठ घालून मळावे. घट्ट गोळा तयार झाला, की त्याचे लहान लिंबाएवढे गोळे करून ते मध्यभागी बोटाने खोलगट करावेत. यांनाच बाट्या म्हणतात.
या बाट्या कुकरमध्ये ठेवून वाफवाव्यात. कोमट झाल्यावर त्या तेलात तळाव्यात. नंतर त्या एका बाऊलमध्ये ठेवून वरून मोहरी, हळद व हिंगाची खमंग फोडणी समप्रमाणात पसरावी. या नाश्‍त्यासाठी चांगल्या लागतात. बाट्या आमटीतही घालतात. भात व चपातीबरोबर हा पदार्थ खाता येतो.
- डॉ. मधुकर बाचूळकर

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate