रबर लागवडीचे मार्गदर्शन
रबराची वाढ उष्ण व दमट हवामानात चांगली होते. या पिकास 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवते. चांगला निचरा होणारी, आम्लधर्मीय, साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक आहे. या सर्व बाबींची अनुकूलता कोकणात आहे. लागवडीसाठी जी.टी. 1, पी.आर. 107 आणि आर.आर.आय.एम. 600 या जातींची निवड करावी. साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. उताराच्या जमिनीत 5 5 मीटर अंतरावर लागवड करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हे अंतर 5 4.5 मीटरही ठेवता येते.
खते
लागवडीसाठी 75 75 75 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. दोन आठवडे खड्डे उघडे ठेवावेत. खड्ड्याच्या वरील 25 सें.मी. भागात 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, पाच किलो निमकेक व 10 ते 15 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून खड्डे भरावेत. लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. खड्ड्याच्या मधोमध पहार किंवा खणतीने कलमाच्या मुळाच्या लांबीएवढे छिद्र पाडावे. कलम लावताना मुळांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाच्या बाजूची माती ओढून घट्ट बसवावी. कलमाचे ऊन, पाऊस, जनावरे इत्यादींपासून रक्षण करावे. एक जोमदार कोंब ठेवून इतर कोंब, तसेच खोडावर आलेले फुटवे काढून टाकावेत. बेणणी करून शेत स्वच्छ ठेवावे. झाडाच्या बुंध्याजवळ गवत, पालापाचोळा इत्यादींचे आच्छादन करावे.
कोकणच्या हवामानात पहिली तीन ते चार वर्षे या पिकास पाणी देण्याची गरज आहे. पहिली दोन वर्षे नवीन आलेल्या कोंबाचे व खोडाचे सूर्याच्या प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी सावली करावी. झाडापासून चीक काढण्याच्या क्रियेला "टॅपिंग' असे म्हणतात. जमिनीपासून 125 सें.मी. अंतरावर जेव्हा खोडाची गोलाई 55 सें.मी. होते, त्या वेळी ही झाडे टॅपिंग करण्यास योग्य असल्याचे समजावे.
02358 - 280233, 280238
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण
कृषी विद्यापीठ, दापोली
माहिती संदर्भ : अॅग्रोवन