অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उसात बटाटा अंतरपीक लागवड फायदेशीर

उसात बटाटा अंतरपीक लागवड फायदेशीर

पूर्वहंगाम  उसात बटाटा अंतरपीकावर प्रादेशिक उस संशोधन केंद्र , पाडेगाव , राष्ट्रीय कृषी  संशोधन प्रकल्प , औरंगाबाद व कृषी विद्या संशोधन करण्यात आले आहे . या ठिकाणी झालेल्या संशोधनावरुन असे दिसून येते की, पूर्वहंगामी उसात बटाटा आंतरपीक हे तंत्र शेतक-यांना खूपच फायदेशीर आहे. पूर्वहंगामी उसाची लागवड साधारणतः १५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान करावी आणि या काळातच उसाबरोबर बटाट्याचे आंतरपीक घ्यावे. पूर्वहंगामी लागवडीसाठी उसाचे फुले -२६५ (को.एम.- 0२६५) को.व्ही.एस.आय-९८o५, को.सी.-६७१, को.८६o३२ इ. वाणांची निवड करावी.

पूर्वहंगामी ऊस लावण्यासाठी सरी-वरंबे तयार करण्यापूर्वी ९० सें.मी. अंतराने मोगड्याच्या मागे सरते लावून बटाट्याला लागणारे रासायनिक खत (६o:६o:६० किलो प्रती हेक्टर नत्र, स्फुरद, पालाश) पेरून द्यावे. मोगड्याने पडणा-या सरळरेषांच्या निशाणीवर १५ सें.मी. अंतरावर अंकुर फुटलेले २५ ते ३० ग्रॅम वजनाचे बटाटे ठेवीत जावे. यासाठी साधारणत: हेक्टरी २० ते २५ किंवटल बियाणे लागेल. बटाट्याच्या दोन ओळीतून रिजर चालवावा म्हणजे ऊस लावण्यासाठी स-या पडतात व बटाटे वरंब्यात आपोआप झाकले जातात. अशाप्रकारे उसाच्या सरी-वरंबे बनविण्याच्या कामातच बटाट्याची लागवड होते. बटाटा वरंब्यात खूप खोलवर जरी झाकला जात असला तरी उगवण व उत्पादनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, असे संशोधनावरून आढळून आले आहे. बटाटा हा वरंब्यात वाढतो व ऊस हा सरीत वाढतो.

बटाटे वरंब्यात वाढत असल्यामुळे खांदणी करून बटाट्यास माती लावण्याची गरज भासत नाही. उलट मोठ्या वरंब्यावरुन बटाटे हिरवे होण्याचे प्रमाण फारच कमी होते. तसेच बटाटा चांगला पोसतो. उसाचे पीक १४ ते १५ आठवड्यांचे झाले म्हणजे या वेळेपर्यंत बटाट्याचे पीक वरंबा फोडावा म्हणजे बटाटे आपोआपच जमिनीबाहेर पडतात, ते वेचून पुन्हा रिजर चालवावा. त्यावेळी राहिलेले बटाटे वर येतात. ते वेचून घ्यावेत.

बटाटा बेणे

बटाटा बेणे हे कोड व रोगमुक्त असावे. बेणे बटाटे पूर्ण वाढलेले व अंधा-या जागी वाढलेले लांब व बारीक कोंब लागणीनंतर वाळतात. शीतगृहात बेणे ठेवले असल्यास ते लागवडीपूर्वी ८ ते १० दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवावे. बेणे बटाटे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे ५ सें.मी. व्यासाचे संपूर्ण (न कापलेले) साधारणत: अंड्याच्या आकाराचे लागवडीसाठी वापरणे फायद्याचे असते. बटाट्याचे

बेणे मोठ्या आकाराचे असल्यास, बटाट्याच्या प्रत्येक फोडी २५ ते ३0 ग्रॅम वजनाच्या व त्यावर २ ते ३ डोळे राहतील अशा कराव्यात. बटाटे कापून फोडी करताना विळा व तेथील जागा जंतूविरहीत करणे फार महत्वाचे आहे. विळा/चाकू मॅन्कोझेबच्या ०.२ टक्के द्रावणात बुडवून वापरावा. कापलेल्या फोडी कमीतकमी १० ते १२ तास सावलीत सुकवून घ्याव्यात व नंतरच लागवडीस वापराव्यात, एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः १५ ते २o किंवटल बटाटा बियाणे लागते.

हवामान व हंगाम

बटाटा हे थंड हवामानातील पीक असून थंड हवामान बटाट्याच्या वाढीस अधिक पोषक असते. महाराष्ट्र राज्यात हे पीक रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते, असे संशोधनावरून दिसून आले आहे. पीक वाढीच्या काळात दिवसाचे सरासरी तापमान २१ अंश सें.ग्रे.पेक्षा कमी असावे लागते. बटाटा पोसण्यास सुमारे २० अंश सें.ग्रे. तापमान आदर्श असते. जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असावे लागतात. जमिनीचे तापमान सुध्दा १७ ते २० अंश सें.ग्रे. असल्यास बटाटे चांगले पोसतात. यापेक्षा जास्त तापमान असल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन, बटाट्याचे उत्पादन कमी मिळते. दिवसाचे तापमान ३२ अंश सें.ग्रे. पेक्षा अधिक असल्यास बटाटे कमी लागतात व पिकाची वाढ चांगली होत नाही. रब्बी हंगामात बटाटा लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते. १५ नोव्हेंबरनंतर बटाटा लागवड केल्यास बटाटा वाढीच्या काळात तापमान वाढते व त्याचा अनिष्ट परिणाम बटाटा उत्पादनावर होतो.

लागवड पद्धत

बटाटा लागवडीसाठी फक्त प्रमाणित अथवा सत्यप्रत व निरोगी बटाटा लागवडीसाठी वापरू नये, कारण जवळजवळ तीन महिने बटाटा सुप्त अवस्थेत असतो. शीतगृहातून बटाटे बाहेर काढल्यानंतर ७ ते २० दिवस सावलीत विरळ पसरून ठेवावेत. या कालावधीत बटाट्यांना मोड आलेले असावेत अथवा डोळे फुगलेले असावेत. मोड न फुटलेले किंवा अधिक सुकलेले बटाटे लागवडीस वापरू नयेत. बटाटा लागवडीसाठी ६० सें.मी. (२ फूट) अंतरावर सरी-वरंबा पाडून त्यात १५ ते २० सें.मी. अंतरावर बटाटा लागवड करावी. रब्बी हंगामातील लागवडीसाठी जमीन ओलावून घेणे आवश्यक आहे. बटाट्याची लागवड जमीन वापशावर आल्यावर करावी, म्हणजे बटाट्याची उगवण चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते. प्रथम दोन फूट अंतरावर सलग स-या पाडाव्यात त्यात बटाट्याची लागवड १५ ते २० सें.मी अंतरावर करावी आणि लगेच सरी फोडून घ्यावी म्हणजे वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होते आणि बटाट्याच्या खापांवर वरंबा तयार होतो. लागवड वापशावर केली असल्याने उगवण झाल्यावर पाणी द्यावे.

रासायनिक खते

बटाट्याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खतांचा वापर करणे अतिशय महत्वाचे आहे. या पिकास १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, १२० किलो पालाश प्रती हेक्टरी खताची मात्रा द्यावी. यापैकी नत्राची १०० किलो मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी द्यावा व उरलेली नत्राची ५0 कि. मात्रा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर प्रती हेक्टरी द्यावी किंवा सुफला १५:१५:१५ व्दारे वरील खताची मात्रा द्यावयाची झाल्यास लागवडीच्या वेळी प्रती हेक्टरी सुफला (१५:१५:१५) च्या ८ बॅगा तसेच युरिया व म्युरेट ऑफ पोटॅशच्या दोन बॅगा द्याव्यात. लागवडीनंतर एक महिन्याने युरियाच्या दोन बॅगा द्याव्यात. खते दिल्यानंतर पिकास लगेच पाणी द्यावे. रासायनिक खते बटाट्यावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी अन्यथ: बटाटे सडतात. त्यासाठी रासायनिक खते जमिनीत पेरुन दिल्यास पिकास फायदेशीर ठरतात व त्याचा अधिक उत्पादन मिळण्यासाठी फायदा होतो. तसेच एक महिन्याने द्यावयाचा युरिया सरीत टाकावा.

आंतरमशागत

बटाट्याच्या आंतरमशागतीत खुरपणी, खांदणी किंवा वरंब्यास माती लावणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वरंब्यास भरपूर माती लावावी म्हणजे बटाटे हिरवे होत नाहीत, कारण सूर्यप्रकाशात बटाटा आल्यास ताबडतोब हिरवा होतो. बटाटा लागवडीपासून एक महिन्याच्या आत तण नियंत्रणासाठी एक ते दोन खुरपण्या देऊन शेत स्वच्छ ठेवावे किंवा तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करावा.

तण उगवण्यापूर्वी

बटाटा लागवडीनंतर, तण उगवण्यापूर्वी जमिनीवर खालीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी उदा. अॅलाक्लोर ५० टक्के क्रियाशील घटक १.५ लीटर प्रती हेक्टरी म्हणजेच दहा लीटर पाण्यात ६0 मि.ली. हातपंपाच्या साहाय्याने जमिनीवर सारखा फवारा द्यावा. तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी जमीन वापशावर असावी. तणनाशक फवारल्यानंतर लगेच पाणी देऊ नये किंवा ऑक्सीफ्युओरफेन २३.५ टक्के क्रियाशील घटक ०.८५ लीटर प्रती हेक्टरी तण उगवण्यापूर्वी व जमीन वापशावर असताना फवारणी करावी. म्हणजेच बटाटा लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी या तणनाशकाची फवारणी करावी. १o लीटर पाण्यात ऑक्सीफ्युओरफेन १० मि.ली. टाकून जमिनीवर सारखी फवारणी करावी.

तण उगवल्यानंतर

बटाटा लागवडीनंतर साधारणत: ८ ते १o दिवसांनी पॅराक्वॉट २४ टक्के क्रियाशील घटक O.४ किलो प्रती हेक्टरी फवारावे किंवा १0 लीटर पाण्यात ३० मि.ली. टाकून फवारा नळीच्या तोंडावर हूड बसवून, पिकाच्या दोन ओळीतील तणावर या तणनाशकाची फवारणी करावी म्हणजे उगवलेल्या तणांचा नाश होतो. अर्थात तणनाशकाचा एक फवारा आणि एक खुरपणी ३० दिवसांच्या आत केल्यास बटाटा पिकातील तणांचे चांगले नियंत्रण होते.

वरंब्याला माती लावणे

लागवडीनंतर साधारणतः २५ ते ३o दिवसांनी जमीन वापशावर असताना, बटाटा पिकाच्या वरंब्यास भर देणे हे अतिशय महत्वाचे काम आहे कारण यावेळी जमिनीखाली लहान लहान आकाराचे बटाटे लागलेले असतात, ते मातीने चांगले झाकल्यास व जमिनीत खेळती हवा राहिल्यास झाडांची वाढ जलद व चांगल्या प्रकारे होते. तसेच बटाटे उघडे राहत नाहीत. त्यामुळे जमिनीतील बटाट्यांना सूर्यप्रकाश न लागल्यामुळे बटाटे हिरवे होण्याचेही प्रमाण कमी होऊन, बटाटा चांगला पोसतो. वरंबा भरभक्कम होण्यासाठी व भरपूर माती लागण्यासाठी बटाट्याच्या दोन ओळीतून रेिजर चालवावा.

पाणी व्यवस्थापन

बटाटा पिकाचे अधिक व अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापनेचा सिंहाचा वाटा आहे. बटाटा या पिकास एकूण ५०० ते ७00 मि.मी. पाण्याची आवश्यकता असते. कमी कालावधीच्या (८o दिवस) जातींना कमी तर जास्त कालावधीच्या (१२० दिवस) जातींना जास्त पाणी लागते. या पिकाला उपलब्धतेच्या ६० टक्के ओलावा जमिनीत असेल त्यावेळी पाणी द्यावे. पीक वाढीच्या संवादेनक्षम अवस्थांना पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक असते. अन्यथ: पीक उत्पादनात लक्षणीय घट येते. बटाटा या पिकाच्या ओलिताखाली तीन संवेदनक्षम अवस्था पुढीलप्रमाणे आहेत.

रोपावस्था

ही अवस्था लागवडीनंतर २५ ते ३0 दिवसांनी येते. यावेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही तसेच बटाट्याच्या मुळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

स्टेलोनायझेशन

या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरुवात होते. ही अवस्था लागवडीनंतर ४५ ते ६o दिवसांनी येते. या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादन खूपच कमी येते.

बटाटे मोठे होण्याची अवस्था

ही अवस्था लागवडीनंतर ७o ते ७५ दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेस पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात परिणामी उत्पादन घटते. बटाटा पिकास थोडेथोडे आणि कमी अंतराने पाणी देणे फायद्याचे ठरते. पहिले पाणी हलके आणि लागवडीनंतर ४ ते ७ दिवसांनी द्यावे. जास्त पाणी दिल्यास बेणे कुजते आणि त्याचा उगवणीवर वाईट परिणाम होतो. नंतरचे पाणी वरंब्याचा २/३ भाग फक्त बुडेल इतकेच द्यावे. बटाटे पोसू लागल्यानंतर भरपूर पाणी द्यावे. बटाट्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात. मध्यम जमिनीत ७ दिवसाच्या अंतराने एकूण १२ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. प्रत्येक वेळी ५ सें.मी. पाणी द्यावे. ओलितासाठी सरी-वरंबा किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. बटाट्याची मुळे जास्तीतजास्त ६० सें.मी. पर्यंत खोल जातात व जवळजवळ ७० टक्के पाणी वरच्या ३० सें.मी. थरातून शोषून घेतात व उर्वरित ३० टक्के पाणी खालच्या थरातून शोषतात.

तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब

अवर्षणप्रवण क्षेत्रातील मध्यम खोल जमिनीत बटाट्याच्या अधिक उत्पादनाकरिता व अधिक नफा मिळवण्याकरिता रब्बी बटाट्याची लागवड तुषार सिंचनाखाली करावी. याकरिता तुषार सिंचनाद्वारे २५ मि.मी. बाष्पीभवन झाल्यावर (५ ते ८ दिवसांनी) ३५ मि.मी. पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. या पद्धतीमुळे आपण पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे पिकाची वाढ जोमदार तर होतेच तसेच बटाटेदेखील चांगले पोसतात व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत नेहमीच वापसा स्थिती राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात व उत्पादनात वाढ होते.

पाणीपुरवठा

उसास सरी-वरंबा पद्धतीने पाणी पुरवठा करण्यासाठी आडवे दंड पाडून सन्यात उसासाठी लागणारा रासायनिक खताचा पहिला डोस द्यावा. (३४:८५:८५ किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रती हे.) उसाचे टिपरे पारायुक्त औषधी द्रावणात बुडवून वरंब्यावर एकाला एक लावून ठेवावे. सन्यांना पाणी देण्यास सुरुवात करावी. चांगले पाणी दिल्याबरोबर सन्यामध्ये उसाचे दोन डोळ्यांचे टिपरे,डोळे बाजूला राहतील, अशा बेताने लावून उसाची लागवड करावी. नंतरचे आंबवणीचे पाणी चौथ्या दिवशी द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देत रहावे. सुरुवातीच्या काळात उसाच्या उगवणीस फारच थोडे पाणी लागते. भिजवलेल्या वरंब्यातील पाण्याचा उपयोग बटाटा पीक करते. एरवी बाष्पीभवनाने साधारणत: १० ते १५ दिवसात पूर्ण होते. त्यानंतर हळूहळू सन्यात उसाची उगवण होत राहते. उसाची पूर्ण उगवण ४ आठवड्यांत पूर्ण होते. या कालावधीत वरंबे बटाट्याच्या पिकाने चांगले झाकले जातात. त्यामुळे उसातील तण आपोआपच कमी होण्यास मदत होते.

आंतरमशागत व बटाटा काढणी

साधारणत: एक महिन्याने ऊस + बटाटा आतरपिकातील तण काढावे. नंतर येणा-या वरंब्यातील तणांना बटाट्याचे पीक झाकून टाकते व तणांची वाढ होऊ देत नाही. आंतरपीक पद्धतीत तणनाशकांचा वापर करणे सुध्दा खूपच फायद्याचे असते. त्याकरिता मेट्रोब्युझिन प्रती हेक्टरी o.७५ ते १.० किलो क्रियाशील घटक ऊस व बटाटा उगवणीपूर्वी फवारावे. बटाटे भरभक्कम वरंब्यात वाढत असल्यामुळे खांदणी करून बटाट्यास पोसतात तसेच सूर्यप्रकाशामुळे बटाटे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होते.

लागवडीपासून तीन महिन्याच्या कालावधीत बटाटा काढणीस तयार बैल किंवा लहान ट्रॅक्टरचा रिजर चालवावा. म्हणजे बटाटा पिकाची काढणी होते व ऊस पिकास मातीची भर दिली जाते. रिजर चालवताना बटाटे जमिनीतून बाहेर पडतात ते निघालेले बटाटे वेचून घ्यावेत. उसासाठी चांगली सरी होण्यासाठी रिजर पुन्हा त्याच सरीतून चालवावा म्हणजे उसास भरपूर माती लागेल व पुन्हा जमिनीत काही राहिलेले बटाटेही निघून येतील. उसाची बांधणी करून घ्यावी व लगेच पाणी द्यावे. बटाटा पिकाचे सरासरी उत्पादन १२५ ते १५o किंवटल व उसाचे उत्पादन ११o ते १२५ मे. टन प्रती हेक्टरी मिळते. म्हणजेच उसाचे उत्पादन कमी न होता तसेच उसावर बटाटा या आंतरपिकाचा काहीही परिणाम न होता बटाट्याचे व उसाचेही भरपूर उत्पादन येऊ शकते. अशाप्रकारे पूर्वहंगामी उसात बटाटा आंतरपीक घेणे ऊस बागायतदारांसाठी खूपच फायदेशीर ठरेल.

ट्रॅक्टरद्वारे उसात बटाटा आंतरपीक लागवड

  1. ऊस लागवडीसाठी शेतीची चांगली पूर्वमशागत करून घ्यावी. शक्य असल्यास खरिपात हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धंचा घ्यावा व हिरवळीचे पीक फुलो-यात येत असताना जमिनीत ट्रॅक्टरच्या नांगरांनी गाडावा किंवा शिफारशीप्रमाणे प्रती हेक्टरी १o टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीवर पसरून वखरणी करून घ्यावी.
  2. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापर्यंत लावल्या जाणा-या उसातच बटाट्याची लागवड करावी. उशिरा लागवड केल्यास बटाटा उत्पादनात घट येते.
  3. उसाच्या लागवडीसाठी सन्या, वरंबे करण्याआधी वरंब्यात भरपूर मातीत बटाटे येतील असे ट्रॅक्टर रिजरने वरंबे करावे.
  4. बटाट्याला द्यावयाचे रासायनिक खत ६० किलो नत्र, ६o किलो स्फुरद, १२० किलो पालाश प्रती हेक्टरी पाभरीने किंवा ट्रॅक्टर मोगड्याने बटाटा लागवडीपूर्वी पेरून द्यावा. (साधारणत: आठ बॅग १५:१५:१५ सुफला + दोन बँग म्युरेट ऑफ पोटॅश) तसेच एक महिन्याने राहिलेल्या नत्राची ६० कि./हे. (साधारणत: तीन बॅग युरिया) मात्रा बटाटा पिकास द्यावी व लगेच पाणी द्यावे.
  5. रासायनिक खत देताना सरळरेषेत जमिनीची उलथापालथ होऊन जमिनीवर ३ फूट अंतराच्या (९० सें.मी.) रेषा पडल्यासारख्या दिसतात. या रेषावर २५ ते ३० ग्रॅम आकाराचे कोंब फुटलेले बटाटे बियाणे साधारणत: एक वीत अंतरावर (१५ ते २० सें.मी.) ठेवत जावेत. बटाटा ओळीवर थिमेट १० किलो प्रती हेक्टरी लागवडीपूर्वी द्यावे. बटाटे मोठे असल्यास प्रत्येक फोडीवर २ ते ३ डोळे राहतील अशा बेताने तुकडे करून लावणी करावी. बटाटे लागवड करण्यापूर्वी बाविस्टीन (२५ ग्रॅम १o लि. पाणी) या बुरशीनाशक द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून मग बटाटे लावावेत. प्रती हेक्टरी १५ ते २o किंवटल बटाटा बियाणे लागते.
  6. बटाट्यांच्या दोन ओळींच्या मध्यभागी ६0 ते ७o सें.मी. चा ट्रॅक्टर रिजर व्यवस्थित चालवावा. उसासाठी स-या होताना बटाटे आपोआप वरंब्यात झाकले जातात.
  7. पाणी देण्यासाठी रानबांधणी करावी. रानबांधणी करताना निघालेले बटाटे वेचून घ्यावेत.
  8. उसाला द्यावयाचा रासायनिक खताचा हसा सरीत टाकावा. दोन डोळ्याचे उसाचे तुकडे केलेले बेणे वरंब्यावर नीट ठेवून उसाच्या सरीला पाणी सुरू करावे. रानबांधणी व्यवस्थित करून सरीत उसाची लागवड करावी.
  9. आंबवणीचे पाणी म्हणजे ऊस लावल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वरंबा दोन तृतीयांश भिजेल या बेताने पाणी द्यावे. लागवड केलेल्या वरंब्यातील बटाट्यास पाणी (ओल) पोहचेल अशा बेताने पाणी वाफ्यात पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. वरंब्यातील ओल पाहून पाणी द्यावे.
  10. ऊस + बटाटा आंतरपिकातील तणनियंत्रणासाठी लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी जमिनीवर तणनाशकांची फवारणी करावी उदा. मेट्रोब्युझिन २५ ग्रॅम १o ली. पाण्यातून फवारावे किंवा ऑक्सफ्ल्युओरफेन १० मि.ली. १० ली. पाण्यात टाकून ऊस + बटाटा लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी जमीन वापशावर असताना फवारावे.
  11. जमिनीच्या मगदुरानुसार (हलकी किंवा भारी) ८ ते १० दिवसाच्या अंतराने नंतर व्यवस्थित पाणी देत राहावे.
  12. कोंब फुटलेले बटाटे लावले असल्यास १० ते १५ दिवसांत उगवण होते व लावणीनंतर ३० ते ३५ दिवसांत बटाटा पिकाने वरंबे संपूर्ण झाकून जातात. वरंब्यातील बटाटा पिकास ३० ते ३५ दिवसांनी लहान बटाटे लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे आंतरमशागत उदा. निंदणी आटोपून घ्यावी.
  13. बटाट्याचे पीक ९o ते १oo दिवसात तयार होते.
  14. लागवडीपासून १२ ते १६ आठवड्याच्या दरम्यान उसाला बांधणी करावी लागते. त्यासाठी वरंबे बैलाच्या तीन दाती मोगड्याने फोडून माती ढिली करावी व निघालेले बटाटे वेचून घ्यावेत. नंतर बैल किंवा पॉवर टिलर रिजरने उसाला माती चढवतात, तेव्हा पुन्हा जमिनीतील बटाटा काढणी होते, ते वेचून घ्यावेत.
  15. उसाच्या बांधणीचे वरील काम करताना बटाटे आपोआप जमिनीबाहेर पडतात ते वेचून घ्यावेत.
  16. उत्पादित झालेले लहान, मध्यम व मोठे बटाटे वेचून प्रतवारीनुसार पोती भरुन विक्रीस पाठवावे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना : 'शेतकरी प्रथम प्रकल्प'

सन २०१५-१६ पासून महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या दहाही जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेचा 'शेतकरी प्रथम' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्राच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत दहा जिल्ह्यात विविध पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन येत्या रब्बी हंगामात केले जाणार आहेत. सदर प्रकल्पामध्ये येत्या हंगामात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात उसामध्ये वेगवेगळ्या आंतरपिकाची प्रात्यक्षिके शेतक-यांच्या शेतावर सुमारे ५०० एकर क्षेत्रावर घेण्यात येणार आहेत. सदर प्रात्यक्षिकांत ऊस + बटाटा या आंतरपीक पद्धतीचा समावेश आहे. ही प्रात्यक्षिके सामूहिक पद्धतीने घेण्यात येणार असून त्याचा लाभ अनेक शेतक-यांना होणार आहे. अशाप्रकारे उसाच्या उत्पादनावर बटाटा पिकाचा कोणताही विपरीत परिणाम न होता हेक्टरी साधारणत: १२५ ते १५o किंवटल बटाटे मिळत असले तरी एकट्या दुकट्या शेतक-याला चांगल्या प्रतीचा बटाटा बियाणे देण्याची व्यवस्था करणे व शेतातून निघालेल्या बटाटा मालाची फायदेशीर विक्रीची व्यवस्था करणे नीट जमू शकत नाही. त्यासाठी बटाटा उत्पादक संघ स्थापून किंवा साखर कारखानदारांनी यात सहभाग घेतल्यास या पिकाच्या बियाण्याची तसेच विक्रीची व्यवस्था प्रभावी करून अधिक उत्पादन व नफा मिळण्यास चालना मिळेल. तसेच उत्पादित बटाट्यावर प्रक्रिया करणारे उद्योग चालू करून सुशिक्षित बेरोजगारांनाही नवीन उद्योग चालू करण्यास मोठा वाव आहे. आता बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी कुफरी चिपसोना-१ व कुफरी चिपसोना-२ या जाती विकसित करण्यात आल्यामुळे उत्कृष्ट प्रतीचे चिप्प्स व फ्रेंच फ्राईज तयार होतात. शेतक-यांना उसात बटाटा आंतरपीक घेतल्यास उसाची शेती खूपच फायदेशीर होईल अशी आशा वाटते.

संपर्क क्र. O२४२६-२४३८६१/ ९४२२२३२७४४

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मुगाच्या बियाण्याचे वाटप

राज्यात मुग व उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र अनुक्रमे ४.३३ लाख हेक्टर व ३.६३ लाख हेक्टर आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी १o वर्षांच्या आतील वाणांचे अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण तसेच पीक प्रात्यक्षिके या बाबी प्रामुख्याने राबविल्या जातात. मुग व उडीद पिकांचे १० वर्षांच्या आतील वाणांच्या उपलब्धतेसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उप महासंचालक (बियाणे) यांच्या सूचनेनुसार मुगाचे आय. पी. एम. ०२–०३ या वाणाच्या बियाण्याचे २५oo० मिनीकेिटस यावर्षी देण्यात आले. या वाणाची जवळपास २० टक्के अधिक उत्पादकता दिसून आली असून याची चव गावरान मुगासारखी असल्याने यास शेतक-यांची पसंती मिळत आहे.

 

स्रोत -  कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate