उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्टरी आठ क्विंटल मिळते.
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी. त्यासाठी काडीकचरा वेचून उभी-आडवी वखरणी करावी, पठाल फिरवून सपाट करावी. जमीन तयार करताना चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी चार किलो बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांना आळा बसतो, तसेच बियाण्याची उगवण चांगली होते.
उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मॉन्सूनपूर्व पावसात सापडण्याची भीती असते. बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू/ गाळलेले शेणखत/राख/ माती मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी.
माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळेस प्रति हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता 12.5 किलो पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. कमतरता असल्यास पेरणीच्या वेळेस तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार झिंक व सल्फरच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्याव्यात.
पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे.
आवश्यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे.
स्त्रोत : aAqua
अंतिम सुधारित : 6/9/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...