1) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामू 7.5 ते 8 असलेली, मध्यम ते खोल, ओल धरून ठेवणारी जमीन करडई लागवडीस चांगली असते. शेवटच्या वखरणीपूर्वी प्रति हेक्टरी 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
2) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अवर्षण प्रवण भागात जिरायती क्षेत्रात ऑक्टोबरच्या पहिला आठवड्यापर्यंत लागवड पूर्ण करावी.
3) भारी जमिनीत दोन झाडांतील अंतर 30 सें. मी. व दोन ओळीतील अंतर 45 सें. मी. ठेवावे. मध्यम जमिनीत दोन ओळींतील अंतर 45 सें. मी. व दोन झाडांतील अंतर 20 सें. मी. ठेवावे. बियाणे पाच सें. मी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
4) करडईमध्ये थोडी दाट लागवड करून नंतर विरळणी करणे फायद्याचे ठरते. पेरणीनंतर जास्तीत जास्त 12 ते 15 दिवसांनी विरळणी करावी. विरळणी करताना मध्यम जमिनीत दोन रोपांतील अंतर 20 सें. मी. आणि भारी जमिनीत 30 सें. मी. अंतर ठेवावे.
5) आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा निंदणी व डवरणी करून पीक तणमुक्त ठेवावे. जमिनीतील ओलावा निघून जाणार नाही, याकरिता जमिनीवरचा थर भुसभुशीत ठेवावा.
6) ओलिताची सोय असल्यास 30, 50 आणि 65 व्या दिवशी एकूण तीन ओलिताच्या पाळ्या द्याव्या. जिरायती परिस्थितीत संरक्षक ओलीत उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 50 दिवसांनी एक ओलीत जमीन भेगाळण्याआधी द्यावे. ओलिताचे पाणी शेतात जास्त काळ साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. संरक्षित ओलिताकरिता दोन ओळीआड डवऱ्याने दांड काढून दांडाने पाणी द्यावे.
भारी जमिनीसाठी हेक्टरी 10 किलो तर मध्यम जमिनीसाठी हेक्टरी 12 किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया -
1) पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम थायरम प्रती किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. बियाण्यावर गुळाचे द्रावण शिंपडून नंतर थायरमची प्रक्रिया करावी.
2) बियाणे सावलीत वाळविल्यानंतर मर रोगाच्या नियंत्रणाकरिता चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास 20 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर आणि 20 ग्रॅम स्फूरद विरघळविणाऱ्या जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
अ. क्र. सुधारित जात फुलांवर येण्याचा दिवस परिपक्व होण्याचा दिवस 100 दाण्याचे वजन (ग्रॅम) तेलाचे प्रमाण (टक्के) हेक्टरी उत्पादन (क्विं.)
1) एकेएस 207 70-75 125-130 6.5 28 ते 30 14-20
2) भीमा 75-80 130-135 6.0 28 ते 30 12-20
3) पीकेव्ही पीक 75-80 130-135 3.5 32 ते 33 15-21
आंतरपीक ------------------ पिकाच्या ओळींचे प्रमाण
1) हरभरा + करडई ----------- 3ः1 किंवा 2ः1
2) गहू + करडई -------------- 3ः1 किंवा 2ः1
3) जवस + करडई ------------ 3ः1 किंवा 4ः2
1) जिरायती पिकास लागवडीसोबत प्रति हेक्टरी 25 किलो नत्र व 25 किलो स्फुरद (125 किलो अमोनियम सल्फेट अधिक 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे.
2) बागायती पिकास हेक्टरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद लागवडीच्या वेळी द्यावा. त्यानंतर 30 दिवसांनी 20 किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर द्यावा.
3) गंधक दाण्यातील तेलाचे प्रमाण वाढविण्यास आणि कॅल्शियम दाणे भरण्यास मदत करतो. त्यामुळे करडीसाठी गंधक व कॅल्शियमयुक्त खतांचा वापर फायदेशीर ठरतो.
संपर्क - डॉ. वैद्य, 9850314086
(लेखक तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...