मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी. 26 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.आज शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर भुसभुशीत होते. अशा जमिनीत पेरणी जर ट्रॅक्टरने केली तर बियाणे अधिक खोलीवर पडते. अशा वेळी सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ व बीजांकुर व मुलांकुर बाह्य आवरणालगत असल्यामुळे सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, म्हणून खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते. त्यामुळे पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सें.मी.पेक्षा अधिक खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पेरणी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी.
मराठवाडा - एमएयूएस 70, एमएयूएस 81, एमएयूएस 158, एमएयूएस 47. विदर्भ - एमएयूएस 71, एमएयूएस 81, जेएस 93-05 आणि जेएस 335 पश्चिम महाराष्ट्र - डीएस 228 (फुले कल्याणी), एमएसीएस 58, एमएसीएस 450, जेएस 93-05 आणि जेएस- 335. पेरणीचे अंतर - आपल्या भागासाठी शिफारस केलेल्या वाणांची 45 - 5 किंवा 30 - 7.5 सें.मी. अंतरावर (प्रति हेक्टरी झाडांची संख्या 4.4 ते 4.5 लाख) उथळ जमिनीत (2.5 ते 30 सें.मी.) पेरणी करावी.
-पेरणीवेळी घरचे बियाणे असेल तर थायरम (4.5 ग्रॅम प्रति किलो) किंवा कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू.पी.ची (तीन ग्रॅम प्रति किलो) बीजप्रक्रिया करावी. -पेरणी करण्यापूर्वी रायझोबियम जिवाणू खत + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची (प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 15 किलो) बीजप्रक्रिया करावी. -सोयाबीनच्या प्रमुख किडी उदा. खोडमाशी व चक्रीभुंगे यांच्या व्यवस्थापनासाठी 10 कि.ग्रॅ. फोरेट (10 टक्के दाणेदार) प्रति हेक्टर जमिनीत पेरणीच्या वेळेस द्यावे.
जमिनीचे माती परीक्षण करावे. हेक्टरी 20 गाड्या (पाच टन) सेंद्रिय खत द्यावे. सोयाबीनसाठी 30 किलो नत्र व 60 किलो स्फुरद व 20 किलो गंधक प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेसच द्यावे. ज्या जमिनीत पालाशचे प्रमाण कमी होते तेथे 30 किलो पालाश द्यावे. ज्या जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेटचा नियमित वापर केला गेला तेथे गंधकाच्या उपलब्धतेमुळे सोयाबीनची चांगली उत्पादकता दिसून आली. डायअमोनियम फॉस्फेटच्या नियमित वापरामुळे झालेली गंधकाची कमतरता तसेच सेंद्रिय खत किंवा जिप्समचा वापर न करणे हे सोयाबीनची उत्पादकता न वाढण्याचे वा घटण्याचे प्रमुख व महत्त्वाचे कारण आहे. नत्रयुक्त खते वा संप्रेरकांचा अनावश्यक वापर टाळावा.
कमी उत्पादकतेला या पिकावर येणा-या कीड व रोग हेही एक प्रमुख कारण आहे. देशात घेण्यात आलेल्या प्रयोगांच्या निष्कर्षांनुसार किडीमुळे सर्वाधिक ५२ टक्के उत्पादनात घट होऊ शकते. रोगाचे नियंत्रण केले असता १२.५ टक्के तर किडींचे नियंत्रण केले असता ३२ टक्के उत्पादनात वाढ होते, असे आढळून आले आहे.
किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पध्दती विकसीत करण्यात आली आहे. या पध्दतीचा अवलंब केल्याने कीड व रोगनियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनाच्या अयोग्य वापरामुळे होणारी निसर्गाची हानीही टाळता येते. प्रस्तुत लेखात दिलेल्या पध्दतीचा अवलंब करून शेतकरी बंधुंनी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.
१) शेताची नांगरट - उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडींच्या सुप्त अळ्या व कोषांचा नाश होतो तसेच बुरशीजन्य रोगांच्या बुरशीचा नाश होतो.
२) फेरपालटीची पिके - खरीप हंगामात सोयाबीन पिकानंतर रब्बी अगर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे पीक घेऊ नये. कारण तसे केले असता किडी व रोगांच्या जीवनक्रमात खंड पडत नाही व पुढील पिकांवर त्यांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टीने सोयाबीन-ऊस, सोयाबिन-गहू असा पिकांचा
क्रम योग्य ठरतो.
३) आंतरपिके घेणे - सोयाबीन पिकांत मक्याचे आंतरपीक घेतले असता पांढरी माशी, इतर किडी व रोगांचे प्रमाण कमी होते असे आढळून आले आहे. ऊस व कपाशीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक फायदेशीर असल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.
४) एकाच वेळी पेरणी करणे - सोयाबीनची एका शेतामध्ये तसेच आजूबाजूच्या शेतक-यांनी एकाच वेळी पेरणी करावी. म्हणजे किडी व रोगांचे नियंत्रण करणे शक्य होते. उशिरा पेरलेल्या पिकांवर किडी व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्टातील सांगली व कोल्हापूर भागात उशिरा पेरलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
५) रोग-कीडग्रस्त झाडे व किडी नष्ट करणे - शेतामध्ये वेळोवेळी लक्ष देऊन रोग व कीडग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत तसेच किडींच्या अंडी, अळी या अवस्था अल्प प्रमाणात आढळून आल्यास त्या गोळा करून त्यांचा रॉकेल अगर कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नाटनाट करावा. विशेषतः लष्करी अळी या किडीच्या अंड्यांचे पुंजके, बिहार सुरवंट या किडींच्या अळ्या यांचे या पध्दतीने नियंत्रण परिणामकारक ठरते.
सोयाबीन पिकाला ते द्विदलवर्गीय असल्याने नत्र खताची अल्प म्हणजे २० किलो प्रतिहेक्टर एवढीच आवश्यकता असते. अत्यंत सुपिक जमीन असल्यास व भरपूर शेणखत वापरले असल्यास रासायनिक नत्र खत अत्यल्प लागतो. नत्र खताची मात्रा जास्त झाल्यास पीक माजते व पाने खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा करणे - किडीच्या अळ्या, पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक हे पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य असते. शेतात ठराविक अंतरावर अंदाजे हेक्टरी १०० ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी १०-१५ फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परिणामकारकरीत्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.
प्रकाश सापळा वापरणे - रात्रीच्या वेळी शेतात २०० वॅटचा दिवा लावून त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारे कीटक मरतात.
मेलेल्या कीटकांमध्ये हानीकारक कीटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादुर्भावाचे भाकित करता येते व वेळीच उपाययोजना करता येते.
कामगंध सापळा वापरणे - सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकित करण्यासाठी देखील होतो.
रोगमुक्त बियाणांचा वापर - पेरणीसाठी रोगमुक्त शेतात अगर उत्तमरीतीने रोग नियंत्रण केलेल्या शेतात तयार झालेले बियाणे वापरावे.
कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर - कीड व रोगप्रतिकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वांत परिणामकारक उपाय आहे. परंतु जास्त उत्पादन देणा-या जाती आहेत, याची खात्री करून मगच पेराव्यात.
परोपजीवी कीटक- यामध्ये परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी टड्ढायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातक लस, पाने खाणा-या अळ्यांवर बॅसिलस थुरीजिएन्सीस व बॅव्हेरीआ बॅसिआना या जिवाणूंची कीटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे.
पीकव्यवस्थापन पध्दतींचा सुयोग्य वापर - यामध्ये पिकासाठी लागणा-या अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा, जमिनीचा योग्य सामू (पी.एच. ६ ते ७) हेक्टरी झाडांची संख्या (४ ते ५ लाख प्रति हेक्टर) योग्य वेळी पाण्याची पाळी देणे, झाडांमधील योग्य अंतर, पेरणीची योग्य वेळ या सर्व बाबी किडी व रोगांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास सहायक ठरतात.
रासायनिक कीटकनाशकांचा समतोल वापर - किडी व रोगांना अनुकूल हवामान मिळाल्यास त्यांचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रसायनांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पध्दतीने वापर करणे शहाणपणाचे ठरते. हानीकारक कीटकांची संख्या व त्यांच्यामुळे होणारी हानी यांचे प्रमाण ठराविक पातळीपेक्षा जास्त झाल्यास नियंत्रणाचे उपाय योजावे लागतात. निरनिराळ्या किडींसाठी संशोधन करून या पातळ्या निश्चित केल्या आहेत.
वरील सर्व बाबींचा विचार करून काटेकोरपणे रोग व किडींच्या नियंत्रणासाठी नियोजन करणे यालाच त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन असे म्हणतात.
१) खोडमाशी - ही सोयाबीन पिकावरील महत्त्वाची कीड असून जवळजवळ सर्व भारतात या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशीची मादी सोयाबीनच्या पानावरील शिरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शिरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरुवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.
२) तंबाखूवरील पाने खाणारी अळी - अनुकूल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरुवातीला समूहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात.
३) बिहार सुरवंट - ही कीड भारतात सर्वत्र आढळते.
सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुंजक्याने राहतात व पानांचे हरितद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात व पूर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो व नंतर तो राखाडी होतो.
४) पाने पोखरणारी अळी - कमी पाऊस व कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानाच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात व वाढ पूर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानावर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडेतिकडे द्रोणाकार होते व नंतर सुकून गळून पडते.
५) पाने गुंडाळणारी अळी - सतत पाऊस व ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते व हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.
६) मावा - ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानाच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते.
७) शेंगा पोखरणारी अळी - ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरभरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षांत सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे. किडीच्या अळ्या सुरुवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेंगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.
८) हिरवे तुडतुडे - या किडीची पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.
९) हिरवा ढेकूण - ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
१०) याखेरीज महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो.
११) पांढरी माशी - ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते.
१) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १० टक्के दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी १० किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. थोयोमेथोक्झाम या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रियादेखील परिणामकारक आढळून आली आहे.
२) पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लिटर किंवा क्लोरोपायरीफॉस २० इ.सी. १.५ लिटर किंवा इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. १ लिटर किंवा टड्ढायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली किंवा एन्डोसल्फान ३५ इ.सी. १.५ लिटर किंवा इथिऑन ५० इ.सी. १.५ लिटर किंवा मेथोमिल ४० एस.पी. १ किलो या कीटकनाशकांची आलटूनपालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांच्या भुकटीचादेखील हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा.
संदर्भ : १. पुरोगामी विचारांचे एकमत,
२. अग्रीप्लाझा
सोयाबीन पिकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम सुधारित : 7/2/2020
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...
ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबत...
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...