मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन शक्यतो टाळावी. मुगाच्या वैभव व बीपीएमआर- 145 या दोन जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. या जाती भुरी रोगाला प्रतिकारक आहेत. कोपरगाव-1 या जातीवर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे या जातीची लागवड टाळावी.
उडदाच्या टीपीयू-4 व टीएयू-1 या दोन जाती चांगले उत्पादन देतात. दोन्ही टपोऱ्या काळ्या दाण्यांच्या जाती असून, पक्वतेचा कालावधी 70 ते 75 दिवसांचा आहे. पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच, म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. मूग, उडीद या पिकांच्या बियाण्यांसाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळांवरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
मूग आणि उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (65 ते 70 दिवस) असल्यामुळे सलग अथवा आंतरपीक म्हणून घेतली जातात. या पिकांच्या बी पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांमधील अंतर दहा सें.मी. या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीने करणे चांगले. या पिकांमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळींनंतर एक ओळ तुरीची पेरणी करावी. या दोन्ही पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. रासायनिक खते ही शक्यतो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाण्यालगत पेरून द्यावी, म्हणजे त्याचा प्रभाव चांगला होतो. ही पिके सर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला असेल, तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे.
संपर्क
02426 - 233447
कडधान्य सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...