অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऍपमधून वाढवा करिअरचा मॅप

फक्‍त नोकरी एके नोकरी, असा विचार न करता व्यापक विचार केला तर "ऍप‘मधून मोठं करिअर साकारणं शक्‍य आहे. गुगल प्ले स्टोअरवर एक नजर फिरवली, तर बघाल की तेथे हजारोंच्या संख्येत असे प्रोग्राम आधीच उपलब्ध आहेत. यश हे एका रात्रीत मिळत नसते. यश म्हणजे काय, तर आपल्या प्रोग्रामला भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे, त्याचा जास्तीतजास्त उपयोग होणे. कारण जाहिरातीतून मिळणारी मिळकत, ही सर्वस्वी प्रोग्रामच्या जास्तीतजास्त वापरावर अवलंबून असते.
मी 2006 मध्ये इंजिनिअर झालो. डिसेंबरमध्ये नोकरी मिळाली. पगार महिना सात हजार. मी लेख लिहिला 7 दिवसांत आणि मानधन मिळाले पाच हजार. पण एक महिना नोकरी करून मिळत होते फक्त सात हजार. ही गोष्ट मला काही स्वस्थ बसू देत नव्हती. मग ठरवलं, की ऑनलाइन काहीतरी करून मिळकत वाढवावी. अशातच ऍन्ड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग प्रणाली गुगलने विकसित केली. मोबाइल आणि ऍन्ड्रॉइड विषय तसा नवा होता. यशस्वी होण्याच्या शक्‍यतेची शाश्‍वतीही नव्हती, तरी प्रयत्न सुरू केले. म्हटलं, चलो! देखा जाएगा! कारण अपयश आले, तर कमावलं काही नसलं, तरी गमावणारही काही नव्हतो. ऍन्ड्रॉइडचा अभ्यास व प्रोग्राम बनवायला सुरवात केली.
वाचनाची आवड होती. त्यावेळी मोबाइलवर इंग्रजी साहित्य भरपूर प्रमाणात मोफत उपलब्ध होते; पण मराठी किंवा हिंदीतील साहित्य फारसे नव्हते. तेव्हा विचार केला, की मराठी साहित्य उपलब्ध केले तर! तेव्हा साने गुरुजींच्या "श्‍यामची आई‘ या पुस्तकाची निवड केली. कारण त्यावर कुणाचा स्वामित्व वा हक्क नव्हता. पुस्तकापासून ऍन्ड्रॉइड प्रोग्राम बनवायला 3 महिने लागले. प्रोग्राम प्रकाशित झाला. उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला; पण महिनाभरातील मिळकत फक्त बोटांवर मोजण्याइतकी होती. निराशाजनक परिस्थितीत होतो. काय करावे कळत नव्हते.
मग थोडा सखोल अभ्यास सुरू केला. सध्या मागणी काय आहे? कोणत्या गोष्टींना विशेष प्राधान्य वाचक देतात? विषयाची निवड कशी करायची? प्रोग्रामच्या सादरीकरणावर काम करणे गरजेचे आहे काय? जाहिरात कशी करावी वगैरे. मग श्रीमद्‌ भगवद्‌ गीता हिंदी हा प्रोग्राम प्रकाशित केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इथे अभ्यास कामाला आला. दोन महिन्यांत पाच हजारांचा धनादेश मिळाला आणि मग काय विचारता, मागे वळून कधी बघावंच लागलं नाही. आज माझी स्वतःची कंपनी Renuka Teachnologies सुरू असून सगळं एकदम मस्त सुरू आहे. म्हणतात ना...
सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते, तर काहींना रांजणभर. त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला.
तुम्हाला ऍपमध्ये काही सुरवात करायची असेल, तर निसंकोच मदतीकरिता विचारू शकता. ऍन्ड्रॉइड प्रोग्राम निर्मितीला सुरवात करण्याआधी काही काळजी घेणे आवश्‍यक आहे, ती अशी ः

आवडीचा विषय निवडा

कारण त्यावर काम करायला कंटाळलात, तर काही खरं नाही.
"सामान्यज्ञान‘ या विषयावर प्रोग्राम निर्मितीला लागलो. विषय तसा चांगला होता; पण मोठा असल्यामुळेच कंटाळा यायचा. मी सातत्य टिकवून ठेवू शकलो नाही. त्यामुळे हा प्रोग्राम नावारूपास येऊ शकला नाही आणि मी दिलेला वेळ अगदीच व्यर्थ गेला. शक्‍यतो आवडीचा विषय निवडा आणि विषयाचा अभ्यास आधीच करून ठेवा. जेणेकरून कार्यक्रमाकडे हेळसांड होणार नाही. वेळ वाया जाणार नाही.

नावीन्यपूर्ण विषय निवडा

स्थिरावलेल्या प्रोग्रामची कॉपी करण्यात अर्थ नाही. त्यामध्ये कमतरता असेल, तरच त्यावर सुरवात करा. सध्या हास्यविनोद आणि मोबाइल संदेश मित्रांना व्हॉटस्‌ ऍपच्या माध्यमातून पाठवण्याचे उपक्रम आपण रोज करतो. आला मेसेज, कर फॉरवर्ड आणि मोठ्या प्रमाणात हास्यविनोद आणि मोबाइल संदेशांचा संग्रह असलेले प्रोग्रामसुद्धा नवीन संदेश पाठवण्यास वापरले जातात. त्यामुळे सहजच विचार येतो, की एखादा प्रोग्राम बनवावा. त्याआधी गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही एक नजर फिरवली, तर बघाल की तेथे हजारोंच्या संख्येत असे प्रोग्राम आधीच उपलब्ध आहेत. उपलब्ध प्रोग्रामचा विचार केला, तर पहिले 25 वगळता अन्य प्रोग्रामना नगण्य प्रतिसाद आहे. एखादी नवीन व्यक्ती सोडा, तुम्हीसुद्धा असं एखादं ऍप डाऊनलोड करायच्या विचारात असल्यास पहिल्या पाचचीच निवड कराल. त्यामुळे अशा विषयात हात घालण्यात मुळीच अर्थ नाही. तुम्ही बनविणार असलेला प्रोग्राम सर्वस्वी सध्या अस्तित्वात असलेल्या ऍपपेक्षा सरस असेल, तरंच ऍपनिर्मितीचा विचार करा; अन्यथा नावीन्यपूर्ण विषय निवडा.

योग्य विषय निवडा

नावीन्यपूर्ण असला, तरी त्या विषयाला मागणीही असायला हवी. उदाहरण द्यायचे झाल्यास... Alices Adventure in Wonderlandहे इंग्रजी ई-बुक; मी विचार केला की इंग्रजी वाचणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मला अपेक्षित यश मिळेल. ज्या प्रमाणात मराठी आणि हिंदी प्रोग्रामला प्रतिसाद होता, त्यांच्या तुलनेत याला विशेष असा काही नव्हता. कारण, हा विषय आधीच भरपूरदा हाताळला गेला असल्यामुळे त्याला विशेष असं काही यश मिळालं नाही. तसेच, वाचकांना हिंदी अथवा मराठी विषयांची अपेक्षा होती.

स्वतःवर विश्वास ठेवा

तुम्ही स्वतःच्या ऍन्ड्राइड प्रोग्राम निर्मिती प्रकल्पावर विश्वास ठेवला नाही, तर कसे चालणार? आधीच सांगितल्याप्रमाणे मला सहा महिने अशी काही विशेष मिळकत नव्हती, तरीसुद्धा माझे मोबाइल बिल, पेट्रोल आणि रोजच्या चहापाण्याचा खर्च या मिळकतीतून पूर्ण होत होता. मी प्रोग्राम निर्मिती थांबविली नाही, नवीन विषयांवर प्रोग्राम निर्मिती करीत गेलो. म्हणतात ना, "थेंबे थेंबे तळे साचे.‘ जसजसे प्रोग्राम वाढत गेले, मिळकतसुद्धा वाढतच गेली.या सर्व गोष्टीत माझा वैयक्तिक विकाससुद्धा झाला. मी नोकरी करणाऱ्या व्यक्तीपासून एका कंपनीचा मालक झालो. हे सर्व शक्‍य झालं योग्य वेळीच योग्य सुरवात केल्यामुळेच आणि सातत्य कायम राखल्याने. खालील ओळी नेहमी लक्षात असू द्या...प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||तर मग काय विचार करताय? लागा कामाला...!!!

 

लेखक : चेतनकुमार अकर्ते, नागपूर akarte@gmail.com

स्त्रोत : सकाळ, २३ एप्रिल २०१५

अंतिम सुधारित : 8/6/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate