অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑक्सफर्ड विद्यापीठ

ऑक्सफर्ड विद्यापीठ

इंग्‍लंडमधील पहिले आणि जगप्रसिद्ध विद्यापीठ. लंडनच्या वायव्येस ८३ किमी. वर ऑक्सफर्ड शहरात चार्वेल नदीकाठी वसले आहे. त्याची स्थापना केव्हा झाली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. इतिहासकारांच्या मते इंग्‍लंड व फ्रान्स ह्यांत वितृष्ट आल्यानंतर इंग्रजी विद्यार्थ्यांना पॅरिस विद्यापीठात प्रवेशमनाई झाली. त्यामुळे इंग्‍लंडला स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता भासू लागली. साहजिकच ह्यातून इंग्‍लंडमध्ये शिक्षणाबाबत पहिला संघटित प्रयत्न ११३३ साली झाला आणि ‘स्टडियम’ स्थापन होऊन त्याचे ‘स्टडियम जनरल’ ह्या संस्थेत रूपांतर झाले.

त्याचे वर्णन तत्कालीन ऑक्सफर्डचे प्रतिनिधी ‘स्कूला सेकंडा इक्लेसिआ’ असे करीत. त्यातूनच पुढे तेराव्या शतकात ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली असावी. मध्ययुगात रॉजर बेकन, जॉन स्कोट्स व जॉन विक्लिफ ह्यांनी विद्यापीठाची महती वाढविण्याचा प्रयत्न केला. युनिव्हर्सिटी (१२४९), मर्टन (१२६४) व बॅलिअल (सु. १२६३) ही पहिली महाविद्यालये होत. पहिल्या एलिझाबेथने १५७१ साली या विद्यापीठाची पुनर्रचना करून मान्यता दिली.

विद्यापीठाने तत्कालीन इतर मध्ययुगीन विद्यापीठांप्रमाणे पहिली काही वर्षे शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगती केली नाही; मात्र यूरोपीय प्रबोधनकाळाबरोबर विद्यापीठीय शिक्षणक्रमात अनेक मौलिक फेरबदल झाले. एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत ज्ञानविज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे विद्यापीठाने अनेक शाखोपशाखा सुरू करून अद्ययावत शिक्षणपद्धतीचा अवलंब केला. विद्यापीठात प्रवेशपरीक्षा, पदवी आणि पदुव्यत्तर परीक्षा व संशोधनाची व्यवस्था असून मानव्यविद्या, वैद्यक, ललितकला, तंत्रविद्या, धर्मशास्त्र व इतर शास्त्रे ह्यांच्या विविध कक्षा आहेत.

इंग्रजी भाषासाहित्य तसेच मध्ययुगीन व अर्वाचीन भाषा ह्यांच्या अभ्यासावर विशेष भर दिला जातो. शिक्षण मुख्यत्वे व्याख्यानपद्धतीने दिले जात असले, तरी अलीकडे चर्चात्मक व दृक्श्राव्य पद्धतींचाही अवलंब करण्यात आला आहे. बहुतेक अभ्यासक्रम विद्यापीठच ठरविते व त्यास शासनाची मान्यता मिळविते. विद्यापीठात प्रवेश मिळाल्याबरोबर विद्यार्थ्यास मार्गदर्शनासाठी एक प्राध्यापक नेमून दिला जातो.

या मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार विद्यार्थी अभ्यासक्रम ठरवितो. कोणत्या व्याख्यानांना हजर राहावयाचे, काय वाचन करावयाचे यांविषयीच्या सूचना मार्गदर्शक देतो. शिवाय मार्गदर्शकाने ठरवून दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यास दर आठवड्यास निबंध लिहावा लागतो. त्यावर दोघांत सविस्तर चर्चा होते. विद्यार्जन पूर्ण होईपर्यंत एकच मार्गदर्शक असतो. तो विद्यार्थ्याचा मित्र, तत्त्वोपदेशक व सल्लागार असतो.

विद्यापीठात सध्या ३४ महाविद्यालये असून त्यांपैकी २४ केवळ पुरुषांकरिता, ५ स्त्रियांकरिता व उरलेली सहशिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. सेंट अँटनी व न्यूफील्ड ह्या जुन्या शैक्षणिक संस्थांचे रूपांतर अलीकडे महाविद्यालयांत करण्यात आले आहे. याशिवाय विशेष शिक्षण देणाऱ्या पुढील संस्था उल्लेखनीय आहेत : इन्स्टिट्यूट ऑफ कॉमनवेल्थ स्टडीज, क्वीन एलिझाबेथ हाऊस (कॉमनवेल्थ अँड अलाइड स्टडीज) व रस्किन स्कूल ऑफ ड्रॉईंग अँड फाइन आर्ट्‌स. सर्व महाविद्यालयांतून इंग्रजी माध्यम आहे. १९२० पर्यंत स्त्रियांना पदव्या दिल्या जात नसत. विद्यापीठात १९७२ साली १०,७७७ विद्यार्थी शिकत होते.

ऑक्सफर्डने पॅरिस विद्यापीठाचेच संविधान बव्हंशी स्वीकारलेले असून निगमीय रचनेत कुलपती, कुलगुरू, कुलशासक वगैरेंचा समावेश होतो. प्रत्यक्षात कुलगुरू हाच सर्व विद्यापीठीय प्रशासनाचा प्रमुख असतो. १८५४, १८५६, १८७७ व १९२३ या वर्षांतील संसदीय कायद्यांनुसार ऑक्सफर्डची प्रशासनव्यवस्था स्वतंत्र व स्वायत्त केली आहे. मात्र प्रशासकीय दृष्ट्या प्रत्येक महाविद्यालय स्वतंत्र असून परीक्षा व अभ्यासक्रम या बाबतींत ते विद्यापीठास जबाबदार असते. विद्यापीठास ब्रिटिश संसदेवर दोन सभासद निवडण्याचा अधिकार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील काही प्राचीन इमारती वास्तुशिल्प, भव्यता व त्यांतील जुने फर्निचर व इतर वस्तू यांकरिता प्रसिद्ध आहेत.त्यांतील ‘बॉडलिअन’ हे सर्वात जुने ग्रंथालय असून त्यात २२,००,०००० ग्रंथ व ५०,००० हस्तलिखिते आहेत. ‘डिव्हिनिटी स्कूल’, ‘कॉन्व्होकेशन हाऊस’, ‘शेल्डिनियन श्रोतृगृह’ , ‘क्लॅरेंडन अभ्यासिका’,‘अ‍ॅश्मोलीअन वस्तुसंग्रहालय’  इ. वास्तू भव्य आणि सुंदर आहेत. ह्याशिवाय पुरातत्त्वीय संग्रहालय व कलावीथी सर्व आधुनिक सोयींनी युक्त आहेत.

लेखक: सु. र. देशपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate