इंग्लंडमधील एक प्राचीन व प्रसिद्ध निवासी विद्यापीठ. लंडन शहराच्या वायव्येस सु. ८० किमी. वर केंब्रिज ह्या शहरात वसले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाइतकेच ते मान्यता पावलेले असून त्याची ख्याती विज्ञाने व गणित या विषयांकरिता आहे. अकराव्या शतकापासून केंब्रिज ज्ञानोपासनेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. विद्यापीठ निश्चितपणे केव्हा सुरू झाले, ह्याविषयी अभ्यासकांत मतैक्य नाही; तथापि १२०९ मध्ये ऑक्सफर्ड येथे नागरिक व विद्यार्थी ह्यांत वाद होऊन बरेचसे विद्यार्थी केंब्रिजकडे गेले. पुढे ऑक्सफर्ड पूर्ववत चालू झाले, तरीसुद्धा विद्यार्थी येथील स्टडियम जनरलमध्ये शिकत होते व १२२६ मध्ये तेथे एक कुलपती असावा असे दिसते. १२८४ साली ह्यू डी बेल्शॅम ह्या धर्मोपदेशकाने येथे पीटर हाउस हे पहिले महाविद्यालय सुरू केले. त्यास १३१८ मध्ये बाविसाव्या पोपने मान्यता दिली.
१४४१ मध्ये सहाव्या हेन्रीच्या वेळी किंग्ज व क्वीन्स (१४४८) ही दोन महाविद्यालये सुरू होऊन विद्यापीठास अधिक चालना मिळाली. पहिल्या एलिझाबेथच्या काळी विद्यापीठाची खूप भरभराट झाली आणि अनेक महाविद्यालये सुरू झाली. आर्थिक बाबतीत विद्यापीठास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर सरकारी अनुदान सुरू होऊन आर्थिक स्थिती सुधारली. सध्या विद्यापीठाची एकूण २९ महाविद्यालये असून त्यांपैकी १८ पुरुषांसाठी, ५ स्त्रियांकरिता व ६ दोहोंसाठी आहेत. याशिवाय सेंटर ऑफ आफ्रिकन स्टडीज, सेंटर ऑफ इंटरनॅशनल स्टडीज वगैरे सात संस्था त्यास संलग्न केल्या आहेत.
स्त्रियांना प्रत्यक्षात पदव्या देण्याची प्रथा १९४८ पासून येथे सुरू झाली. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व निवासी असून १९७१-७२ मध्ये विद्यापीठात १०,७१० विद्यार्थी शिकत होते. मानव्यविद्या, विज्ञाने, तंत्रविद्या, ललितकला, ईश्वरविद्या इ. विषयांत शाखोपशाखा आहेत. विद्यापीठात सर्व विषयांतील पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट या परीक्षांची व्यवस्था असून पदविका व प्रशस्तिपत्राच्याही परीक्षा आहेत. विद्यापीठातील अभ्यासक्रम अत्यंत व्यापक आणि आधुनिक स्वरूपाचे आहेत. तत्त्वज्ञान, प्राचीन व अर्वाचीन विज्ञाने, गणितशास्त्र यांवर विशेष भर आहे.
पण अलीकडे कृषिविज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक या शास्त्रांच्या विशेष अभ्यासालाही मान्यता दिली जात आहे. वैज्ञानिक प्रयोगशाळांत कॅव्हेंडिश प्रयोगशाळा विशेष प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात अनेक वस्तुसंग्रहालये आहेत. तसेच एक शरीरशास्त्रीय संस्था, वेधशाळा आणि ग्रंथालय आहे. ग्रंथालयात २५,००,००० ग्रंथ १२,००० दुर्मिळ हस्तलिखिते आणि २,५०,००० नकाशे आहेत. ह्याशिवाय येथील नव्याने स्थापन केलेले वस्तुसंग्रहालय व प्रयोगशाळा आधुनिक सुखसोयी व उपकरणांनी परिपूर्ण आहेत. वास्तुशास्त्रदृष्ट्या केंब्रिज विद्यापीठाच्या इमारती प्रेक्षणीय आहेत.
केंब्रिज विद्यापीठाने प्रशासकीय बाबतीत पॅरिस व ऑक्सफर्ड विद्यापीठांचेच संविधान बव्हंशी स्वीकारलेले आहे. विद्यापीठ हे प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त असले, तरी त्यास संविधी बदलण्याचा, रद्द करण्याचा किंवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी प्रिव्ही कौन्सिलची संमती घ्यावी लागते. अधिसभा विद्यापीठाचे सर्वसाधारण धोरण ठरविते व ती प्रशासन-यंत्रणेवर रीजंट हाउस ह्या संस्थेच्या वतीने नियंत्रण ठेवते. अधिसभा व रीजंट हाउस ह्यांचे अनुक्रमे अधिछात्र आणि कुलपती, कुलगुरू व महाविद्यालयांचे प्रमुख हे सभासद असतात. कुलपती हा पदसिद्ध अधिकारी असून कायमचा असतो, तर कुलगुरू हा प्रत्यक्ष कार्यकारी व विशिष्ट मुदतीसाठी निवडला जातो. विद्यापीठाच्या कक्षेतील प्रत्येक महाविद्यालय स्वतंत्र आहे, तथापि अनेक बाबतींत त्यावर विद्यापीठाचे नियंत्रण असते.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/6/2024
पामर्स्टन, लॉर्ड : (२० ऑक्टोबर १७८४ – १८ ऑक्टोबर १...
इंग्लंडमधील लंडन या महानगरातील पोलीस खात्याचे मुख्...
इंग्लंडच्या नैर्ऋत्येकडील डेव्हन परगण्याचे मुख्य...