पाचशे विद्यार्थ्यांनी, जहाजाने प्रवास करीत विविध देशांचा अभ्यास करावयाचा आणि सहा महिन्यांत विवक्षित अभ्यासक्रम पुरा करावयाचा, अशी कल्पना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील चॅपमन कॉलेजने प्रथम अमलात आणली. जगातील हेच पहिले फिरते विद्यापीठ. १९७७ ते १९८० ही तीन वर्षे या विद्यापीठाची व्यवस्था कोलोरॅडो स्टेट विद्यापीठाकडे होती. त्यानंतर ही व्यवस्था पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाकडे सोपविण्यात आली. सहा महिन्यांच्या कालावधीत आठवड्यातून सहा दिवस बोटीवर अध्ययन-अध्यापन चालू असते. काही दिवस विविध बंदरांना व त्या शेजारील भागांना भेटी देण्यात खर्च होतात.
हे जहाज यूरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांतील वीस प्रमुख बंदरांना भेट देते. कोणत्याही बंदराला भेट देण्यापूर्वी काही दिवस अगोदर त्या देशातील लोकजीवन, राजकारण, सामाजिक परिस्थिती, अर्थकारण इ. विषयांवर विद्यार्थांना माहिती दिली जाते. बंदरांच्या व देशांच्या प्रत्यक्ष भेटीत विद्यार्थी त्यांना मिळालेली माहिती आणि पाहिलेली वस्तुस्थिती यांची तुलना करून आपली माहिती तपासून घेतात. जरूर वाटल्यास संदर्भग्रंथ वाचून ती माहिती पडताळून पाहतात. सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमात वरचेवर चाचण्या होतात व अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके देण्यात येतात. प्रगत अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याच अभ्यासक्रमात भाग घेता येतो.
वरील अभ्यासक्रमात प्रामुख्याने भाषा आणि समाजशास्त्रांचा अंतर्भाव केलेला असतो. विविध देशांतील समाजव्यवस्था, सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा प्रकारचे तुलनात्मक आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम निवडले जातात. विद्यार्थ्यांबरोबर मूळच्या विद्यापीठातील प्राध्यापक असतातच. शिवाय विविध देशांतील प्राध्यापकांनाही निमंत्रित केले जाते. उदा., भारतातील प्राध्यापक विमानाने नैरोबीस जाऊन तेथून जहाजाबरोबर मुंबईस येतात व भारताविषयक अभ्यासक्रमात भाग घेतात. जहाजावर समृद्ध ग्रंथालय, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींची सोय असते.
प्रामुख्याने सामाजिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या वरील विद्यापीठाप्रमाणे अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील मियामी विद्यापीठ जहाजप्रवासात सागरी विषयांचा विशेष अभ्यासक्रम चालविते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून हा अभ्यासक्रम चालू आहे. या अभ्यासक्रमावर आधारित अशी पदवीही या विद्यापीठाद्वारे दिली जाते.
लेखक: श्री. ब. गोगटे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...