आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. या विद्यापीठाचे कार्य १९६३ च्या अधिनियमानुसार १२ जून १९६४ पासून सुरू झाले. अमेरिकेतील लँड ग्रँट महाविद्यालयाच्या नमुन्यावर हे विद्यापीठ उभारलेले असून राज्यातील ग्रामीण जनतेला कृषिशिक्षण देणे आणि कृषिविषयक संशोधन, क्षेत्रीय आणि विस्तारकार्यक्रम यांस उत्तेजन देणे, अशी त्यामागील उद्दिष्टे आहेत. विद्यापीठाच्या क्षेत्रात राजेंद्रनगर (हैदराबाद), बापत्ला व तिरुपती ही तीन केंद्रे आहेत. कृषी, पशुवैद्यक आणि गृहविज्ञान अशा तीन प्रमुख विद्याशाखा असून त्यांत अनेक उपशाखा आहेत. विद्यापीठाची सात घटक महाविद्यालये असून ४१ संशोधन केंद्रे आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण २,०९१ विद्यार्थ्यांची सोय होती (१९७२). परीक्षापद्धती पारंपरिक नसून ती अंतर्गत मूल्यमापनावर आधारलेली व त्रैमासिक सत्रांत विभागलेली आहे.
अध्यापन, संशोधन आणि विस्तारकार्यक्रम यांच्या एकात्मतेवर भर असून कृषिविषयक प्रत्यक्ष उत्पादनाशी ही अंगे निगडित केलेली आहेत. राज्यातील शासकीय कृषिसंशोधनविषयक व पशुपालनविषयक संस्था विद्यापीठाकडे सोपविण्यात आल्या आहेत. कृषी, पशुवैद्यक व गृहविज्ञान या विद्याशाखांचे अनुक्रमे ७, ७ व ६ असे विषयानुरूप विभाग केलेले आहेत. विद्यापीठाचा १९७१ – ७२ चा अर्थसंकल्प एकूण ३३६.९६ लक्ष रुपयांचा होता. या विद्यापीठामध्ये दोन वैशिष्ट्यपूर्ण योजना आहेत. कमवा आणि शिका या योजनेनुसार विद्यार्थ्यांना कुक्कुटपालन, वराहपालन वगैरे उद्योगांत सहभागी करून त्यांतून शिक्षणाचा सर्व खर्च भागविण्याचीही सोय केलेली आहे. दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व सुखसोयी यांच्याकडे लक्ष पुरविण्यासाठी पूर्णवेळ काम करणारा एक खास अधिकारीही नेमण्यात आलेला आहे.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/6/2024
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...