অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा , १९८९ च्या अंतर्गत १५ ऑगस्ट, १९९० रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना  झाली. १९९१-९२ च्या दरम्यान विद्यापीठाने आपल्या प्रत्यक्ष वाटचालीस प्रा. एन. के. ठाकरे, प्रथम कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची सुरुवात केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जळगाव, धुळे व नंदुरबार हे तीन जिल्हे . आपल्या स्वतःच्या जागेत विद्यापीठाने १९९५ रोजी स्थानांतरण केले. गिरणा नदीच्या किनार्‍यावर वसलेले हे विद्यापीठ ६५० एकरात टेकड्यांमध्ये वसलेले आहे. विद्यापीठातील प्रत्येक इमारत ही विद्यापीठाने स्वतः तयार केलेल्या डांबरी रस्त्याने जोडलेली आहे, तसेच आशियन महामार्ग क्र.४६ ने विद्यापीठ जळगाव शहराशी जोडल्या गेले आहे. विद्यापीठात येणा-जाण्याकरीता शहर बस सेवा व ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत.परिसराचे सौंदर्य सुंदर हिरवळी व वृक्षांची लागवड करुन जोपासलेले आहे.

दोन लाखांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात येवून त्याचे संवर्धन केले असून नैसर्गिक वातावरण व पर्यावरणाची जोपासना करण्यात आलेली आहे, याकरिता विद्यापीठास राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार २००० साली प्राप्त झाला आहे. तसेच वन व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली ह्यांचेकडून देखील सन २००२ साली इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरातील विद्युत पुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने विशेष उपकेंद्ग विद्यापीठात स्थापन केले आहे. विद्युत पुरवठ्या अभावी होणारी अडचण लक्षात घेता विद्यापीठाने १२५ कि.वो. क्षमतेचे डिझेल जनरेटर लावले आहेत.जळगाव शहरापासून विद्यापीठ अंदाजे १० कि.मी. अंतरावर आहे. प्रदूषण मुक्त पर्यावरणाच्या माध्यमाने नैसर्गिक टेकड्यांमध्ये विद्यार्थ्यांकरिता पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण केलेले आहे. सर्व शैक्षणिक विभाग, प्रशाळा ह्यामध्ये अत्याधुनिक साधनसामग्री व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाव्दारे विद्यार्थ्यांकरिता शिक्षणासाठी पदवी, पदव्युत्तर, एम. फिल., पीएच.डी. स्तरावर एकुण ०९ विद्याशाखांमधून शिक्षण दिले जाते. विद्याशाखा पुढीलप्रमाणे आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी व तांत्रिकी, शिक्षणशास्त्र, औषधी व आयुर्वेद, कला व ललित कला, वाणिज्य व व्यवस्थापन,  मानसनिती व समाजविज्ञान , विधी विद्याशाखा.सद्यस्थितीत विद्यापीठ परिसरात ६ प्रशाळा व ११ शैक्षणिक विभाग आहेत. विद्यापीठाशी संलग्नित २०० महाविद्यालये, ३७ संस्था व १७ मान्यताप्राप्त संशोधन केंद्रे आहेत. बी.ए., बी.एस्सी. व बी.कॉम. अभ्यासक्रमांमध्ये संगणक  या विषयाचा अंतर्भाव केला आहे. प्रत्येक विषयाचे अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार अद्ययावत  केले जातात.विद्यापीठाने परीक्षा यंत्रणा राबविण्याची उत्कृष्ट पध्दत अवलंबविलेली असून, वेळेवर निकाल जाहीर करण्यात  आमचे विद्यापीठ अग्रेसर आहे.विद्यापीठातील बहुतेक प्रशासकीय विभाग संगणकीकृत झाले असून अद्ययावत व्यवस्थापनाच्या व्दारे प्रशासन सुकर व सर्वमान्य झाले आहे.

पार्श्वभूमी

प्रा.डॉ.एस.एफ.पाटील ह्यांनी व्दितीय कुलगुरु म्हणुन १४ ऑगस्ट, १९९६ रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्य  काळात तौलनिक भाषा व वाङ्मय आणि माहिती तंत्रज्ञान विभाग हे दोन नवीन शैक्षणिक विभाग सुरु झाले. .प्रा.डॉ.आर.एस.माळी ह्यांनी तिसरे कुलगुरू म्हणुन १४ ऑगस्ट, २००१ रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या सक्षम आणि दुरदृष्टी नेतृत्वाखाली विद्यापीठाने जलद गतीने उत्कृष्ट विकास केला. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन जल संवर्धनाचे कॅम्प परिसरात घेतलेत. ज्यामुळे आज अनेक लहान जल बंधारे विद्यापीठात बघावयास मिळतात.

आमच्या शिक्षकांनी अनेक संशोधन प्रकल्प हातात घेऊन ते पुर्णत्वास नेले आहेत. आम्ही चार प्रकारचे तंत्रज्ञान, उद्योग विद्यापीठाच्या समन्वयाने तयार केले व त्या उद्योगांना हस्तांतरीत केलेत आणि आणखी काही तयार होण्याच्या बेतात आहेत. अतिशय कमी काळात आमच्या विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उंचावले आहे. आमच्या विद्यापीठाने प्रतिष्ठित अशी २(फ) व १२(ब) मान्यता यु.जी.सी. कडून प्राप्त केली आहे. नॅक, बंगलोर ह्या संस्थेकडून विद्यापीठास 'बी' (सी.जी.पी.ए.-२.८८) दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

भविष्यातील स्वयंपूर्तीच्या भावनेतून व आवश्यकता लक्षात घेऊन विद्यापीठाने परिसरात सागवान वृक्ष लागवड केली. सुमारे ९५००० सागवानाची झाडे लावण्यात आली असून ती जोमाने वाढत आहेत. आमच्या ह्या योजनेस शासनाचा वनश्री पुरस्कार २००२ साली जाहीर करण्यात आला. तत्कालीन कुलगुरूंनी त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांचेकडून तो स्वीकारला.

प्राचार्य डॉ.के.बी.पाटील ह्यांनी विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून पदभार दि. २२ ऑगस्ट, २००६ रोजी स्वीकारला. त्यांचे कार्यकाळात विद्यापीठ परिसरात समाजकार्य प्रशाळा व शिक्षणशास्त्र विभाग सुरु करण्यात आलेत.

ह्या प्रशाळांमध्ये खालील अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेत. एम.ए.(संगीत), एम.ए. (जनसंवाद व पत्रकारिता), एम.ए.(इतिहास), एम.एस.डब्ल्यू. विद्यापीठात आधीपासून असलेल्या प्रशाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम जसे एम.एस्सी.(ऑरगॅनिक केमेस्ट्री), एम.एस्सी.(इनऑरगॅनिक केमेस्ट्री), एकात्मीक अभ्यासक्रम बी.एस्सी.+एम.एस्सी. (अ‍ॅक्च्युरियल सायन्स) व एम.एड. संगणकीकरणाचे महत्वाकांक्षी प्रकल्प ह्या दरम्यान विद्यापीठाने राबविले. त्यात प्रामुख्याने एम.के.सी.एल. ची ई-सुविधा, सॅप-इआरपी जे वित्त व प्रशासकीय कामकाजात सुलभता निर्माण करते यांचा समावेश आहे.प्रा.डॉ. सुधीर. उ. मेश्राम ह्यांनी विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू म्हणून  कार्यभार दि. ८ सप्टेंबर, २०११ रोजी स्वीकारला.

ध्येय- "समाज घटकांच्या सशक्त, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरूक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे."

माहित संकलक : अतुल पगार

अंतिम सुधारित : 2/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate