महाराष्ट्रतील एक शैक्षणिक, सांस्कृतीक व औद्योगिक केंद्र आणि पुणे जिल्ह्याचे व विभागाचे मुख्य ठीकाण. ते १८ अंश ३०’ उ. अक्षांश व ७३ अंश ५३’पू. रेखांशावर, रेल्वेने मुंबईच्या आग्नेयीस १९२ किमी. व समुद्रसपाटीपासुन सरासरी ५६३ मी. उंचीवर वसले आहे. पुणे शहराची लोकसंख्या १९७१ मध्ये ८,५६,१०५ व देहु, दहूरोड,खडकी कँप, पुणे कँप, खडकवासला, लोहगाव, पिंपरी-चिंचवड मिळून बनणाऱ्या पुणे नागरी भागाची एकूण वस्ती ११,३५,०३४ इतकी होती.
पुणे मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. मुळा-मुठा सोडल्यास शहरात निरुपयोगी नागझरी, आंबील ओढा व माणिक नाला हे लहान जलप्रवाह आहेत. पुण्याचे सरासरी तापमान १७.२ अंश से. असून दैनिक किमान तापमान सरासरी ११.६६ अंश से., तर दैनिक कमाल तापमान सरासरी २२.७७ अंश से. असते. एप्रिल महिन्यात कमाल तापमानाची सरासरी ३८.३३ अंश से. इतकी आढळते. ३० एप्रिल १८९७ व ७ मे १८८९ रोजी निरपेक्ष कमाल तापमान ४३.३ अंश से. नोंदविले आहे. पावसाची वार्षिक सरासरी ६६.१३ सेंमी. आहे.
पुणे महाराष्ट्रातील अतिप्रचीन शहरांपैकी एक आहे. पुण्याजवळच मुठेच्या काठी निदान दीड-दोन लाख वर्षांपूर्वीची प्राचीनतम अश्मयुगीन हत्यारे सापडली. गेली किमान दोन हजार वर्षे हे गाव महत्व पावल्याचे दिसते. राष्ट्रकूट राजा कृष्णा याने दिलेल्या ९९३ च्या ताम्रशासनात हे गाव व त्याभोवतालचा प्रदेश यांचे निर्देश पुण्य, पुनक व पुणकविषय देश असे आले असून ते त्या वेळी साधारणपणे एका जिल्ह्याएवढ्या प्रदेशाचे मुख्य ठिकाण होते.
पाताळेश्वर गुहेतील लेख अस्पष्ट असला, तरी ती गुहा व पर्वतीच्या टेकडीतील गुहा या इसवी सनाच्या दहाव्या शतकातीन सहज असतील पाताळेश्वर गुहेतील नंदी-मंडप वैशिष्टपूर्णआहे . तो नंदी-मंडप म्हणू लागले आहेत. अल्लाउद्दीन खलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर लवकरच पुणे मुसलमानी अंमलाखाली गेले. त्या वेळी मुठा नदीच्या काठी असलेल्या नारायणेश्वर व पुण्येश्वर या देवळांचे थोरला व धाकटा शेख सल्ला या दोन दर्ग्यांत रुपांतर झाले. तददर्शक अवशेष अजूनही तेथे दिसून येतात. १४९० पर्यंत बहमनी, त्यानंतर १६३६ पर्यंत निजामशाही न नंतर आदिलशाही सत्तेखाली हे गाव गेले.
१६२४ च्या सुमारास शहाजी भोसले यास पुणे व सुपे यांच्या भेवतालच प्रदेश मोकासा म्हणून मिळाला. त्या वेळी ते गाव कसबे पुणे म्हणून ओळखले जाई. आताची कसबा पेठ म्हणजे जुने पुणे होय. १६३२ च्या सुमारास विजापूरचा सरदार रायाराव याने पुणे जाळून त्यावर गाढवाचा नांगर फिरविला होता; पण १६३६ मध्ये शहाची भोसल्यास भीमा आणि नीरा या नद्यांमधील प्रदेश जहागिरी मिळाल्यावर पुण्याची पुन्हा भरमसाट होऊ लागली. बालपणी शिवाजी महाराजांचे काही काळ येथील लाल महाल नावाच्या वास्तूत वास्तव्य होते. औरंगजेबाचा तळ दक्षिणेत पडला असता, त्याने पुण्याचे मुहियाबाद असे नाव ठेवले होते.
१७२६ मध्ये शाहू महाराजांनी पुणे पहिल्या बाजीराव पेशव्यास इनाम दिल्यानंतर या गावाची अधिकच भरभराट होऊ लागली. पहिला बाजीराव, बाळाजी बाजीराव, थोरला माधवराव, सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव यांनी हे गाव आपले राहण्याचे मुख्य ठिकाण बनविल्यामुळे त्यास मराठ्यांच्या राजधानीचे स्वरुप आले. या काळात इंग्रज रेसीडेंट पुण्यातच राहत असे. ब्रिटिश अंमलाच्या अगदी आरंभीच्या काळात पुण्याची वस्ती सु. ८० हजार होती.
पेशवाईत अनेक मराठी सरदार वारंवार पुण्यात येत राहिल्यामुळे त्या काळात पुण्याची लोकसंख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक असली पाहिजे. १८६४ पर्यंत पुणे हिच भारताचीच राजधानी करावी, असा इंग्रजांचा बेत होता. १८५६ मध्ये प्रथम मुंबई-पुणे लोहमार्ग चालू झाला; पण तेव्हा बोर घाट फोडलेला नसल्यामुळे खोपोली ते खंडाळा हे अंतर प्रवाशांना पायी, घोड्यावरुन, पालखी-मेण्यांतून किंवा बैलगाडीने रात्रीच्या वेळी तोडावे लागे. १८५६-५७ साली पुण्यात नगरपालिका स्थापन झाली .१८८६ मध्ये घोरपडी-मिरज हा लोहमार्ग चालू झाला व पुढे तो पुण्यास जोडण्यात आला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुले, न्यायमुर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, आगरकर, महर्षी कर्वे इ. थोर पुरुषांची कर्मभूमी पुणेच बनल्याने त्याचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक महत्व वाढतच गेले.
औद्योगिक नगर म्हणून महाराष्ट्रात पुण्याचे स्थान मुंबईखालोखाल आहे. १९६० नंतर म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पुण्याचा औद्योगिक विकास वेगाने झाला. या विकासाची बीजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रुजलेली होती. खडकीचा दारुगोळ्याचा कारखाना (१८६९),मुंढव्याची डेक्कन पेपर मिल्स (१८८५), गुजरात मेटल फॅक्टरी(१८८८),राजा बहादूर मोतीलाल पूना मिल्स (१८९३), हे पुणे परिसरातील सुरुवातीचे काही प्रमुख उद्योग होत.
लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीमुळे पुण्याच्या परिसरात उद्योगधंद्यांना चालना मिळाली. उदा., तळेगावचा काच कारखाना (१९०८). दुसऱ्या महायुध्दकाळात लहानमोठ्या अनेक उद्योगांना वाव मिळाला. खडकीचे किर्लोस्कर ऑईल एंजिन्स (१९४६), हिंदुस्थान अँटीबायॉटिक्स लिमिटेड (१९५५) या उत्पादन संस्थांच्या मागेपुढे अनेक उद्योगधंदे पुणे परिसरात सुरु झाले. १९६० साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाले. या संस्थेतर्फे भोसरीजवळ सु. १,२१४ हे . जमीन औद्योगिक वसाहत म्हणून विकसित केली जात आहे. पुणे महानगरपालीकेने १९५६ साली हडपसर औद्योगिक वसाहत स्थापन केली. मुंबईचे सान्निध्य, उत्तमा हवामान,कुशल कामगार आणि पाणी, वीज, वाहतूक इत्यादींची पुरेशी उपलब्धता यांमुळे पुणे परिसराची झपाट्याने औद्योगिक भरभराट झाली.
पुण्याच्या वायव्येकडील खडकी, पिंपरी, चिंचवड व देहूरोड; उत्तर ईशान्येकडील भोसरी, येरवडा, नगररोड; पूर्वेकडील हडपसर व लोणी हे भाग, तसेच कर्वे मार्ग, रेल्वे स्थानकाचा परीसर, शंकरशेठ मार्ग, गुल़टेकडी इ. विभाग विविध प्रकारच्या लहानमोठ्या उद्योगधंद्यांनी गजबजलेले आहेत. साठे बिस्किट अँड चॉकलेट कंपनी, किर्लोस्कर कमिन्स व किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी, गरवारे नायलॉन्स, टेल्को, बजाज ऑटो, कूपर इंजिनिअरिंग, रस्टन अँड हॉर्न्सबी (इंडीया), बकाव उल्फ, सॅण्डविक एशिया, सिपोरेक्स (इडीया), स्वास्तिक रबर प्रॉडक्टस, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांसारखे उत्पादक उद्योग पुणे परिसरातच आहेत. पुण्याच्या औद्योगिक विकासात काही संस्थांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्युट, स्मॉल स्केल इंडस्ट्रीट सर्व्हिस इन्स्टिट्यूट, जनरल मॅकॅनिकल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट इ. उल्लेखनीय आहेत. यांशिवाय पुणे विभागिय उत्पादकता परिषद, शुगर टेकेनॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, फोरम ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजिस्टस या संस्था उद्योगधंद्यांना चालना देण्यास मदत करतात. म. औ. वि. महामंडळातर्फे पुणे-नगर रस्त्यावर वोघोलीजवळ ६०७ हे. क्षेत्र औद्योगिक वसाहत म्हणून विकसित केले जात आहे.
छापखाने, प्रकाशन संस्था, बांधकाम उद्योग व अनेक प्रकारचे लघुउद्योग शहरात विकसित झालेले आहेत. वेगवान औद्योगिकीकरणामुळे पुण्यात विविध वस्तूंच्या दुकानांची संख्या जलद वाढत गेली. हॉटेल धंद्यालाही चालना मिळाली. मोटारी, स्कूटर, सायकली वापरणा-यांची संख्याही वाढली. त्याचप्रमाणे लेखा परिक्षक, वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते, गृहशोभनकार, व्यवस्थापकीय सल्लागार मंड़ळे इ. व्यावसायित वर्गांतही वाढ झाली. मुख्य म्हणजे तरुण उद्योजकांची एक नवी पिढीच स्वतःचे छोटे-मोठे उद्योग स्थापन करण्यास प्रवृत्त झाली आहे. पुण्यातील उद्योगधंद्यांचा एक तक्ता पुढे दिला आहे :
पुणे शहरातील उद्योगधंदे (१९७८ च्या आकडेवारीनुसार)
उद्योगधंद्यांचा प्रकार | कारखान्यांची संख्या | कामगार संख्या |
१. खाद्यपदार्थ | ८६ | २,२४३ |
२. पेये आणि तंबाखू व तज्जन्य उत्पादने | १६ | २,४८५ |
३. सुती कापड | ९३ | ३,३६४ |
४. इतर कापड | ४ | ४३ |
५. इतर वस्त्रोत्पादन व तयार कपडे | ८७ | १,६१३ |
६. लाकूड आणि लाकडी वस्तू ९८२ | १०९ | ९८२ |
७. कागद आणि तज्जन्य उत्पादने,छपाई व तत्संबंधित उद्योग | ३०० | ५३७२ |
८. चर्मोद्योग | २३ | ४०४ |
९. रबर,प्लॅस्टिक, खनिज तेल व कोळसा उत्पादने | १२० | ३८२२ |
१०. रसायने व रासायनिक उत्पादने | १९४ | १०,०१२ |
११. अधातू खनिज उत्पादने (सिमेंट, | ||
काच, चिनी मातीच्या वस्तू) | ७१ | ४९६४ |
१२. मूल धातुउद्योग व मिश्र | ||
धातुउद्योग | १०६ | ५,६०२ |
१३. धातु-पदार्थ आणि सुटे भाग | ||
(यंत्रे व वाहतूकसामग्री वगळून) | ५७६ | ७१९९ |
१४. यंत्रे, अवजारे व सुटे भाग | ||
(यंत्रे व वाहतूकसामग्री वगळून) | २६७ | ३३,०६६ |
१५. विद्युत् यंत्रे,उपकरणे , | ||
सुटे भाग इत्यादी | २०७ | ११,८६८ |
१६. वाहतूकसामग्री व तीचे भाग | ६६ | १७,१३२ |
१७. इतर निर्मितिउद्योग | ७६ | १,०६४ |
१८. दुरुस्ती सेवाउद्योग | १०३ | ७२७ |
एकूण | २,५०४ | १,११,९६३ |
(आधारः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुणे यांचे औद्योगिक व व्यापारी वार्षिक, १९७८).
पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ १३८.८५ चौ.किमी. आहे. या भागात एकूण १,१७,५४२ घरे वापरात होती व त्यांत १,६३,९१० कुटुंबे राहत(१९७१). शहरातील पुरुष-स्त्री प्रमाण १,००० :८८५ होते. १९७१ च्या जणगणनेनुसार काही तपशिल असा : शहरात अनुसूचित जातिंच्या लोकांची संख्या ५५,८८४ व अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या ३,३१० होती. शहरात ६,७६,८९८ हिंदू; ७६,६६२ मुस्लिम;५०,६०१ बौध्द; २४,३५२ ख्रिस्ती; २१,७९९, जैन;४,६७४ शीख व २,११९ अन्य धर्मीय लोक होते. शहरातील सर्वसाधारण साक्षरताप्रमाण ६२.२٪ आणि स्त्री-पुरुष साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे ५३٪व ७०.४٪ होते.
पुणे महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र मानले जाते. १८८४ सालापासून शहरातील प्राथमिक शाळा पुणे नगरपालिकेकडे चालविण्यास देण्यात आल्या. बहुसंख्य प्राथमिक शाळा पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून काही शाळा खाजगी संस्थाही चालवितात. शहरात १९७१ साली एकुण ३४ बालवाडया, ३०६ प्राथमिक शाळा, १०९ पूर्व माध्यमिक आणि ११२ माध्यमिक शाळा होत्या. त्यांशिवाय शहरात १९७८ मध्ये विज्ञान, कला व वाणिज्य शाखा यांची १८ महाविद्यालये, दोन वीधी महाविद्यालये, दोन विधी महाविद्यालये,तीन शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालये,बी.जे. मेडीकल कॉलेज,आर्मड फोर्सेस मेडीकल कॉलेज व आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी, शेतकी, लष्करी अभियांत्रिकी इ. महाविद्यालये या उच्च शिक्षणाच्या संस्था होत्या. पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालय, अभिनव कला विद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, भारतीय फिल्म व दूरचित्रवाणी संस्था,भारतीय राषट्रीय फिल्मागार ह्या इतर उच्च संस्था पुण्यात आहेत.
यांशिवाय गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज (पदव्युत्तर व संशोधन संस्था), ववस्पत्युद्यान, वैकुंठ मेहता सहकार संस्था, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, आनंदाश्रम, भारत इतिहास संशोधक मंडळ, वैदिक संशोधन मंडळ, पाषाण येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, राष्ट्रीय चंड स्फोटक प्रयोगशाळा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तसेच मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र, भारतीय उष्ण कटिबंधीय मोसम विज्ञान संस्था (पुणे वेधशाळा), भारतीय औषधी अन्वेषण मंडळ, विषाणू संशोधन केंद्र, मुक्तद्वार ग्रंथालय, नगर वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी वाङमय मंडळ ह्या प्रमुख, उच्च संशोधन व अभ्यास संस्था शहरात व शहराच्या परिसरात आहेत.
पुणे शहरात १९७१ च्या आकडेवारीनुसार १३७ इस्पितळे, शुश्रूषागृहे, १,०२७ दवखाने, १३ प्रसूती व कुटुंबकल्याण केंद्रे व ९ अन्य वैद्यकीय सेवा केंद्रे होती. इस्पितळातील एकूण खाटांची संख्या ५,८८२ होती. ससून इस्पितळ, के. ई.एम. इस्पितळ व औंधचे लष्करी इस्पितळ, वेड्यांचे इस्पितळ, सांसर्गिक रोग इस्पितळ व औंधचे लष्करी इस्पितळ, वेड्यांचे इस्पितळ, सांसर्गिक रोग इस्पितळ ही प्रमुख इस्पितळे आहेत. जहांगीर व रुबी ही खाजगी शुश्रूषागृहे प्रसिध्द व अद्ययावत आहेत. संपूर्ण शहरात भुयारी गटार योजना आहे.
शहरातून ६ मराठी , २ इंग्रजी दैनिके; १४ मराठी, १ हिंदी व ५ अन्य भाषिक साप्ताहिके तसेच १०० मराठी, ५ हिंदी, १८ इंग्रजी व अन्य भाषिक पाक्षिके आणि मासिके प्रसिध्द होतात. सकाळ, केसरी, विशाल सह्याद्री, तरुण भारत इ प्रमुख मराठी दैनिके; मनोहर, माणूस, साधना, स्वराज्य इ.साप्ताहिके; शारदा हे संस्कृत पाक्षिक, किर्लोस्कर , स्त्री, सृष्टीज्ञान, क्रिडांगण इ. प्रसिध्द मराठी मासिके; भारत इतिहास संशोधक मंडळाचे शिक्षण आणि समाज हे त्रैमासिक ; शिवाय समाज प्रबोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य परिषदेची पत्रिका, गोखले अर्थशास्त्र संस्थेचे अर्थविज्ञान यांसारख्या ज्ञानपत्रिका पुण्यातून प्रसिध्द होतात. राज्याचे शिक्षण संचलनालय व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे कार्यालयही पुण्यातच असल्याने अनेक शालेय प्रकाशने येथे प्रसिध्द होतात. शहरात ६ सार्वजनिक ग्रंथालये आणि १० वाचनालये आहेत.
पुणे शहर जुने असल्याने त्याची रचना आखीव नाही. कसबा पेठ पुण्याचे मूळ केंद्र होते जुने पुणे एकूण १८ पेठांमध्ये विभागलेले होते. पुण्यात ज्या पेठा वसविल्या गेल्या, त्या निरनिराळ्या व्यक्तींनी आणि विविध कारणांसाठी वसविल्या. औरंगजेबाने पुण्यावरील स्वारीच्या वेळी बुधवार पेठ वसविली. शाहिस्तेखानाने मंगळवार पेठ स्थापन केली.
पहिल्या बाजीरावाने १७३४ मध्ये शुक्रवार पेठ आणि त्याचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी वेताळ (गुरुवार पेठ), नागेश,गणेश, नारायण आणि रविवार अशा पेठा वसविल्या. १७५५ मध्ये सोमवार पेठ वसविण्यात आली. १७६१ मध्ये पानिपतला धारातीर्थी पडलेल्या सदाशिवभाऊंच्या स्मृतिप्रीत्यर्थ सदाशिव पेठ व त्यानंतर नाना पेठ , रास्ता पेठ, घोरपडे पेठ इ. प्रमुख पेठा प्रमुख सरदारांच्या नावे वसविण्यात आल्या. पेठांची जुनी नावे वेगळी होती व काही नावे मुस्लिम होती ; पण १७९१ साली बऱ्याच पेठांस वारांची नावे देण्यात आली. १८८५ साली फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन करण्यात आले.
धोंडो केशव कर्वे यांनी एरवंडणे भागात महिला महाविद्यालय व हिंगण्यास स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्यामुळे त्या भागात वस्ती वाढली. शहरात एकूण ३५७ किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. शहरातील रस्त्यांची रचना रेल्वे स्थानक, स्वारगेट व डेक्कन जिमखाना ह्या तीन केंद्रांभोवती झालेली दिसते.पुण्याहून चार प्रमुख रस्ते बाहेरगावी जातात. त्यांत पुणे-मुंबई व पुणे-बंगलोर हे राष्ट्रीय महामार्ग तर पुणे-अहमदनगर-औरंगाबाद व पुणे-सोलापूर हे राज्य महामार्ग यांचा अंतर्भाव होतो.
शहराच्या मध्यातून व बाजूने नद्या असल्याने अनेक पूल बांधावे लागले. त्यांत फिटझजेराल्ड पूल- (बंड पूल), वेलस्ली पूल किंवा संगम पूल, शिवाजी पूल, संभाजी पूल किंवा लकडी पूल, कुंभारवेस पूल, ओंकारेश्वर पूल होळकर पूल हे प्रमुख आहेत. संगम पुलाजवळच रेल्वेचाही मोठा पूल आहे. पुणे हे दक्षिण-मध्य रेल्वेचे महत्वाचे प्रस्थानक आहे.
तेथून मुंबईस, पूर्वेस सोलापूर-मद्रासकडे व दक्षिणेस मिरज-कोल्हापूरकडे रुंद लोहमार्ग निघतात. पुणे-मुंबई लोहमार्ग दुहेरी व विद्युत्चलित आहे. पुणे मुंबईदरम्यान धावणारी डेक्कन क्वीन ही भारतातील वेगवान रेल्वेंपैकी एक आहे. शहरापासून ८ किमी. अंतरावर लोहगाव येथे विमानतळ आहे. शहरात १८५७-५८ साली नगरपालीका स्थापन झाली. १५ फेब्रुवारी १९५० साली तिचे रुपांतर पुणे महानगरपालिकेत करण्यात आले.
पुणे शहरास लागूनच पूर्व भागात पुणे लष्कर (कँटोनमेंट) हा भाग आहे. त्याचे क्षेत्रफळ १३ चौ.किमी. असून लोकसंख्या ७७,७७४ होती (१९७१). पुणे हे महाराष्ट्रतील महत्वाचे लष्करी केंद्र आहे. सदर्न कमांडचे मुख्य कार्यालय, संरक्षण लेखा कार्यालये येथे असल्याने पुणे लष्कर हा माग पूर्वीपासून स्वतंत्र ठेवण्यात आला असुन पुणे लष्कर मंडळ त्याचे प्रशासन चालविते. या प्रशासन मंडळावर १५ सभासद असून सदर्न कमांडच्या स्टेशनचे लष्करी प्रमुख त्याचे अध्यक्ष असतात.
आरोग्याधिकारी, कार्यकारी अभियंता व पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी नेमलेले प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व चार लष्करी अधिकारी प्रशासकीय मंडळावर नियुक्त केले जातात. व अन्य सात सभासद त्या प्रदेशातील नागरीक निवडतात. या भागात २७ प्राथमिक शाळा, १८ माध्यमिक शाळा व दोन महाविद्यालये ,२ इस्पितळे, १० शुश्रूषागृहे, २० दवाखाने, प्रसूतिगृह व कुटुंबकल्याण केंद्र आहे. जवळच पूर्वेस पूना टर्फ-रेस क्लब आहे. तीन सिनेमागृहे, एक ग्रंथालय व ७ वाचनालये आहेत.
महाराष्ट्राच्या कलाजीवनात पुण्यास खूपच महत्व आहे. मराठी रंगभूमीच्या विकासात पुण्याच्या रंगभूमीचा वाटा मोठा आहे. पुण्यात नाटकाची तीन रंगमंदिरे व २५ चित्रपटगृहे आहेत. आकाशवाणी केंद्र आणि दूरदकर्शन-सहप्रक्षेपण केंद्रही पुण्यात आहे. पुण्याजवळच सिंहगडावर दूरदर्शन-सहप्रक्षेपण केंद्रही पुण्यात आहे. पुण्याजवळच सिंहगडावर दूरदर्शन प्रक्षेपक मनोरा आहे. डेक्कन जिमखाना, पी.वाय.सी., महाराष्ट्र मंडळ यांसारख्या महत्वाच्या क्रिडा संस्थाही शहरात आहेत. शहरात अनेक क्रीडांगणे व जवाहरलाल नेहरु हे आधुनिक क्रीडाप्रक्षागृहे आहे. घोड्यांच्या शर्यती हे पुण्याचे आकर्षण असून जून ते सप्टेंबरअखेर येथे या शर्यती होतात.
शहर ऐतिहासिक असल्याने अनेक प्रेक्षणीय स्थळे पहावयास मिळतात. त्यांत पेशव्यांनी बांधलेला शनिवार वाडा, पर्वती, वानवडी येथील महादजी शिंद्यांची छत्री, पाताळेश्वर गुहा इ. उल्लेखनीय आहेत. लाकडी कोरीव कामासाठी प्रसिध्द असलेला विश्रामबाग वाडा दुसऱ्या बाजीरावाने बांधला. यांशिवाय रास्तेवाडा, नानावाडा हे जुने ऐतिहासिक वाडे पाहण्यासारखे आहेत.
रामकृष्ण परमहंस आश्रम, बाळधन व बापेरे येथील गुहा, चतुःशृंगी, जुनी व नवी बेलबाग, तुळशिबाग, ओंकारेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर, आदिनाथ, महालक्ष्मी, पार्श्वनाथ, जोगेश्वरी, सोमेश्वर, रामेश्वर, कसबा गणपती, खुन्या मुरलीधर इ. मंदिरे ; जामा मशीद, लाल देऊळ इ. प्रार्थनास्थाने प्रसिध्द आहेत. आधुनिक काळातील आगाखान पॅलेस, पेशवे उद्यान, संभाजी उद्यान, एम्प्रेस गार्डन, बंड गार्डन, चतुःशृंगी, सारस बाग, पुणे विद्यापीठ, म. फुले संग्राहालय, भारत इतिहास संशोधक मंडळ संग्रहालय, राजा केळकर वस्तुसंग्रहालय इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत. पुणे शहरातील प्रेक्षणीय स्थळांची सफर करताना म. फुले. लो.टिळक, समाजसुधारक आगरकर, महर्षी कर्वे इ. आधुनिक महापुषांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. देहू, आळंदी, थेऊर, कार्ला व भाजा लेणी, सिंहगड, पुरंदर हे किल्ले ही प्रेक्षणीय स्थले पुण्याच्या जवळच आहेत. (चित्रपत्र २४).
डिसूझा, आ. रे.
|
|
|
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा , १९८९ च्या अंतर्गत १५ ...
इंग्रज वैज्ञानिक जेम्स स्मिथसन यांच्या मृत्युपत्रा...
व्यक्ती आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासाचा पुरस्क...