অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

स्थापना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरुळ-अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्याकांसाठी ते नियोजन होते. औरंगाबाद शहरातील नागसेनवन परिसराला लागून मराठवाडा विद्यापीठ स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 1958 रोजी झाले. सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ असे नाव असलेल्या या विद्यापीठाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार 14 जानेवारी 1994 रोजी करण्यात आला. विद्यापीठाला गेल्यावर्षी नॅककडून ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाले असून कुलगुरु प्रो. डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांगीण विकासाकडे आगेकूच केली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी अवघी नऊ महाविद्यालये व तीन हजार विद्यार्थी अशी स्थिती असतानाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कृतिशील पाठबळाने मराठवाड्यातील जनतेचे स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न साकार झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील संलग्नित 400 महाविद्यालये येतात. उस्मानाबाद येथे विद्यापीठाचा उपपरिसर आहे. तसेच रत्नागिरी येथे विद्यापीठाचे किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्र कार्यान्वित आहे.

विस्तार

बौध्द लेणीच्या पायथ्याशी नयनरम्य व जैव विविधता असलेल्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जवळपास 750 एकरात वसले आहे. अतिशय अद्ययावत पायाभूत सुविधा आणि स्थापनेपासून अतिशय चांगले असे शैक्षणिक वातावरण येथे आहे. जास्तीत-जास्त सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठाने अनेक विभागाच्या नवीन इमारती उभारल्या. तेथे ज्ञानादानाचे कार्य केले जात आहे. याचबरोबर या परिसरात विविध भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारलेली आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची संख्या 400 च्या पुढे पोहचली असून जवळपास 3.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक विभाग सुरु करण्यात आले आहेत. विद्यापीठातील विभागांची संख्या आता 44 वर पोहचली असून शिक्षण, संशोधन, विस्तार आणि सेवा या चतु:सुत्रीचा अवलंब विद्यापीठाने केला आहे. विविध विद्याशाखातंर्गत पुढील अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.
स्कूल ऑफ आर्टस् :- एम.ए. : मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पाली व बुद्धीझम, संस्कृत, एम.फिल :- मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पाली व बुध्दिझम

स्कूल ऑफ सोशल सायन्सेस :- एम.ए. : इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या, एम.सी.जे., संगीत, भूगोल, मानसशास्त्र, वुमेन्स स्टडीज, लाईफ लाँग लर्निंग ॲण्ड एक्सटेंशन, मास्टर ऑफ सोशल वर्क, स्कूल ऑफ लिबरल आर्ट. एम.फिल :- इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालय व माहितीशास्त्र, वृत्तपत्रविद्या व जनसंवाद.

पदवी अभ्यासक्रम :- बी.ए.(एम.सी.जे), बी.ए. (जर्नालिझम, आर्टस अॅंड सायन्स), बॅचलर ऑफ ड्रामाट्रिक्स, बॅचलर ऑफ परफार्मिंग आर्ट, बॅचलर ऑफ म्युझिक, बी. ए. डान्स, बॅचलर ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स.

ललित कला :- बी. एफ. ए. पेंटींग व उपयोजित, बी. एफ. ए., ब्रिज कोर्स, एम. एफ. ए. पेंटींग व उपयोजित, एम. एफ. ए संशोधन पेंटींग व उपयोजित, मास्टर ऑफ परफार्मिंग आर्ट.

एम.एस्सी :- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ॲनोलिटीकल केमिस्ट्री, जीव-रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणितशास्त्र, उपयोजित गणित, सांख्यिकीशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र, जैव माहितीशास्त्र, 

एम.फिल :- गणित, संगणशास्त्र व माहिती तंत्रज्ञान 

अभियांत्रिकी विद्याशाखा :- बी. टेक फूड टेक्नॉलॉजी, बी. टेक. फार्मास्युटिकल अँड फाईन केमीकल्स, एम. टेक ड्रग्ज अँड फार्मास्यूटिकल, एम. टेक संगणक अभियांत्रिकी. व्होकेशनल स्टडीज : B.Voc./B.Voc + M.Voc. integrated, 

वाणिज्य :- एम.कॉम, एम.आय.बी., डी.बी.एम, व्यवस्थापनशास्त्र : एम.बी.ए, एम.बी.ए पार्ट टाईम, एम.बी.ए, ड्यूएल, एम.बी.ए एक्झ्युकेटिव्ह, मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अप्लिकेशन, मास्टर ऑफ टूरीझम अँड मिनीस्ट्रेशन.

विधी विद्याशाखा :- एल.एल.एम, शिक्षणशास्त्र : एम.एड, एम.फिल, शारीरिक शिक्षण : एम.पी.एड, एम.फिल

प्रमाणपत्र अभ्यासक्रम :- पी.सी.सी.इन रशियन, जर्मन, चायनीज, सर्टीफिकेट अँड डिप्लोमा इन सेरीकल्चर सर्टीफिकेट कोर्स इन पाली, फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इल्युस्टेटर, बेसिक फोटोग्राफी, सर्टीफिकेट कोर्स ऑफ कम्युनिकेशन स्कील इन इंग्लीश, उर्दू शॉर्ट टर्म कोर्स, सर्टीफिकल कोर्स इन मोडी स्टडीज, म्युझियम स्टडीज, वूमेन्स स्टडीज, सर्टीफिकेट कोर्स इन अप्लीकेशन, फोक थिएटर, चिल्ड्रन थिएटर, फॅशन डिझायनिंग, मॉडेलिंग.

उस्मानाबाद उपपरिसर :- एम.ए. इंग्रजी, एम.एस्सी रयायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैविक तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र, जलभूमी व्यवस्थापनशास्त्र, एम.बी.ए., एम.सी.ए.

विद्यापीठातील अध्यासने

राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषाच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत व त्यांच्यावर संशोधन कार्य व्हावे या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, गौतम बुध्द, वसंतराव नाईक, बाळासाहेब पवार, शाहिर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद यांच्या नावाने अध्यासन केंद्र कार्यरत आहेत. तसेच सी.व्ही.रामानुजन केंद्र, ग्रामीण समस्या, पॉल हार्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोंडिग आदी संशोधन केंद्र कार्यरत आहेत. अद्यावत अशा ‘डिजिटल स्टुडिओ’ चे काम प्रगतीपथावर असून पत्रकारिता, जनसंपर्क व प्रसार माध्यमामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

विद्यार्थी कल्याण योजना

श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान व स्वयंनिर्भरता या हेतूने विद्यापीठ स्तरावर ‘कमवा आणि शिका’ योजना राबविणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. आज घडीला पाचशे विद्यार्थी या योजनेतंर्गत कार्यरत आहेत. स्पर्धात्मक परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत या हेतूने ‘प्री-आयएएस’ कोचिंग सेंटर कार्यरत आहे. विद्यापीठ सुवर्ण महोत्सवानिमित्त संशोधक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ‘गोल्डन ज्युबली फेलोशिप’ पुन्हा एकदा विद्यमान कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी सुरु केली आहे. प्रति माह 8 हजार रुपये फेलोशिप या अंतर्गत देण्यात येते. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने गेल्या दोन वर्षापासून वसतीगृह शुल्क माफ केले असून एक हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. पत्रकारिता व नाट्यशास्त्र या दोन विभागाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पत्रकार, कलावंत घडविले आहेत. दोन वर्षापासून व्होकेशनल स्टडीज् व लिबरल आर्टस् हे नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केले आहेत.

विद्यापीठ ग्रंथालय

विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे आता ‘नॉलेज रिसोर्स सेंटर’ असे नामकरण करण्यात आले असून विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी ज्ञानाचे भांडार 24 तास ऑनलाईन उपलब्ध आहे. ग्रंथालयात सध्या सुमारे पावणेचार लाख ग्रंथ असून जवळपास 5 हजार दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक थेसीस डेटाबेस, ग्रंथालय संगणकीकरण, ई-लायब्ररी, स्मार्ट कार्ड, सिडी-डीव्हीडी लायब्ररी, सी.सी.टीव्ही कॅमेरे, सुसज्य वाचनकक्ष, रिमोट ॲक्सेस, वेबकॅफे मॅनेजमेंट ही ग्रंथालयाची वैशिष्ट्ये आहेत.
विद्यापीठाने परिसरातील तसेच सर्व महाविद्यालयातील पदव्यूत्तर विभागासाठी ‘चाईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम’ सुरु केली आहे. गेल्या काही वर्षात नेट-सेट व जेआरएफ प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. इन्फोसिस, वोखार्ड, बजाज समूह, एंड्रेस हौजर आदी उद्योग समूहाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली आहे. ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’च्या माध्यमातून निधी उभा करण्याचा विद्यमान कुलगुरुंचा मानस आहे. या दृष्टीने विशेष कार्यासन अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. युनिर्व्हसिटी फॉर सोसायटी, युनिर्व्हसिटी विथ आयसीटी ही संकल्पना समोर ठेऊन वैश्विक दर्जाचे संशोधन होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गुणवत्ता व सामाजिक बांधिलकी हे ब्रिद जोपासतानाच राष्ट्र निर्मितीत योगदान देणारे विद्यार्थी, संशोधक येथून घडावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ‘थिंक ग्लोबली ॲण्ड ॲक्ट लोकली’ हा विचार आता मागे पडला असून कृतीही वैश्विक दर्जाची करावी लागणार आहे. एका अर्थाने विद्यापीठाची वाटचाल ही आता ग्लोबल विद्यापीठाच्या दृष्टीने सुरु आहे.

संपर्क :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संपर्क करण्यासाठी 0240-2403399/400 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. याशिवाय विद्यापीठाच्या www.bamu.ac.in या वेबसाईटवरही भेट देता येऊ शकेल.
लेखक - संजय शिंदे जनसंपर्क अधिकारी, 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 11/3/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate