অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुंबई विद्यापीठ

शैक्षणिक वर्ष सुरू झाले की उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांची विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी धावपळ असते. अशावेळी विद्यापिठाशी संलग्न जिल्हे कोणते आहेत, कोणत्या विद्यापिठामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आदींबाबत एकत्रित माहिती मिळाली तर अत्यंत उपयुक्त ठरते.

हाच उद्देश नजरेसमोर ठेवून महान्यूज राज्यातील विविध विद्यापिठांची एकत्रित माहिती देणारे नवीन सदर सुरू करीत आहे. याची सुरूवात करू या मुंबई विद्यापीठापासून....मुंबई विद्यापीठाची स्थापना मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक अग्रेसर विद्यापीठ असून भारतातील पहिल्या तीन विद्यापीठ्यांपैकी एक असा मान मुंबई विद्यापीठाने पटकावला आहे.

याशिवाय जगातल्या टॉप ट्वेंटी विद्यापीठांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठ नवव्या स्थानावर असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया तसेच एमआयटीलाही मागे टाकत जगाच्या पाठीवर मुंबई विद्यापीठाचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारताली जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली.

‘वुड्स शैक्षणिक योजने’अंतर्गत या विद्यापीठाची स्थापना झाली आहे. पूर्वी बॉम्बे विद्यापीठ अशी याची ओळख होती. मात्र ‘बाँम्बे’ शहराचे ‘मुंबई’ असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव 4 सप्टेंबर 1996 रोजी ‘बाँम्बे विद्यापीठ’ ऐवजी ‘मुंबई विद्यापीठ’ असे करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे पाच कॅम्पस असून 243 एकरवर विद्यापीठ पसरले आहे.

वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या राजाबाई टॉवरमुळेही मुंबई विद्यापीठाची शान वाढली आहे. गिलबर्ट स्कॉटने या इमारतीचा आराखडा तयार केला होता. 15 व्या शतकातील इटालियन भवनासारखी मुंबई विद्यापीठाची इमारत दिसते. विद्यापीठाची मुख्य इमारत, विशाल ग्रंथ संग्रहालय, कन्व्होकेशन हॉल आणि 80 मीटर उंचीचा राजाबाई टॉवर या वास्तु मुंबई विद्यापीठाच्या सौंदर्यात भर घालतात.

मुंबई विद्यापीठाची वैभवशाली परंपरा

मुंबई विद्यापीठाला गेल्या 158 वर्षांच्या समृद्ध आणि वैभवशाली परंपरा आहे. विद्यापीठाचे आरंभीचे स्वरूप, वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था, असे होते. त्यावेळी मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापीठाचे कुलपती असायचे.

मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिंध यांचा समावेश होता. परंतु संलग्न महाविद्यालये केवळ चार ते पाचच होती. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन हे मुंबई विद्यापीठाचे प्रथम कुलपती, तर मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू होते.

१८५७ च्या कायद्यानुसार कुलसचिवाची नेमणूक सिनेट फक्त दोन वर्षांसाठी करीत असे. १९०२ साली प्रथम फर्दुनजी दस्तुर या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकाची अर्धवेळ कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. हे पद त्यांनी १९३० पर्यंत भूषविले. त्यानंतर एस.आर.डोंगरकेरी, टी.व्ही. चिदंबरन व का.स. कोलगे हे कायम स्वरूपाचे कुलसचिव होते. मुंबईमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे डॉ.जॉन विल्सन, ज्यांच्या नावाने मुंबईत विल्सन महाविद्यालय आहे, ते मुंबई विद्यापीठाच्या सीनेटचे पहिले सभासद होते.

दिग्गज विद्यार्थ्यांची परंपरा

१९४८ चा माध्यमिक शालान्त परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचे काम मुंबई विद्यापीठाकडे होते. १८५९ साली पहिली मॅट्रिकची परीक्षा झाली. या पहिल्या मॅट्रिकच्या परीक्षेत १३२ मुलांपैकी फक्त २२ मुलेच उत्तीर्ण झाली होती. पहिली प्रथम वर्ष (कला) परीक्षा १८८१ मध्ये झाली. त्यात पहिल्या मॅट्रिकच्या तुकडीतील १५ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी सातच उत्तीर्ण झाले. या सातांपैकी पहिल्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात सहा विद्यार्थी बसले, त्यांपैकी चार उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा हा मान महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर (दोघे प्रथम वर्ग), बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांनी पटकावला आहे.

या काळात मुंबई विद्यापीठातून शिकलेल्या अनेकांनी जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा, एस.सी. छागला, मोहम्मद अली जिना, यांच्यापासून ते लालकृष्ण आडवाणी, जगदीश भगवती, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर, द्वारकानाथ कोटणीस, वसुंधरा राजे, प्रफुल्ल पटेल, अजित गुलाबचंद अशा अनेक दिग्गजांसह विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले दिग्गज या विद्यापीठांचे विद्यार्थी होते.

सिंगापूरच्या वेल्थ एक्स आणि स्विस बँक युबीएस यांनी जगभरातील अब्जाधीशांच्या जाहीर केलेल्या यादीत १२ अब्जाधीश मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. यात मुकेश अंबानी, अनिल अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, निरंजन हिरानंदानी, अजय पिरामल, अश्‍विन चिमनलाल चोकशी हे अब्जाधीश मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण, आदिवासी विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत.

अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठाने १९१३ सालापासून पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे ही कार्येही विद्यापीठाकडेच होती.

१९२८ च्या अधिनियमानुसार विद्यापीठाच्या सिनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधिक स्वरूपाची झाली. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापीठाच्या कक्षेत आले व त्यानुसार संलग्न महाविद्यालयांतील अध्यापकांना विद्यापीठाचे अध्यापक म्हणून मान्यता देणे या तरतुदी करण्यात आल्या. पदवी पर्यंत शिक्षण संलग्न महाविद्यालयात व पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठाच्या विभागांद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

मुंबई विद्यापीठाच्या १९५३ च्या अधिनियमानुसार विद्यापीठाची पुनर्रचना झाल्याने सर्व संलग्न महाविद्यालये घटक-संस्था होऊन विद्यापीठाचे स्वरूप संघात्मक (फेडरल) झाले.

संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त 83 संशोधन संस्था यांमधील पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षणावर नियंत्रण ठेवता येऊन त्यासंबंधी कार्यकारी मंडळात शिफारसी करता येतील, अशा शैक्षणिक विभागांची निर्मिती झाली. बहिःशाल शिक्षण, निरंतर शिक्षण, विद्यापीठ व्याख्यानमाला, विद्यापीठेतर शिक्षणक्रम, विद्यार्थी कल्याण केंद्र, पत्रद्वारा शिक्षण, पाठनिदेश पद्धती, आरोग्य केंद्र, माहिती संचालनालय, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र इत्यादींची विद्यापीठीय कार्यात भर पडली. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांच्या कार्याची तपासणी करणे, अध्यापक व सेवक यांच्या कार्याची तपासणी करणे, अध्यापक व सेवक यांच्या नेमणुका करणे, त्यांच्या सेवेच्या शर्ती ठरविणे, पदव्युत्तर शिक्षणकेंद्रावर नियंत्रण ठेवणे या स्वरूपाचे अधिकारही विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळास प्राप्त झाले.
जगभर शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. हे बदल वेळोवेळी मुंबई विद्यापीठाने अंगीकारले. या बदलांच्या अनुषंगाने शिक्षणपद्धतीत होणाऱ्या बदलांची योग्य सांगड मुंबई विद्यापीठाने घातली.

मुंबई विद्यापीठातर्फे 56 पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात. यात विज्ञान, सामाजिक विज्ञान, भाषा, फाईन आर्ट, कायदा यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याशिवाय कला, विज्ञान, वाणिज्य कायदा, व्यवस्थापन, इंजिनिअरिंग, एव्हिएशन या शाखेसह इतर शाखेतील पदवी अभ्यासक्रमही राबवले जातात.

विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे, याची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापीठाने कम्युनिटी कॉलेजेस सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता यावेत म्हणून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. उच्च दर्जाचे शैक्षणिक संशोधन व्हावे, यासाठी जवळपास चार लाखांहून अधिक रिसर्च जर्नल्स ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी, यासाठी सूक्ष्म विज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल करत नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा अद्ययावत विभाग सुरू करण्यात आला आहे.

सेंटर फॉर एक्सलन्सी इन बेसिक सायन्स या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. अणुऊर्जा विभागाच्या सहयोगाने हा अभ्यासक्रम राबवला जातो. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वाढ मुंबई विद्यापीठाशी आज घडीला ७२९ महाविद्यालये संलग्नित असून ५६ विद्यापीठ विभाग आहेत. तर यातील विद्यार्थ्यांची संख्या सात लाखांहून अधिक आहे. जगाच्या पाठीवर शिक्षणपद्धतीत आज जी श्रेयांक श्रेणीपद्धती (क्रेडिट सिस्टिम) अस्तित्वात आहे, त्याचा स्वीकार मुंबई विद्यापीठाने केला आहे.
महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कार्यप्रणालीत एकसूत्रता आणण्यासाठी कायदा केला. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली. मुंबई आणि उपनगरे यांखेरीज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आणि केंद्रशासित गोवा प्रदेशातील सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत.

मुंबई विद्यापीठाचा विस्तार पहिल्या १७ वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाची स्वतःची इमारत नव्हती. विद्यापीठाची कचेरी टाउन हॉलमध्ये होती. सिनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही याच ठिकाणी होत. १८६९ मध्ये कावसजी जहांगीर रेडीमनो यांनी विद्यापीठास इमारतीसाठी एक लक्ष रुपयांची देणगी दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहास 'सर कावसजी जहांगीर हॉल' असे नाव देण्यात आले.

१८६४ मध्ये प्रेमचंद रायचंद यांनीही दोन लक्ष रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी आपल्या मातोश्री राजाबाई यांच्या स्मरणार्थ मनोरा (टॉवर) बांधण्यास आणखी २ लक्ष रुपये दिले.

संपर्क- मुंबई विद्यापीठाशी संपर्क करण्यासाठी 022- 22704390 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या बेवसाईटवरही भेट देता येऊ शकेल.-वर्षा फडके

 

माहिती स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate