অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ

मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेवून परभणी येथे १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्त त्‍यांच्‍या राज्‍यातील कृषि क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाच्‍या नामविस्‍तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असा करण्‍यात आला आहे. विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या तीन क्षेत्रात कार्य करते. शैक्षणिक कार्य १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने सुरवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ३५ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व ५३ संलग्‍न कृषि तंत्र विद्यालये आहेत.

याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषि विषयक शिक्षण देण्‍यात येते. विद्यापीठामध्‍ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्‍न तंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्‍युत्‍तर तर आचार्य पदवी कार्यक्रम कृषि शाखेच्‍या नऊ विषयात, अन्‍न तंत्रज्ञान शाखेत पाच विषय, कृषि अभियांत्रिकी शाखेतील चार विषयात व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येतो. परभणी, लातुर, बदनापूर, अंबेजोगाई, उस्‍मानाबाद, गोळेगांव येथे प्रत्‍येकी एक याप्रमाणे सहा कृषि महाविद्यालये असून परभणी ये‍थे उद्यानविद्या, गृहविज्ञान महाविद्यालय, लातूर येथे जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व चाकूर येथे कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अशा बारा शासकीय महाविद्यालयाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  संशोधन कार्य विद्यापीठातील निरनिराळ्या संशोधन केंद्र व संशोधन योजनांमार्फत विविध विषयावर संशोधन केले जाते.

विद्यापीठात राज्‍य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना, २४ अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प कार्यरत असून आजपर्यंत विविध पिकांचे शंभरपेक्षा जास्‍त वाणे व २८ यंत्रे विकसित करुन सहाशेपेक्षा जास्‍त तंत्रज्ञान शिफारसी शेतकऱ्‍यांसाठी प्रसारित केल्‍या आहेत. विद्यापीठाने विकसित केलेली पिकांच्‍या काही वाणांना राज्‍यातच नव्‍हे तर राज्‍याबाहेरही प्रसिद्धी मिळालेली आहे. शेतकऱ्‍यांत प्रचलित असून यात भेंडीची परभणी क्रांती, कापसाची नांदेड ४४, रबी ज्‍वारीची परभणी मोती, तुरीची बीएसएमआर ७३६, सोयाबीन मध्‍ये एमएयुएस ७१, एमएयुएस ८१ व एमएयुएस ६१, चिंचामध्‍ये प्रतिष्‍ठान वाणाचा उल्‍लेख करावा लागेल. मराठवाड्यातील मर्यादित सिंचन लक्षात घेऊन कोरडवाहु शेती तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर भर देण्‍यात आला आहे. उस्‍मानाबादी शेळी, लाल कंधारी व देवणी गाय, पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय याबाबत पैदास व संवर्धन यावर संशोधन केले आहे

.विस्‍तार शिक्षण कार्यविद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यंत पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट(१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषि विस्‍तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारे संपूर्ण मराठवाड्यात केल्‍या जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी तसेच शेतकऱ्‍यांमध्‍ये नवचैतन्‍य निर्माण करण्‍यासाठी ‘विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ हा नाविन्‍यपूर्ण असा विस्‍तार शिक्षण उपक्रम राबविण्‍यात येतो. मराठवाड्यातील सद्य दुष्‍काळ परिस्थितीस शेतकऱ्‍यांना धैर्यान तोंड देण्‍यासाठी व त्‍यांना आत्‍महत्‍यापासून परावृत्‍त करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍यावतीने ‘उमेद’ उपक्रम राबविण्‍यात येत असून शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या मदतीने गावात प्रभात फेरी काढून शेतकऱ्‍यांना भावनिक आवाहन केले जात आहे. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ प्रत्‍येक गावातील शेतकऱ्‍यांच्‍या शेती विषयक समस्‍यानुसार कमी खर्चाचे तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

शेतीत दिवसेंदिवस पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर होत असून शासनाच्‍यावतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या जलयुक्‍त शिवार अभियानास विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ तांत्रिक मार्गदर्शन व प्रबोधन करीत आहेत. पावसाचे पाणी गावाच्‍या शिवारात अडविणे, पाणलोट क्षेत्र विकास, शेततळे, विहिर पुनर्भरण आदी बाबींवर विशेष भर देण्‍यात येत आहे. दरवर्षी १८ मे रोजी खरीप पिक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन), १७ सप्‍टेंबर रोजी रबी पिक मेळावा (मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन) घेण्‍यात येवून शेतकऱ्‍यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करण्‍यात येते व विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणाचे वाटप केले जाते. क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, शेतीभाती मासिक, कृषि दिनदर्शिका, विविध विषयावरील पुस्‍तिका, घडीपत्रिका याचे प्रकाशन करण्‍यात येते.

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठात प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी १९८४ साली पुणे येथे महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली. कृषि विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेणे, मूल्यमापन करणे, पर्यवेक्षण करणे आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषि परिषदेवर सोपविण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत विविध कृषि व कृषि संलग्‍न विषयात ७९२ जागांची शासकीय महाविद्यालयांची प्रवेशक्षमता असून १८२० विनानुदानित महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेशक्षमता असून एकूण ४०५२ प्रवेशक्षमता आहे. आठ सत्रे असलेले चार वर्षे कालावधीचा बी.एस्‍सी. (कृषि), बी.एस्‍सी. (उद्यानविद्या), बी.एस्‍सी. (कृ‍षी जैव तंत्रज्ञान), बी.टेक. (अन्‍नतंत्र), बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी), बी. एस्‍सी. (गृहविज्ञान), बी.बी.ए. (कृषि) आदी पदवी अभ्‍यासक्रम उपलब्‍ध आहेत.

कृषि पदवीधरात उद्योजगतेचे बीज रूचविण्‍यासाठी संपूर्ण एक सत्र अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येतो तसेच एक सत्र प्रत्‍यक्ष शेतकऱ्‍यांच्‍या शेतावरील प्रत्‍यक्ष अनुभवासाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्‍यात येतो. पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी ३७४ तर आचार्य (पीएच. डी.) अभ्‍यासक्रमासाठी विविध विद्याशाखांमध्‍ये ४२ प्रवेशक्षमता आहे. पदवी अभ्‍यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही पदार्थ विज्ञान, रसायनशास्‍त्र, जीवशास्‍त्र व इंग्रजी विषयांसह उच्‍च माध्‍यमिक इयत्‍ता १२ वी परीक्षा उत्‍तीर्ण आहे. तर बी. टेक. पदवीसाठी गणित विषय असणे अनिर्वाय आहे. तसेच चार‍ही कृषि विद्यापीठातंर्गत विद्यार्थ्‍यांना दहावी नंतर दोन वर्षांचा कृषि पदविका अभ्‍यासक्रम कृषि विद्यालयतून दिला जातो. माळी प्रशिक्षण हा प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमाची सुविधा उपलब्‍ध आहे. कृषि विद्यापीठाच्‍या अभ्‍यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ही कृषि परिषदेमार्फत ऑनलाईन राबविण्‍यात येते. याबाबत सविस्‍तर माहिती कृषि परिषदेचे संकेतस्‍थळावरwww.mcear.org वर उपलब्‍ध आहे.

लेखक - डॉ.प्रवीण कापसे,जनसंपर्क अधिकारी,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी.

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/31/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate