অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रंथविक्री-व्यवसाय

ग्रंथविक्री-व्यवसाय

प्रकाशित ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रंथविक्री-व्यवसायातर्फे केले जाते. ग्रंथविक्रीचा व्यवसाय तसा प्राचीन आहे. प्राचीन ईजिप्तमध्ये कवी आपली कवने रस्त्याने म्हणून दाखवीत आणि कोणी त्यांची मागणी केल्यास त्यांच्या नकला करून विकत. ग्रंथविक्रीचा हा प्राचीनतम प्रकार होय. कित्येक वेळा अशा साहित्याच्या प्रती तयार केल्या जात. प्रती तयार करणारे हे नकलनवीस म्हणजे एक प्रकारचे प्राचीन ग्रंथविक्रेतेच होय. मध्ययुगीन यूरोपात धार्मिक ग्रंथांची गरज निर्माण झाली.  ती भागविण्यासाठी हे धार्मिक ग्रंथ घेऊन विक्रेते गावोगाव फिरू लागले. कालांतराने ते एका जागी स्थिर झाले व त्यांना स्टेशनर्स’ असे नाव मिळाले. रोममध्ये अशा स्थिर पुस्तकविक्रेत्यांची माहीती मिळते. बाराव्या शतकात फ्रान्समधील पॅरिस व बोलोन्या येथे पुस्तकविक्रीची दुकाने असल्याची नोंद आढळून येते. १४०३ च्या सुमारास लंडनमधील चर्चच्या परिसरात अशी दुकाने थाटल्याची माहिती मिळते. आजही धर्ममंदिरांच्या आजूबाजूला धार्मिक ग्रंथविक्रेते आढळून येतात.

मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ग्रंथाची निर्मिती वाढली आणि त्याबरोबरच पुस्तकविक्रेत्यांची दुकानेही वाढली. पुस्तकांची मागणी वाढल्याबरोबर त्यांच्या किंमतीही  वाढू लागल्या.  इंग्लंडमध्ये १७०९ च्या लेखाधिकार कायद्यान्वये पुस्तकांच्या किंमतींवर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला;परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. ज्ञानाचा प्रसार होऊ लागला खरापण पुस्तकांतील स्वतंत्र विचारसरणी त्या काळच्या सत्ताधीशांना मानवण्यासारखी नव्हती. त्यामुळे ग्रंथनिर्मितीवर सुरुवातीस जाचक निर्बंध घालण्यात आले. यासाठी १५५७ मध्ये स्टेशनर्स गिल्ड’ या नावाची संघटना स्थापण्यात आली.सुरुवातीस मुद्रक-प्रकाशक व पुस्तकविक्रेते आणि केवळ प्रकाशक यांचे व्यवसाय स्वतंत्र झाले. त्यांना जोडणारा दुवा म्हणजे घाऊक पुस्तकविक्रेते.पुस्तकांच्या किंमतीबाबत त्यावेळी दुष्ट स्पर्धा चालू होती. ती थांबविण्यासाठी नक्त किंमतीचा करार (नेट बुक अ‍ॅग्रिमेंट) एकोणिसाव्या शतकात करण्यात आलात्यावरही वादंग झाले. संघटना केल्याशिवाय या व्यवसायातील अपप्रकारांना आळा बसणार नाहीहे पाहून १८९९ मध्ये असोशिएटेड बुकसेलर्स ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड ही संघटना स्थापन झाली. तिने आपले काम फारच जोमाने केले. ग्रंथविक्रेत्यांसाठी अभ्यासक्रमग्रंथचिन्हे (बुक टोकन्स) यांसारखे अनेक उपक्रम या संस्थेने हाती घेतले.

मेरिकेत त्या मानाने ग्रंथविक्री-व्यवसायास उशिरा सुरुवात झाली. सतराव्या शतकापासून प्रकाशक व पुस्तकविक्रेते हे निरनिराळे झाले. हा व्यवसाय त्या वेळी बॉस्टनन्यूयॉर्क वगैरेंसारख्या मोठ्या शहरांतच चालू शके. पुस्तकासाठी आगाऊ ग्राहक मिळविण्याची पद्धती अठराव्या शतकात सुरूझाली. एकोणिसाव्या शतकांपर्यंत गावोगावी पुस्तके विकणारे फिरते व्यापारी आढळून येत. पुस्तकांच्या प्रती लिलावाने विकण्याची पद्धत रूढ होती. सुरुवातीला प्रकाशकांची पुस्तकविक्रीची स्वतःची दुकाने असत. पुढे इतर प्रकाशकांचे ग्रंथही विक्रीसाठी ठेवण्यात येऊ लागले. तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या पुस्तकांच्या याद्या वाटण्याची प्रथाही पुढे रूढ झाली. विसाव्या शतकात या धंद्यात कल्पक लोक शिरू लागले. ग्रंथसप्ताहग्रंथकार-संमेलने,स्वाक्षरीसमारंभ वगैरे नवीन उपक्रमांचा अवलंब करून विक्रेत्यांनी ग्रंथविक्रीस नेटाने सुरुवात केली. ग्रंथमंडळे वा ग्रंथनिवडमंडळे यांसारख्या योजनाही आखण्यात आल्या. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर इतरही अनेक योजना हाताळण्यात आल्या. परिणामतः स्वस्त कागदी बांधणीच्या पुस्तकांचे (पेपर बॅक्स) अमाप पीक उगवू लागले. स्वस्त किंमतीच्या या कागदी बांधणीच्या पुस्तकांच्या प्रकारांत आरंभी केवळ ललित ग्रंथांचाच समावेश असेपरंतु पुढे ती लोकप्रिय झाली असे पाहताच शास्त्रीयवैचारिक अशा पुस्तकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुस्तकविक्रीची दुकाने चालू झाली. तत्पूर्वी लेखकाला अथवा प्रकाशकाला घरोघरी व गावोगावी जाऊन पुस्तकाच्या विक्रीची व्यवस्था करावी लागत असे. तीर्थयात्रा करणारे संत-महंत आपल्याबरोबर पोथ्या बाळगीत व त्यांचा प्रचार-प्रसार करीत. या बाबतीत महानुभावांनी मोलाचे कार्य केले आहे.

प्रकाशकांचे प्रतिनिधीही बैलगाड्यांतून पोथ्यांचे पेटारे घेऊन गावोगाव हिंडत. या पेटाऱ्यांस आतून बुरुडकाम केलेले असून बाहेरून कातडे लावलेले असे. पेटाऱ्यांची लांबी सु. २ मी.रुंदी ०·९१ मी. व उंची ०·६१ मी. असे. प्रवासाच्या वेळी विक्रेत्यांबरोबर संरक्षणासाठी संस्थानिकांतर्फे स्वारही पाठविण्यात येत. गावातील मारुतीच्या देवळात ते आपला मुक्काम ठोकून आपण आल्याची व अमुक ग्रंथावर रात्री प्रवचन असल्याची दवंडी पिटवीत. प्रवचन संपल्यावर ग्रंथाची विक्री सुरु होई. श्रोत्यांपैकी काही लोक पुस्तके विकत घेत. ग्रंथदान हे पुण्य समजले जाई. महाभारताची प्रत विकत घेऊन दान करीत व शिवाय एक मोहोर दक्षिणा देत. सोवळ्याओवळ्याचे प्रस्थ त्या वेळी विशेष असल्याने हे ग्रंथ ताडपत्रांवर लिहिलेले असत. शाई खलताना पाण्याऐवजी ती तुपात खलत व रेशमी वस्त्रात लोकरीच्या दोऱ्याने पुस्तके बांधीत. छापील ग्रंथावर लोकांचा विश्वास नसे. पंचांगासारखे धार्मिक ग्रंथ छापूनही गणपत कृष्णाजी यांना ते विकण्यास अडचण पडली. १८६१ मध्ये गणपत कृष्णाजींनी पहिले पंचांग छापले. हळूहळू सोयीसाठी लोकांनी ते विकत घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीस मुद्रणप्रकाशन व ग्रंथविक्रय हे तीनही व्यवसाय एकत्र असत. महाराष्ट्रात सरकारने क्रमिक पुस्तके छापवून ती विक्रीसाठी तयार केल्यानंतर विक्रेत्यांच्या अभावी शाळांमार्फत त्यांची विक्री होत असे. अशा केंद्रांची संख्या एके काळी ५८९ पर्यंत गेली होती. सरकारी पुस्तकांबरोबरच इतरांची पुस्तकेही या केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात येत. नंतर महाराष्ट्रात पुस्तकविक्रीची दुकाने सुरु झाली.त्या वेळी मुंबईत चिंचणकर, साधले, पोतदार, आत्माराम सगुण, धामणस्कर इ. ग्रंथविक्रेते प्रसिद्ध होते. पुण्यासारख्या ठिकाणी जोशी, शिराळकर, मुळे, कासार या ग्रंथविक्रेत्यांचे उल्लेख मिळतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेळगाव येथे सरकारी ग्रंथभांडारे ग्रंथविक्रीचे काम करीत. पुण्यातील बुधवार चौकातील बुधवार वाड्यात तळमजल्यावर पुस्तकविक्रीचे मोठे दुकान होते. तो वाडा जळाल्यानंतर ते दुकान बंद करण्यात आले.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी १८९० मध्ये पुणे येथे किताबखाना या नावाचे पुस्तकविक्रीचे दुकान सुरु केले. त्या काळात पुणे येथे रावजी श्रीधर गोंधळेकरआळेकरदाभोळकरगोडबोले या पुस्तकविक्रेत्यांची दुकाने होती. केशव भिकाजी ढवळे यांनी १९०० मध्ये गणेश चतुर्थीस मुंबईतील माधवबागेच्या देवळाजवळील पिंपळाच्या पारावर पुस्तकांचे दुकान मांडले. तत्पूर्वी काळबादेवी येथे गोपाळ नारायणसुंदर पांडुरंगबाबाजी सखारामज. म. गुर्जर यांची पुस्तकविक्रीची दुकाने होती. तेथील धंदा माधवबागेत आणण्याचे श्रेय ढवळे यांच्या बरोबरीने बा. ल. पाठकरेळेपुरंदरेशेट्ये यांनाही द्यावे लागेल. पुणेमुंबई ही विद्येची केंद्रे समजली जात. सरकारी कचेऱ्या  येथेच असल्याने सुशिक्षितांचा भरणा या शहरातच असे. बाहेरगावच्या ग्रंथविषयक गरजा येथूनच भागविल्या जात. पुण्यातील बुधवार चौकात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पुस्तकविक्रीची दुकाने सुरू झाली. ही दुकाने बैठकीची असत व ग्राहकांना तेथे बसून पुस्तके पाहता येत. अमावास्येच्या दिवशी दुकाने बंद असत.

खेडोपाडी पुस्तकविक्रीची दुकाने चालणे शक्य नव्हते. सर्व जगभर हाच प्रकार आढळून येतो. इतर माल विकणारे व्यापारी शाळा सुरू होण्याच्या वेळी पुस्तके ठेवतील तेवढीच. पंढरपूरआळंदी यांसारख्या यात्रांच्या स्थळी फिरते व्यापारी धार्मिक पुस्तके,लावण्या-पोवाड्यांचे संग्रहभजनावल्या इत्यादींची इतर वस्तूंबरोबर विक्री करीत. शाळांची संख्या वाढल्याने पुस्तकांनाही हळूहळू मागणी वाढू लागली. पण ही मागणी क्रमिक पुस्तके व मार्गदर्शिका यांनाच असे. इतर ग्रंथांना मागणी अशी नसेच. याबाबतच्या तक्रारी त्या काळातील अनेक ग्रंथांतून आढळून येतात.

पुण्या-मुंबईत १८९४ च्या सुमारास काही ग्रंथविक्रेते असावेत असे दिसते. कारण डेक्कन व्हरनॅक्युलर सोसायटीने विकत घेतलेले विष्णु वासुदेव नाटेकर यांचे हिंदुस्थान व ब्रिटिश वसाहती हे पुस्तक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवण्याची सूचना त्या सालच्या सोसायटीच्या अहवालात नमूद केलेली आहे,तसेच १०० विक्रेत्यांकडे आपल्या प्रकाशनाच्या प्रत्येकी १० प्रती ठेवून पुस्तकांची विक्री वाढवावी, असा जावजी दादाजी यांनी जो विचार केला होता;त्यावरून पुस्तकविक्रेत्यांची बरीचशी माहिती त्यांच्याजवळ असावी, असे दिसते. शहरातील छावणी भागात यूरोपियनांची वस्ती असल्याने तेथे पुस्तकांची दुकाने असत. मुंबईत फोर्ट विभागात पुस्तकांची मोठमोठी दुकाने असल्याचे माडगावकरांनी मुंबई वर्णनात लिहिले आहे. पुणे येथील छावणी विभागात १९१० पासून पुस्तकांची दुकाने आढळून येतात.

९२० ते १९५० या काळात नागपूरकोल्हापूरसोलापूर वगैरे ठिकाणी पुस्तकांची विक्री होऊ लागली. तेथेही पुस्तकविक्रीचा धंदा हा जोडधंदा म्हणूनच चालू शके. आजही खेडेगावात लोखंडी सामानऔषधेकापड वगैरे वस्तूंच्या दुकानांतून जोडधंदा म्हणून पुस्तकांची विक्री होत असते. स्वातंत्र्योत्तर भारतात इतर धंद्यांप्रमाणे या धंद्यालाही ऊर्जितावस्था येण्यास सुरुवात झाली. या क्षेत्रात पाश्चात्त्यांनी अगोदरच पुढे पाऊल टाकले होते. युनेस्कोसारख्या संस्थांनी ग्रंथवितरण आणि विक्री यांचा विचार सुरू केला होता. इंग्लंडमध्ये पुस्तकविक्रेत्यांनी नक्त किंमतीच्या करारासारखे नियम करून या धंद्यातील अनिष्ट स्पर्धेला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. काही देशांत तर विशिष्ट अभ्यासक्रम पुरा केल्याखेरीज पुस्तकविक्रीचे दुकान काढण्यास परवानगी मिळत नसे. पानपट्टीची दुकानेउपाहारगृहे येथेही विक्रीसाठी पुस्तके ठेवून पुस्तकांची विक्री वाढविण्यासंबंधीचे योजनाबद्ध प्रयत्नसुरू करण्यात आले होते. पुस्तकविक्रेत्यांच्या संस्था स्थापन करण्याचे प्रयत्नही चालू होते. दुकानांची मांडणी आकर्षक करूनवाङ्‌मयाभिरुची असलेल्या लोकांचीच विक्रेते म्हणून नेमणूक करूनथोरामोठ्यांना दुकानास भेट देण्याची विनंती करूनपसंतीसाठी पुस्तके पाठवून वा परिसंवाद-वादविवाद घडवून आणून ग्रंथविक्रीस चालना देण्याचे नेटाने प्रयत्न सुरु झाले. याचा चांगला परिणाम ग्रंथविक्रीवर झाला. महाराष्ट्रात दरवर्षी पुस्तकांची विक्री सु. वीसपंचवीस कोटी रुपयांची होत असावीअसा अंदाज आहे. परकीय पुस्तकांची आयात अजूनही वाढत असल्याने आणि त्यांचे मुद्रण व बांधणी आकर्षक असल्याने देशी पुस्तकांच्या विक्रीवर अनिष्ट परिणाम होणे साहजिकच आहे. त्यातच बहुसंख्य व सुशिक्षितही इंग्रजी वाङ्‌मयाचे चाहते असल्याने भारतात इंग्रजी पुस्तकांची वार्षिक आयात सु. पाच कोटी रुपयांची होते. इंग्रजी भाषेचे वाचक संख्येने जास्त असल्याने पुस्तकांच्या आवृत्त्या मोठ्या असू शकतात. त्यामुळे त्यांचे निर्मितीमूल्य कमी होऊन पुस्तकांच्या किंमतीही कमी होऊ शकतात.

स्वातंत्र्योत्तर भारतात पुस्तकविक्रेत्यांच्या संघटना अस्तित्वात येत आहेत. फेडरेशन ऑफ बुकसेलर्स अँड पब्लिशर्स असोशिएशन ऑफ इंडिया या नावाची एक मध्यवर्ती संस्था देशात चांगले काम करीत आहे. ठिकठिकाणी पुस्तकविक्रेत्यांचे स्थानिक संघ स्थापन झालेले आहेत.  भारतातील पुस्तकविक्रेत्यांचे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि जुन्या दुर्मिळ पुस्तकांचे विक्रेते असे तीन मोठे विभाग करता येतात. घाऊक विक्रेते मोठमोठ्या शहरांतच असतात. दुर्मिळ व जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांना परिश्रम पुष्कळच करावे लागतात.

पुस्तकविक्रीचा धंदा भारतात वा अन्यत्रही कधीच फारसा फायदेशीर होत नाही. पाश्चात्त्य देशांत पुस्तकविक्रेत्यांची प्रचंड दुकाने दृष्टीस पडतात. त्यांचा परदेशांतही व्यापार चालतो. भारतात मात्र भाषेची मर्यादा या धंद्याचा व्याप संकुचित करते. आपल्याकडे साक्षरतेचे प्रमाण जेमतेम २९ टक्के आहे. त्यांपैकी वाचनाची आवड असणारे, पुस्तक विकत घेण्याची हौस असणारे आणि पुस्तक विकत घेण्याची इच्छा असूनही त्यांची खरेदी न परवडणारे लोक विचारात घेतलेतर या धंद्याच्या मर्यादेची कल्पना येईल. आपल्याकडे ग्रंथविक्रेत्यांची साखळी नाही. पुष्कळ दुकाने वा शाखा असल्या की आपोआप विक्री वाढते. उदा.अमेरिकेतील डबल डे या प्रकाशकाची वार्षिक ग्रंथविक्री सु. ४० लाख डॉलरांपेक्षा अधिक असून सु. ५०० पुस्तकविक्रेते त्याची पुस्तके विकत असतात.

पुस्तकविक्री हे शास्त्र असलेतरी ती एक कलाही आहे. विक्रेत्याला वाचनाची आवड असली पाहिजे. ग्रंथांसंबंधीचे त्याचे ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. तसेच ग्राहकांविषयी त्यास आदरयुक्त जिव्हाळाही पाहिजे. दुर्दैवाने आज आपल्याकडे अशी परिस्थिती नाही.

ज्ञानप्रसारासाठी सध्या सरकारने ग्रंथालयांची साखळी सुरू केली आहे. कारखान्यांतून व सरकारी कचेऱ्यांतूनही ग्रंथालये उघडण्यात आली आहेत. यामुळे ग्रंथप्रसारास मदत झालीयात शंका नाही. तसेच अल्प मोलाने पुस्तक वाचावयास मिळत असल्याने वाचकांची संख्याही वाढत आहे. या कामी वृत्तपत्रातील ग्रंथपरीक्षणांचाही फार उपयोग होतो. क्रमिक पुस्तकांची विक्री हा ग्रंथविक्रेत्याचा आधार असतो. थोड्या अवधीत निश्चित ग्राहक मिळण्याची त्याला ती संधी असते. सर्व जगभर हीच परिस्थिती दृष्टोत्पत्तीस येते. भारतातील सु. दोन हजार ग्रंथविक्रेत्यांचाही असाच अनुभव आहे. एरवी ललित वा इतर ग्रंथ विकूनच आपला चरितार्थ त्याला कसाबसा चालवावा लागतो. परंतु हे साध्य करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसे भांडवल नसते. शिवाय साक्षरतेच्या प्रमाणाचेही त्याच्या धंद्यावर साहजिकच बंधन पडते. पोस्टाने परगावचा ग्रंथविक्रीव्यवहार करणे त्याला तसेच ग्राहकालाही फायदेशीर पडत नाही. वाढते खर्चन खपलेल्या पुस्तकांची आर्थिक जबाबदारीआपसांतील स्पर्धा इ. अनेक अडचणी ग्रंथविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नेहमीच भेडसावीत असतात. सरकारने या व्यवसायाला उद्योग म्हणून मान्यता दिली व पोस्टाच्या दरात रेल्वेप्रमाणे सवलती दिल्यातरच या धंद्याला ऊर्जितावस्था येईल. काही राज्यांत असलेला पुस्तकावरील विक्रीकर तसेच अनेक ठिकाणी असलेले स्थानिक कर रद्द होणेही या धंद्याच्या उन्नतीच्या दृष्टीने अगत्याचे आहे.

संदर्भ : Plant, Marjorie, The English Book Trade, London, 1965.

लिमये, अ. ह.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)


अंतिम सुधारित : 3/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate