অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छोटा चालू व्यवसाय विकत घेताना घ्यावयाची काळजी

आपण बरेचदा वर्तमान पत्रात वाचतो की एका मोठ्या कपंनीने एक छोटा व्यवसाय विकत घेतला. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल एका व्यावसायिकाने त्याच्याच क्षेत्रातील एक डबगाईला आलेला व्यवसाय विकत घेतला. हे लोक असे का करतात? बहुदा विस्तारीकरण हे उत्तर असावं. हे सगळं कसं होतं. काय पूर्व तयारी अथवा अभ्यास असतो का या मागे? चला तर चालू व्यवसाय विकत घेताना कोणती काळजी घ्यावी लागते ते पाहू या.

विक्री प्रक्रियेचे मुख्य चार स्तंभ

या विक्री प्रक्रियेचे मुख्य चार स्तभं आहेत संघ, तंत्रज्ञान, त्यासाठी वापरलेली शक्ती आणि मार्गक्रमण.

संघ

तुम्ही विकत घेणाऱ्या कंपनीची नाडी ओळखायची असेल तर त्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ते शिपाई पर्यंत सर्वांना जाणून घेणे आवश्यक आहे. कोण कुठल्या हुद्यावर आहे आणि किती कुशल आहे हा अभ्यास करणे गरजेचे आहे. या वरून तुम्हाला ती कंपनी मिळवायची की नाही हे ठरवता येईल.

त्या कंपनीचा आणि तेथील कर्मचाऱ्यांचा तुम्हाला किती व कितपत फायदा होईल याची आखणी करता येईल. तेथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची, ग्राहकांची आणि विक्री तंत्रज्ञानाची सखोल माहिती असणे अनिवार्य आहे. या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यवसायाला खूप फायदा होईल. एक मजबूत संघ कुठलेही आव्हान यशस्वीरित्या सर करू शकतो.

तंत्रज्ञान

अक्वाइअर (मिळविलेली) केलेली कंपनी कुठले तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. टेक्नॉलॉजीचे समर्थनीय परीक्षण करणे खूप गरजेचे आहे. अनेक कंपन्या काही गोष्टी गुप्त ठेवतात. ही गुप्तता त्याच्या उत्पादनाशी किंवा उत्पादन पद्धतीशी निगडित असते.

अशा गोष्टी थोड्या अवघड स्वरूपाच्या असू शकतात. पण जर त्यांचे तंत्रज्ञान एकदा समजले तर या सर्व गोष्टी सोप्या व सरळ होऊन जातात. ह्यालाच कॉर्पोरेट भाषेत यु.एस.पी (अद्वितीय विक्री विधान) असे म्हणतात.

हे सहभागी तंत्रज्ञान किंवा बौद्धिक मालमत्ता, एक रचना, कोड किंवा एक प्रक्रिया असू शकते जेणे करून त्या कंपनीला बाजारपेठेत एक वेगळे स्थान मिळवता येते.

उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे बिस्कीटच खूप लोकप्रिय आहे कारण त्यांची पाककृती वेगेळी आहे. एकाच कंपनीचे औषध एका अमूक रोगासाठी बहुतेक वेळा वापरले जाते. हे सर्व तंत्रज्ञान अक्वाइअर करताना तुम्हाला कशा स्वरूपात व किती मिळत आहे हे समजून घेणे अतिआवश्यक आहे.

मूल्यांकन

संपादन केलेली कंपनी तुम्हाला कसा नफा दाखवेल या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. कंपनी छोटी व अजून अज्ञात आहे या आधारावर कंपनीला कमी लेखू नका. त्या कंपनीची आता पर्यंतची वाटचाल, उत्पादन आणि ग्राहक बळ या सर्व गोष्टी आपल्याला किती व कसे यश प्राप्त करून देतील याचे सखोल मूल्यांकन अनिवार्य आहे.

या उलट जर संपादन केलेली कंपनी सुप्रसिद्ध आणि मोठ्या संघाची आहे म्हणून खुश होऊ नका. त्या कंपनीची वाटचाल, उत्पादन आणि ग्राहक बळ आपल्याला किती फायदेशीर आहे ते तपासून पहा. त्या कंपनीने दिलेल्या सेवेत नावीन्य आहे का? अथवा ते इतरांपेक्षा किती व कसे वेगळे आहेत अशा प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करा. अशारीतीने तुम्हाला ज्या कंपनीचे संपादन करायचे आहे त्याचे योग्य मुल्यांकन करण्यास मदत मिळेल.

मार्गक्रमण

व्यवसाय हा कुठल्याही आर्थिक नियोजन आणि पाठबळाशिवाय होत नाही, किंवा ते पैश्या शिवाय शक्य नाही. त्यामुळे पैशाचा योग्य आणि विचारपूर्वक बंदोबस्त अनिवार्य आहे. धंद्याच्या सुरुवातीपासून पैशासंबधी सर्व व्यवहार पद्धतशीर मांडता येणे अनिवार्य आहे.

वेगवेगळे कर, करार आणि आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टी कागदोपत्री नमूद असणे गरजेचे आहे. कंपनीच्या सुरुवातीला कमी आणि आवश्यक भांडवलच वापरा. पैसे मिळत आहेत म्हणून व्यवसायाला ते जोडू नका. पैश्याची हेळसांड करू नका, कारण जितके घेतले आहेत त्याहुन अधिक किंवा तेवढे तरी परत करायचे आहे हे विसरू नका. आपली कंपनी ही आपलीच राहिली पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष्य करून पुढे मार्गस्थ व्हा.

 

लेखक - सुजाता चंद्रकांत
9867810545
sujatacbn@gmail.com

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate